09 December 2019

News Flash

‘अहं’काराचं चित्रवळण

रेखा रौद्वित्य यांचं सोबतचं चित्र पाहून ‘यात इतकं विशेष काय?’ असं वाटेल. चित्र साधंसंच दिसतं आहे.

रेखा रौद्वित्य यांचं सोबतचं चित्र पाहून ‘यात इतकं विशेष काय?’ असं वाटेल. चित्र साधंसंच दिसतं आहे. चित्र केवळ एकदाच पाहून प्रश्न पडण्याच्या शक्यता कमी आहेत. चित्र दुसऱ्यांदा पाहिलं, तरीही साधारण ही अशी चित्रं असतातच असं वाटेल आणि या चित्रात ‘आजकालचं’ काय आहे, असा प्रश्न पडेल. ही अशी चित्रशैली अनेक चित्रकारांनी वापरली आहे, असं निरीक्षण कुणी नोंदवल्यास तेही खरंच ठरेल. हे झालं जरा आर्ट गॅलऱ्यांत वगैरे जाणाऱ्यांचं निरीक्षण; पण समजा काहीजण जातच नसतील फारसे कधी कलादालनांत, तरीही ही चित्रपद्धत फार नवी नाही, हे त्यांच्याही लक्षात येईलच. वरकरणी या चित्रातून जो आशय लक्षात येतो, तोही नवा म्हणता येणार नाही.. (कसा येईल? तो ‘ओळखीचा’ आहे म्हणून तर ‘कळतो’ ना? नवा आशय इतक्या चटकन कळणं बहुतेकदा कठीण असतंच.)

तरीही, जुन्या-नव्या शैलींचं एकत्रीकरण रेखा रौद्वित्य ज्या प्रकारे आणि ज्या हेतूंनी करताहेत, स्त्रीप्रतिमा आणि तिचं देवी-प्रतिमेशी असलेलं साधम्र्य गेल्या काही वर्षांत अगदी सातत्यानं दाखवून त्या जो आशय सूचित करताहेत, ते लक्षणीय आहे.

म्हणजे काय आहे, ते आता पाहू.

बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठात रेखा रौद्वित्य यांची जडणघडण झाली, के. जी. सुब्रमणियन यांच्यासारखे, भारतीय आणि आधुनिक कला काय असू शकते याचा विचार करणारे विद्वान-कलावंत रेखा यांनी गुरुस्थानी मानले आणि तरीही तरुणपणीची बंडखोरी म्हणून असेल, पण रेखा यांची साधारण ३० वर्षांपूर्वीची चित्रं रेषेला, वळणांना फार महत्त्व न देता फराटेदार रंगांची उधळण करत सिद्ध झाली होती, हा बायोडेटावजा इतिहास-तपशील फक्त नवख्यांसाठी नोंदवून ठेवणं गरजेचं आहे. त्याच तपशिलाचा भाग म्हणजे, बडोद्यात ३० वर्षांपूर्वी कथनात्म चित्रविचार किंवा ‘नॅरेटिव्ह स्कूल’ जोरात होतं. (‘त्या नॅरेटिव्ह स्कूलमुळेच तर बडोद्याच्या चित्रकारांना माणसासारखा माणूस काढता येत नाही,’ अशी तथ्याधारित कुचाळकी मुंबईच्या व्यक्तिचित्रणाभिमानी कलाशाळांतून सर्रास चालायची!) ‘लोक सहजपणे जशी चित्रं काढतील तशी चित्रं आपणही काढावीत’ आणि ‘लघुचित्रांच्या भारतीय परंपरेनं जी वैशिष्टय़ं जपली, ती यापुढेही सुरू असणं हितकारक आहे’ अशा काहीशा विचारांतून नॅरेटिव्ह स्कूलची प्रत्यक्ष मार्गक्रमणा सुरू होती. याचा दृश्य पुरावा म्हणजे भूपेन खक्कर, गुलाम शेख या (केजींच्या नंतरच्या) बडोदेकर चित्रकारांची त्या वेळची चित्रं.. त्यांतली बॅकग्राउंड अगदी सपाट. आकार अगदी साधेच. रंगसुद्धा मोजकेच. त्रिमितीचा, ‘यथार्थदर्शना’चा (- हा ‘पर्स्पेक्टिव्ह’ला रूढ मराठी प्रतिशब्द आहे) अट्टहास अजिबात नाही. या वैशिष्टय़ांचं आणखी चित्रकारांच्या चित्रांतही दिसू लागलं, पण ती चित्रं ‘हेतुपूर्ण अभिव्यक्ती’ ठरतात की नाही, यावर समीक्षकांनी शंका उपस्थित केल्या. उदाहरणार्थ मनजीत बावा यांची गोलसर, वळणदार मानवाकृती असलेली चित्रं, किंवा बावांइतके प्रयोगशील नसलेल्या गौतम वाघेलांची चित्रं. अशा सर्व चित्रांमध्ये एक धागा समान होता. भारतीय कलेतिहासाचं आत्मीकरण करून, आजच्या समाजासाठी चित्ररूप घडवण्याचा प्रयत्न करणं, हा तो धागा.

परंपरांना ‘जिवंत’ ठेवण्याचा तोच धागा रेखा रौद्वित्य यांच्या या चित्रात दिसतो आहे. चित्र ‘कशाचं’ आहे हे तर कळतंच आहे. एक स्त्री- ही आधुनिक आहे आणि तिच्या धडावर लक्ष्मीचं चित्र आहे. लक्ष्मीचा कुठेही ‘अवमान’ वगैरे केलेला नाही. बाजारात लक्ष्मीची स्टिकर्स सर्रास विकत मिळतात, त्यापैकीच एक विकत आणून चित्रकर्तीनं ते इथं चित्रावर चिकटवलेलं आहे.  हातानं रंगवलेलं चित्र हे या स्टिकरची ‘बॅकग्राउंड’ ठरलं आहे. त्या चित्रातली स्त्री ही कमावती आहे, हेही चटकन कळतंय. तिचं वाहन विमान आहे. ग्लॅडिओलासारख्या इम्पोर्टेड फुलांनी तिची बाह्यसजावट खुलते आहे. ती बर्गरसेवन करू इच्छिते. तिच्या हातातला मोबाइल फोन नव्यापैकी आहे, समोर लॅपटॉप संगणक, तर संगीत ऐकवणारं यंत्र मात्र मागेच ठेवून ती कामाला महत्त्व देते आहे. जीन्ससदृश वस्त्र तिच्या अंगावर आहे, पण ते ती नेहमी परिधान करत नसावी असंही लक्षात घेता येण्याची सोय चित्रकर्तीनं- एकाच पायात जीन्स चढवून- प्रेक्षकांसाठी ठेवलेली आहे. या प्रेक्षकांपैकी अनेकजण, अनेकजणी विमानं, संगणक, मोबाइल, सीडी प्लेअर, जीन्स, ग्लॅडिओला-फुलं यांचे वापरकर्ते असणारच, याचं ज्ञान चित्रकर्तीला असावं. चित्रकर्तीनं २०१० मध्ये कागदावर जलरंग आणि स्टिकर वापरून हे चित्र सिद्ध केलं, तेव्हा अनेकजण लक्ष्मीची पूजा करीत आणि चित्रात उल्लेख केलेल्या सर्व साधनांचा वापरही करीत, हे एरवीही सिद्ध होण्याजोगं आहे. किंबहुना ते वेगळं सांगायलाच नको, इतकं सर्वानाच माहीत आहे.

सर्वाना म्हणजे भारतीय प्रेक्षकांना. भारतीय प्रेक्षकांसाठी भारतीय चित्रं करणारी, पाश्चात्त्य चित्रपद्धतींची अजिबात नक्कल न करता ‘आपल्या’ परंपरांना उजळा देणारी, अशी ही चित्रकर्ती आहे. त्यामुळे ‘प्रेक्षक भारतीयच’ असं म्हणणं हा चित्रकर्तीचा अपमान ठरत नाही, ठरूही नये.

या चित्रातल्या ‘स्त्री-प्रतिमे’बद्दल काही प्रश्न पडतील. वक्षस्थळं किंवा कंबरेच्या भागातली कमनीयता यांचं दर्शन रेखा रौद्वित्य यांनी टाळलेलं आहे. त्यामुळे ‘ती नक्की स्त्रीचीच प्रतिमा आहे का?’ हा प्रश्नही पडल्यास योग्यच. या चित्रातली जीन्स घातलेली बाजू ही पुरुषाची वाटते आहे (आणि त्यामुळे फारतर, ‘अर्धनारीश्वर’ या स्त्रीपुरुषतादात्म्यता दाखवणाऱ्या हिंदू प्रतिमेची आठवण देणारं हे चित्र आहे) असं म्हणण्याचा हक्क प्रेक्षकांना आहेच मुळी. पण याच चित्रकर्तीची बाकीची अनेक चित्रं पाहिली, तर मात्र हीदेखील स्त्रीप्रतिमाच असावी, असं अनुमान निघतं. रेखा रौद्वित्य यांनी गेली तीन-चार दशकं स्त्रीप्रतिमाच प्राधान्यानं केल्या. रेखा या स्वत: केरळच्या मातृसत्ताक घराण्यातल्या आहेत. मातृसत्ताक पद्धतीला त्यांचा पाठिंबाही आहे आणि स्त्रीचं माता हेच रूप त्यांना भावतं. इतकं की, यातून रेखा यांची प्रतिमा ‘अहंकार फार आहे त्यांना’ अशी झाली होती. स्त्रीनं तिचा स्वत:वर आणि स्त्रियांच्या शक्तीवर विश्वास आहे असं पदोपदी दाखवून दिल्यास त्या स्त्रीला समाजानं अहंकारी का समजावं? हा प्रश्न आहेच. अशासारखा प्रश्न आक्रमकपणे विचारणारी (फराटेदार) चित्रं रेखा यांनी दोन-तीन दशकांपूर्वी केली होतीच; पण त्यानंतर मात्र, चित्रांतर्गत म्हणून ज्या काही परंपरा असतील- वळण असेल, ते पाळणं या चित्रकर्तीनं गेल्या काही वर्षांत अधिक पसंत केलं आहे.

चित्रांकनाच्या हिंदू आणि जैन परंपरांपासून ते सद्यकाळात शहरोशहरीचे हौशी (म्हणजे पाश्चात्त्य कलाशिक्षणापासून दूर राहिल्यामुळे ‘व्यावसायिक’ न होता आलेले आणि तरीही चित्रं काढणारे) चित्रकार ज्या प्रकारे विमान किंवा फुलं रंगवतील, त्याही ‘अर्वाचीन परंपरे’चा आधार या चित्राला आहे.

हे चित्र, ही प्रतिमा कुणाला आक्षेपार्ह वाटू नये. त्या दृष्टीनं चित्रकर्तीने घेतलेली काळजी, हा ‘आजकालचा’ भाग नाही काय? मतभेद असल्यास जरूर लेखी (शक्यतो थेट ई-मेलने) कळवा.

अभिजीत ताम्हणे – abhijit.tamhane@expressindia.com

First Published on October 9, 2016 1:39 am

Web Title: artist rekha rodwittiya painting assert the female sensibility
Just Now!
X