कलाकृती ‘आजकाल’च्या असतात म्हणजे त्या ‘अजरामर’ नसतात का? हो. कदाचित नसतातही.. पण सध्या हा प्रश्न बाजूला ठेवू आणि एक उदाहरण घेऊ. मग परत या प्रश्नाच्या उत्तराकडे वळू या.
उदाहरण म्हणून एका कलाकृतीचा हा सोबतचा फोटो पाहा. एक शोभिवंत झुंबर. ते अजरामरच ठरावं, असं खुद्द चित्रकाराला सुद्धा वाटत नसेल. पण ते ठरलं, तर? बरं, हे झुंबर काही फार टिकाऊबिकाऊ नाही. युरोपात पूर्वी (वाइनच्या) बाटल्या ठेवण्यासाठी असायचा तसा एक लोखंडी स्टँड आणि काही बाटल्या, अशा दोन वस्तू एकत्र करून तो बनवलेला आहे. तो युरोपातला जुना स्टँड कसा असायचा, हेही आणखी एका फोटोत दिसेलच. तोही फोटो जरूर पाहा. आपण काही युरोपीय नाही. घरोघरी बाटल्या, त्यांच्यासाठी तो स्टँड, ही काही आपली संस्कृती नाही. तरीदेखील ही कलाकृती पाहाताना आपण आपल्या मराठी संस्कृतीतल्या कलाप्रेमाला जागून, ‘कचऱ्यातून कला’ एवढे मरक आपण त्या कलाकृतीला देऊ शकतो!
पण ‘मला नकोयत हे मरक तुमचे’ असं चित्रकार सांगेल. का? त्याला काय ही कलाकृती फार महत्त्वाची वगैरे वाटतेय की काय?
‘‘हो वाटतेय. आणि मुळात ही २००५ सालची कलाकृती आहे, त्यानंतर गेल्या दहा वर्षांत या कलाकाराचा झालेला उत्कर्ष जगासमोर आहे.. आम्ही ही कलाकृती २०१५ सालच्या प्रदर्शनासाठी निवडली, ती तिचं महत्त्व पाहूनच’’ असं या कलाकृतीचं पुनर्दर्शन इटलीच्या मिलान शहरातल्या ‘फॉर्मे ए अँटि फॉर्मे’ (आकार आणि अनाकार) या प्रदर्शनाद्वारे घडवणारे कलाविद्वान प्रा. हान्स मारिया डि वूल्फ यांनी सांगितलं असतं. मिलानमध्ये किमान एका मराठी माणसानं हे मोठं प्रदर्शन पाहिलं. तरीही
प्रा. हान्स यांना विचारले गेलेले प्रश्न मराठीतून नव्हते, आणि दुसरं म्हणजे प्रदर्शनाचे विचारनियोजक – क्युरेटर- या नात्यानं ते स्वतच या प्रदर्शनातल्या काही निवडक कलाकृती दाखवून त्यांबद्दल बोलत होते. त्यांनी काही सांगण्याआधीच, नुसताच पांढऱ्या ठोकळय़ावर एखाद्या शिल्पासारखा ठेवलेला ‘बाटल्यांचा लोखंडी स्टँड’ हीदेखील ‘कलाकृती’ कशी काय, हे अनेकांना माहीत होतं.
मार्सेल द्युशाँ यानं १९१४ साली (१०२ वर्षांपूर्वी) हा तयार मिळणारा ‘बॉटल रॅक’ कलादालनामध्ये जणू काही कलाकृतीच म्हणून ठेवला होता. ‘कलाकृती’ मागच्या सांस्कृतिक मूल्यांना विरोध, हे कलासूत्र द्युशाँच्या ज्या ‘रेडीमेड्स’ म्हणून गाजलेल्या कलाकृतींमधून जगाला मिळालं, त्यांपैकी बॉटल रॅक ही एक. ‘युरिनल’ ही दुसरी. ‘युरिनल’ हा शब्द चुकून छापला गेला आहे असं कुणाला वाटत असल्यास कृपया, ‘डीयूसीएचएएमपी’ ही इंग्रजी अक्षरं (द्युशाँचं स्पेलिंग) इंटरनेटवर शोधून पाहा. या द्युशाँनं जुन्या प्रकारच्या कलेला- म्हणजे मेहनतपूर्वक रंगवलेली चित्रं, घडवलेली शिल्पं यांना विरोध केला, कारण ‘कलाकृती ही विक्रयवस्तू’ बनण्यावर त्याचा आक्षेप होता. मात्र हाच मार्सेल द्युशाँ स्वतच्या ‘रेडीमेड’च्या सुद्धा आवृत्त्या काढून विकायचा, याकडे बोट दाखवून काही जणांनी द्युशाँच्या कलाविचारांतली हवाच काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पण समजा जर द्युशाँचा बंडखोर कलाविचार हा ‘विक्रीमूल्य अधिक म्हणून कलाकृतीचे महत्त्व अधिक’ या पारंपरिक विचाराला, म्हणजेच ‘अधिक विक्रीमूल्या’ला शरण गेला आणि म्हणून भुक्कड ठरत असेल, तर? तर त्यातून आणखीही एक बाब सिद्ध होते. ती म्हणजे, विक्रीमूल्य पाहून कलाकृतीचं महत्त्व ठरवू पाहणाऱ्या विचारांनी देखील द्युशाँला दादच दिली, ही!
आता द्युशाँच्या त्या ‘रेडीमेड’ कलाकृतींना शंभरहून अधिक र्वष झाली आहेत. द्युशाँचे वाभाडेही काढून झालेले आहेत. तरीदेखील, द्युशाँचा कलाविचार हा बंडखोरीचाच होता आणि त्याचं महत्त्व हटलेलं नाही, हे तथ्य शाबूत आहे. त्या शाबूत असण्याचा प्रत्यय वारंवार – अन्य कलाकृतींतून, विद्वानांच्या लिखाणातून- येऊ शकतो.
तर याच द्युशाँचा ‘बॉटल रॅक’ आजच्या एका दृश्यकलावंतानं छताला टांगला. त्याला दारूच्या बाटल्या बांधल्या आणि आतल्या पोकळ जागेत दिवे सोडून त्याचं झुंबर बनवलं. या कलाकाराचं नाव अँजेल व्हेर्गारा. तो मूळचा स्पॅनिश, पण बेल्जियममध्ये राहातो आणि बेल्जियमनं त्याला नुसतं नागरिकत्वच न देता ‘कलाकार म्हणून राष्ट्राचं प्रतिनिधित्व’ करण्याचा मानसुद्धा दिला होता. (म्हणजे, २०११ सालच्या व्हेनिस द्वैवार्षिक प्रदर्शनात बेल्जियमच्या दालनात केवळ अँजेल व्हेर्गाराचं प्रदर्शन होतं). हा व्हेर्गारा आणखी निराळय़ा विचारांचा आहे. तो म्हणतो की, माझा भोवताल- त्यातल्या माणसांचं जगणं- हे माझ्या कलाकृतींमध्ये आलं पाहिजेच आणि मी त्याबद्दल भूमिकासुद्धा घेतली पाहिजे! अनेक चित्रकार हे ‘कलाकृतीतून समाजदर्शन’ घडवत असतातच, त्यांच्यापैकीच एक असूनही अँजेल थोडा वेगळा ठरतो कारण थेट माणसाचं चित्र/शिल्प न करता तो हे समाजदर्शन घडवतो आहे.
‘‘या झुंबराचा आकार पाहा.. श्रीमंती झुंबरांइतकंच मोठ्ठं आहे ते.. पण बॉटलरॅक वरलं हे झुंबर ज्या बाटल्यांनी बनलंय, त्यापैकी एकदोन बाटल्यांमध्ये दारू उरलेली आहे. ही दारू अगदी सस्त्यातली- कामगारवर्गीय पितात, अशी. रिकाम्या बाटल्यासुद्धा त्याच दारूच्या आहेत. यातून दिसणारा सामाजिक अंतर्विरोध, समाजात काय हवंसं मानलं जातं आणि काय नकोसं मानलं जातं, हा या कलाकृतीचा विषय आहेच. पण द्युशाँनं ‘रेडीमेड’वस्तूच कलाकृती म्हणून कलादालनांत ठेवल्या, त्यांचं बंडखोरीमूल्य देखील आता जुनं किंवा सवयीचं झालं आहे आणि आता नवी बंडखोरी अभिप्रेत आहे, हेही ही कलाकृती सांगते. समाजात आढळणाऱ्या, पण पाहिल्याच न जाणाऱ्या किंवा नजरेआड केल्या जाणाऱ्या वस्तूंना ही नवी कलाकृती स्थान देते आहे’’ असं प्रदर्शनाची तोंडी माहिती देताना प्रा. हान्स यांनी सांगितलं. ते त्यांनी सांगितलं नसतं, तर इतक्या स्पष्टपणे नव्हे पण- द्युशाँचा कलाविचार माहीत असणाऱ्या कुणालाही- हेच समजलं असतं.
कलाकृती ‘अजरामर’ आहे की नाही, हे काळच ठरवणार असं म्हणून गप्प बसता येतं. पण मधल्यामध्ये द्युशाँच्या कलाकृती अजरामर ठरतात त्याचं काय? तशी ही नवी कलाकृती ठरणारही नाही.. पण कुणी सांगावं? समाजाबद्दल बोलणं आणि भूमिका घेणं, हेदेखील ‘कलामूल्य’च आहे, असा विचार यापुढे टिकला तर ही अँजेल व्हेर्गाराची कलाकृतीसुद्धा कलेतिहासात अजरामरच होईल आणि म्हणून पुन्हापुन्हा पाहिली जाईल!
अभिजीत ताम्हणे – abhicrit@gmail.com