शीर्षक वाचून कुणाच्या धार्मिकसदृश भावना दुखावल्या असतील तर आधीच माफी मागताना, ‘हा मजकूर आणि ‘जगण्याची कला’ शिकवणारे श्री श्री यांचा काहीही संबंध नाही’ असा खुलासा करणं भाग आहे. हा मजकूर आहे तो ‘नेहमीच्या आणि सर्वाच्या जगण्याचा कलेशी काय संबंध आहे?’ असा प्रश्न पाडून घेणाऱ्या कुणा एकाबद्दल. त्याचं नाव- अतुल भल्ला. दिल्लीत राहणारा; पण घरच्या बऱ्या परिस्थितीमुळे अमेरिकेत दृश्यकलेचं शिक्षण काही काळ घेण्याची संधी मिळालेला. त्या अमेरिकी शिक्षणाच्या बळावर अतुल भल्लाला मायदेशी येऊन लगेच चित्रकार म्हणून यशस्वी वगैरे होता आलं अशातला भाग अजिबात नाही. उलट, दिल्लीतलं कलाक्षेत्र त्यावेळी- १९८९ वगैरे साली खुरटंच असल्यामुळे भल्लादेखील खुरडतच राहिला. आयफॅक्सचं बक्षीस, नॅशनल कलाप्रदर्शनामध्ये चित्र लागलं- अशा फक्त चित्रकारांनाच महत्त्वाच्या वाटणाऱ्या आणि बा जगाशी काही संबंध नसलेल्या घडामोडी अतुलच्याही आयुष्यात नवतरुणपणी घडल्या, इतकंच. त्यामुळे लग्न, संसार वगैरेची वेळ आली तेव्हा त्यानं सरळ एका चांगल्याशा शाळेत कलाशिक्षकाची नोकरी धरली. नोकरी सांभाळतानाच ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’- ‘पर्जन्यजल साठवण आणि भूजल पुनर्भरण’ या विषयाकडे अतुल ओढला गेला. स्वत:च्या सोसायटीचंच नव्हे, तर शाळेचंही वॉटर हार्वेस्टिंग त्यानं केलं. पुढे तर अन्य ठिकाणांहून त्याला ऑर्डरी येत आणि हा तिथे जाऊन कसं करायचं, काय करायचं, वगैरे हौसेनं सांगू लागे!
हे तसं कलाबाच. पण पाण्याचा जगण्याशी, जगण्याचा कलेशी- म्हणून पाण्याचाही आपल्या कलेशी संबंध आहे हे अतुलला आतून उमगलं होतं. ‘माझी कला’ म्हणजे काय याची समज येणं, ही कलावंत या उपाधीला प्रामाणिकपणे पात्र होण्याची एक पायरी. ती अतुल चढला होता. दुसरी पायरी- काम करण्याची. तेही तो स्वत:च्या मनमर्जीनं करू लागला होता. प्रमाण लहानच होतं, पण ‘कुणाला कुठं दाखवायचंय थोडंच?’ असंही त्याला वाटत असावं. अतुलसाठी तिसरी पायरी म्हणजे ‘खोज’ या दिल्लीतल्या संस्थेत त्यानं अभ्यासवृत्तीसाठी अर्ज केला. ती त्याला मिळाली. म्हणजे मांडणशिल्प (इन्स्टॉलेशन) करण्यासाठी पैसेही मंजूर झाले. त्याचं ते २००६ सालचं मांडणशिल्प होतं- प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बाटल्यांचं! लहान-मोठय़ा सर्व तऱ्हेच्या बाटल्यांचे आकार ‘बाटलीबंद पाण्या’साठी ज्या बाटल्या वापरल्या जातात त्यांचेच आहेत, हे पाहताक्षणीच कळत होतं. त्या २००६ सालच्या प्रदर्शनाला दिल्लीत गेलो असता अतुलची भेट झाली तेव्हा त्यानंच स्वत:ची ओळख करून दिली : ‘मी कलाशिक्षक आणि वॉटर हार्वेस्टर आहे..’ अशी.
त्या प्रदर्शनापासूनच अतुलची ओळख पालटणार होती.. याची कारणं केवळ त्याच्या प्रामाणिकपणात नव्हे, तर त्याच्या कलाकृतींमध्येही होती. झालंही तसंच. अतुल भल्ला आता आंतरराष्ट्रीय ख्यातीचा वगैरे झाला आहे. पण हे सारं होण्याच्या अगोदर (२००५ साली) त्यानं केलेलं ‘फोटो परफॉर्मन्स’ या प्रकारातलं एक काम आजही आठवतंय. त्यानंतर एकाहून एक उल्लेखनीय कामं त्यानं केली. पण अतुल भल्लाच्या कलेसाठी प्रवेशद्वार म्हणून जिचा आपल्याला उपयोग होईल, ती कलाकृती म्हणजे हा २००५ सालचा ‘फोटो परफॉर्मन्स’! यमुना नदीतली डुबकी. ‘साधी डुबकीच?’ म्हणण्याआधी जरा थांबा. कोणती यमुना? दिल्लीची. म्हणजे प्रदूषितच! त्यातही हा थंडीच्या दिवसांत भल्या सक्काळी यमुनेच्या पात्रात उतरला. प्रकाश स्वच्छ पाहिजे आणि उन्हाची तिरीप नको म्हणून मुद्दाम सूर्योदयापूर्वी- पण फटफटल्यावर. त्या तशा डुबकीचं हे चित्रण. परफॉर्मन्स आर्टला मराठीत ‘सादरीकरण’ असा आयता प्रतिशब्द का योजता येत नाही, याचं एक कारण या कलाकृतीकडे पाहून कळावं. कोणत्याही कलावंताचा निर्णय जितका एकाकी आणि (माहिती, मेहनत, अभ्यास, सराव यांचा मेळ घालणारी साधना वगैरे गृहीत धरून पुढल्या) बोधना-संवेदनेला स्वत:च्याही पुढे नेणारा असतो, तशा- म्हणजे ‘कलात्म’ निर्णयाच्या परिणामी आणि (स्व)देहाचा वापर करून घडणारी कृती-घटना म्हणजे परफॉर्मन्स आर्ट! तिच्यात ‘नाटय़’ असेल, पण ‘नाटक’ नसतं. नेहमीपेक्षा निराळे हावभाव, निराळ्या हालचाली असतात; पण ‘अभिनय’ नसतो. खरेपणा ही परफॉर्मन्स आर्टची पूर्वअट आहे.
हा खरेपणा दिल्लीच्या गचाळ यमुनेला एखाद्या सश्रद्ध हिंदूप्रमाणे शरण जाऊन अतुलनं दाखवला. ‘बुडून वरती येणारा माणूस’ असं या कृतीचं अहिंदू वर्णन करता येईल. पण अतुलच्या फोटोंमध्ये दिसतो तो कपाळापर्यंत बुडून पुन्हा थोडासाच वर येऊ शकणारा माणूस. हे पुढले पुढले अर्थ ज्याचे त्यानं काढलेले अधिक बरे. कुणाला ते नकारात्मक वाटेल, कुणाला सकारात्मक. वाटो. पण फोटोंमागच्या कृतीची गोष्ट इथं महत्त्वाची ठरावी, एवढंच. पुढे यमुनेच्या काठानं ४०-४० किलोमीटर पायी फिरून फोटो टिपणं, आत्ताच्या यमुना-जीवनाचा अभ्यास दृश्यांमधून मांडणं, लोकांना पाण्याचं महत्त्व समजावणं, त्यासाठी ‘कांवडिया यात्रे’सारख्या हिंदूंपैकी काहीजणांच्या परंपरांनाही योग्य तो मान देणं, आणि तिसरीकडे पाण्याच्या ‘वस्तूकरणा’विरुद्ध दृश्यकलेतूनही लढा देणं- असं अतुलच्या वाटचालीचं सारांशानं वर्णन करता येईल.
‘खोज’मध्ये त्यानं केलेल्या त्या बाटल्याही पुढे मोठय़ा झाल्या. दिल्लीत १० ते २० नोव्हेंबर २०१० मध्ये यमुनेच्या किनाऱ्यावर पर्यावरणनिष्ठ कलेचं एक खुलं प्रदर्शन (यमुना- एल्ब प्रोजेक्ट) भरलं होतं, तिथं कागद, पुनर्वापरयोग्य प्लास्टिक आदी वापरून बनवलेल्या या मोठ्ठय़ा बाटल्या जमिनीत रुतलेल्या होत्या आणि काही बाटल्यांच्या पायथ्याशी मोठय़ा अक्षरात लिहिलेले प्रश्न होते.. महाभारतातल्या यक्षप्रश्नासारखे!
यातून कुणाला अतुल भल्ला हा हिंदुत्ववादी वाटला, किंवा कुणाला पर्यावरणवादी वाटला, तर तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. इथे एवढंच सांगायचं आहे की, अतुल भल्ला हा पाण्यावर आणि यमुनेवर प्रेम करणारा एक नव-कलावंतआहे. त्याची कला ही ‘नव-कला’ या प्रकारात मोडते, हे तर दिसतंच आहे.
abhijit.tamhane@expressindia.com