09 December 2019

News Flash

नकारात्मक आणि कलात्मकसुद्धा!

कलेनं नेहमी ‘शाश्वत मानवी मूल्यं’च आविष्कृत करावी, ही अपेक्षा असते. ती योग्यच आहे.

‘‘चित्रकला म्हणजे बाजार. विकावीकच सगळी. लाख आणि कोटी रुपयांच्या किमती. ज्याचा माल जास्त विकला जातोय तो मोठा चित्रकार..’’ असा एक निरीक्षणवजा सूर अनेक जणांचा असतो. त्याशिवाय, ‘‘राजकीय किंवा सामाजिक आशयाबिशयाची कला याला काही अर्थ नाही. चित्रकारानं त्याचं काम नीट करावं की! कार्यकर्त्यांसारखे कसले वागता? जे काही राजकीय/ सामाजिक आशयाची कला म्हणून डोक्यावर घेतलं जातं, त्यात कलात्मकता असायला हवी की नाही?’’ असा आणखी एक सूर, तोही अनेक जणांचा असतो. यापैकी पहिला सूरवाले अनेक जण आणि दुसरा सूरवाले अनेक जण हे काही वेळा निरनिराळे नसतात! एकच माणूस हे दोन्ही सूर लावतो आणि त्याचा-त्याचा व्हॉट्सअ‍ॅप समूह किंवा त्याचे फेसबुकमित्र हे सारे, ही दोन मतं एकमेकांशी केवढी परस्परविरोधी आहेत, याचा विचार न करता दोन्ही मतं अंगठय़ानंच ‘लाइक’ करत असतात. राजकीय कलेला अर्थ नाही, कलेनं ‘कलात्मक’च असायला हवं- म्हणजेच ‘कलात्मक’ कशाला म्हणावं हे अगोदरच ठरलेलं असल्यानं त्याचं पालन करायला हवं, असं एकदा ठरल्यावर विकाविकीला विरोध का म्हणून? यावर उत्तर म्हणून ‘मानवी मूल्यांचा आविष्कार हेच कलेचं कार्य असायला हवं’ असं एक विधान केलं जातं. कलेनं नेहमी ‘शाश्वत मानवी मूल्यं’च आविष्कृत करावी, ही अपेक्षा असते. ती योग्यच आहे. पण म्हणून ‘शाश्वत मूल्यां’चा पुनशरेध घेणंसुद्धा थांबवायचं आणि ‘कलात्मकतेच्या आधीच ठरलेल्या व्याख्या पाळायच्या’ असंच जर असेल, तर कला पुढे कशी जाणार? आपल्याकडे आधुनिक काळातलीच अख्खी बंगाल-शैली या व्याख्यापालनामुळे आणि मूल्य-शाश्वततेचा वारंवार शोध न घेण्यामुळे पडून-झडून गेली आणि केवळ विकाविकीपुरती उरली, हे उदाहरण जवळचं आहेच.

हा पुनशरेध घेतला जाऊन, त्यातून ‘कलात्म अनुभव’ देणारी कलाकृती घडल्याचं एक उदाहरण म्हणजे ‘द पोएटिक्स ऑफ डिसेंट (मतभिन्नतेचं काव्यशास्त्र)’ या नावानं प्रदर्शित झालेली ‘नो, आय वॉजन्ट हॅपी (नाही, मी आनंदी नव्हते)’ ही कलाकृती. चिली या देशातल्या ज्येष्ठ (वय ७२) कार्यकर्ती-दृश्यकलावंत लॉटी रोझेन्फेल्ड यांची ही कलाकृती, त्यांच्याच १९७९ सालच्या अनुभवावरही आधारित होती.

‘अन्यायाचा निषेध करणं- निषेध करावासा वाटणं आणि तो हिंसक पद्धतीनं न करता त्यासाठी निराळे मार्ग शोधणं, एक वेळ आत्मक्लेश चालतील पण हिंसा टाळून निषेध करणं.. हेदेखील एक महत्त्वाचं मूल्य आहे का? ते मूल्य न्यायाकडे किंवा त्याहीपेक्षा- ‘सत्या’कडे नेतं का?’ हा प्रश्न प्रेक्षकाला पडावा असा या कलाकृतीचा आशय होता. म्हणजे अगदी जंत्रीच होती या कलाकृतीमध्ये.. महात्मा गांधीजींच्या दांडीयात्रेपासून, ‘अरब स्प्रिंग’ आणि ‘ऑक्युपाय वॉल स्ट्रीट’ आणि एडवर्ड स्नोडेन याला परागंदा राहावं लागण्यापर्यंत राज्यव्यवस्थेच्या दबावाला प्रत्युत्तर देण्याच्या ऊर्मी जिथं-जिथं दिसल्या, त्यांची छायाचित्रं किंवा उपलब्ध असल्यास चलच्चित्रं (व्हिडीओ) असं इथं प्रोजेक्टरच्या साह्य़ानं दिसत होतं.. एकामागोमाग नव्हे, चहूबाजूंनी किंवा अक्षरश: दशदिशांनी दिसत होतं.. ‘दशदिशांनी’ या शब्दाला अर्थ देणारा अनुभव असा की, इथं ‘चहूबाजू’ म्हणजे चार भिंतींवरले ठरावीक भागच प्रोजेक्टरसमोर असणं, असं काही नव्हतंच! छपराला जे तीन प्रोजेक्टर लावलेले होते, ते रुळांवरून गाडी फिरावी तसे पुढेमागे फिरू शकत होते. हे ‘रूळ’ एकमेकांना छेदणारे असल्यामुळे आणि प्रोजेक्टर जागच्याजागी खाली-वरसुद्धा जाऊ शकेल अशा बेतानं लावल्यामुळे छपरावर, जमिनीवर, दोन भिंतीच्या कोपऱ्यात, भिंत आणि जमीन यांच्यामध्ये.. अशी कुठेही ही छायाचित्रं आणि चलच्चित्रं दिसत होती. काही वेळा तर, एकमेकांवर दोन चलच्चित्रं येऊन  बेरजेच्या फुलीसारखा आकारही दिसत होता.  ‘इथं हे सुरू असतानाच तिथं तेही सुरू होतं’ असं सांगण्यासाठी या रचनेचा वापर लॉटी रोझेन्फेल्ड यांनी केला होताच; पण निषेधाच्या कृती  आणि त्यांची पर्वा नसणारं ‘बाहेरचं जग’ यांमधला विरोधाभासही दिसत होता. प्रेक्षकाला एकाच जागी खिळवून न ठेवतासुद्धा त्याला भिडणारा, असा हा अनुभव होता.

याच लॉटी रोझेन्फेल्ड यांनी ऐन उमेदीत, ऑगुस्तो पिनोचे यांच्या लष्करशाहीला (१९७३ ते १९९०) विरोध केला होता. असा विरोध करणाऱ्या चित्रकार-लेखक-रंगकर्मी आदी कलावंतांच्या ‘काडा’ (सीएडीए- कोलेक्तिव्हो आक्सिओनेस दे आर्ते-  किंवा इंग्रजीत, आर्ट अ‍ॅक्शन कलेक्टिव्ह) या समूहाच्या संस्थापकांपैकी त्या एक. सन १९७९ मध्ये (म्हणजे आजपासून सुमारे ३७ वर्षांपूर्वी) रोझेन्फेल्ड यांनी अशी एक ‘कृती’ करायला सुरुवात केली. रस्त्यावरल्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आखलेल्या पांढऱ्या तुटक रेघेच्या मधोमध तिला छेदणारी तेवढीच रेघ आखून, ‘+’ अशी बेरजेच्या चिन्हासारखी खूण त्या करू लागल्या. पिनोचे यांची शिस्त खोडणं, एकंदरच स्व-संयमाऐवजी लादलेल्या शिस्तीवर विश्वास ठेवण्याच्या ‘शासकीय’ भूमिकेला आव्हान देणं, असे या कृतीचे अर्थ असल्याच्या विश्वासातूनच या कृती घडल्या. ही कृती साधीच आहे. पण पिनोचे यांच्या राजवटीत ‘सार्वजनिक मालमत्तेची नासधूस’ किंवा तत्सम ठपका याच कृतीबद्दलही रोझेन्फेल्ड यांच्यावर ठेवला जाऊ शकत होता. त्यांना ‘आत टाकलं’ जाऊ शकत होतं.

हे झालं नाही. त्या फुल्या मारत राहिल्या. व्हॉट्सअ‍ॅप/फेसबुक त्या काळात नसताना आणि मुख्य म्हणजे संपर्कावर बंधनं असतानाही, लोकांपर्यंत आपलं म्हणणं हळूहळू पोहोचवत राहिल्या. बेरजेसारखी फुली हा एरवी कलात्मक आकार वगैरे मानला जात नाही. पण रोझेन्फेल्ड यांनी आपलं निषेधकार्य सुरूच ठेवल्यामुळे सातत्य, त्यातली लय, डिझाइनचं मूलतत्त्वच मानली जाणारी ‘पुनरावृत्ती’ आणि या सर्वाहून महत्त्वाचं म्हणजे, ‘या कृतीमागचा कलात्म हेतू’ अशा सर्व कारणांमुळे बेरजेची फुलीसुद्धा कलात्मक ठरू शकते, हे रोझेन्फेल्ड यांनी सिद्ध केलं. पुढे २०११ साली, इजिप्तच्या ‘तहरीर चौका’त निदर्शनं सुरू असताना रोझेन्फेल्ड मुद्दाम तिथं गेल्या आणि कैरोच्याही रस्त्यांवर त्यांनी फुल्या मारल्याच.

रोझेन्फेल्ड यांची ही कलाकृती ‘व्हेनिस बिएनाले- २०१५’ मध्ये चिली देशाच्या अधिकृत दालनातच पाहाणं, हा आणखी एक महत्त्वाचा अनुभव होता. पिनोचेनंतरचा चिली आता त्या काळातल्या दडपशाहीबद्दल खुलेपणानं बोलतो आहे आणि अशा बोलण्यात रोझेन्फेल्ड यांच्यासारखे कलावंत महत्त्वाचे ठरताहेत, याची आश्वासक जाणीव महत्त्वाची होती.

हल्ली-हल्ली, म्हणजे जर्मनीतल्या ‘डॉक्युमेंटा’ नामक पंचवार्षिक महाप्रदर्शनाच्या २००७ सालच्या खेपेत समावेश झाल्यानंतरच्या काळात रोझेन्फेल्ड यांच्या या ‘कलात्म निषेध-कृती’ची छायाचित्रं वगैरे विकली जाऊ लागली आहेत. म्हणजे वयाच्या साठीनंतर विक्री सुरू झाली. चिली या देशाचं नावच आपण अनेकांनी कलेच्या संदर्भात ऐकलेलं नसतं, कारण आपल्यापैकी अनेकांपर्यंत पोहोचणारी दृश्यकलाविषयक माहिती बाजारकेंद्रीच असते. सरकारविरुद्ध बोलणं किंवा मतभिन्नतेची, निषेधाची कलात्म अभिव्यक्ती करता येते, हेही आपल्यापैकी अनेकांना त्यामुळेच माहीत नसतं आणि मग, जे तशी अभिव्यक्ती करत आहेत त्यांच्यावरही ‘तुम्ही नकारवादी आहात.. नकारात्मक विचार करताय’ असले शिक्के मारण्यासाठी भक्तगण मोकळे राहतात. तसं होऊ नये, म्हणून तरी दक्षिण अमेरिकी देशांमधल्या अशा कला-कृतींचा अभ्यास चित्रकारांनी जरूर करावा.

 

 

First Published on September 11, 2016 1:50 am

Web Title: artists lotty rosenfeld artworks
Just Now!
X