निखिल चोप्रा हे परफॉर्मन्स आर्टिस्ट आहेत. ‘परफॉर्मन्स आर्टिस्ट’साठी मराठीत प्रतिशब्दच वापरायचे, तर ‘सादरीकरण कलावंत’ असं काहीतरी म्हणावं लागेल आणि तसं म्हणण्यात अर्थ नाही. ‘परफॉर्मन्स आर्ट’ ही दृश्यकलेच्या इतिहासात १९६० च्या दशकापासून रुळलेली आणि विकसित होत गेलेली संज्ञा आहे; तिचे अर्थ रंगमंचावरल्या (किंवा पथनाटय़ांसारख्या) ‘परफॉर्मन्स’पेक्षा नक्कीच निराळे आहेत. साधा आणि मूलभूत फरक असा की, रंगमंचावरला ‘परफॉर्मन्स’ (प्रयोग, सादरीकरण) हा तालमी करून मग सादर झालेला असतो; तर दृश्यकलेत ‘परफॉर्मन्स आर्ट’ ही स्वतला पणाला लावून, प्रेक्षक किती वा कोण आहेत याचा विचार न करता काही (क्षण / मिनिटं / तास / दिवस अशा) कालावधीपुरतं त्या प्रयोगातच जगण्यासाठी केला जातो. यीव क्लां (यीव्हज क्लाइन) किंवा जोसेफ बॉइस या युरोपीय दृश्यकलावंतांनी १९६२-६५ मध्ये जेव्हा त्यांचे गाजलेले परफॉर्मन्स केले, तेव्हा त्यांना ‘अ‍ॅक्शन’ म्हणून ओळखलं जात होतं.

तेव्हापासून आजतागायत, परफॉर्मन्स आर्टकडे नेहमीच थोडं संशयानं पाहिलं जातं.. ‘ही कला म्हणावी काय?’ (इज इट आर्ट) हा आक्षेपवजा संशय तर आजकालच्या किंवा समकालीन ठरणाऱ्या कलाकृतींच्या संदर्भात नेहमीचाच. पण इथे परफॉर्मन्स आर्टबद्दल, मुद्दामच बाष्कळपणाला किंवा निर्थकपणाला ‘कला’ म्हणून आपल्या माथी मारलं जातंय का, असाही एक संशय प्रेक्षकांमध्ये अध्याहृत असतो. वास्तविक तो असू नये, कारण जोसेफ बॉइसनं बोलण्याचा किंवा मरीना अब्रामोविच यांनी गाण्याचा वापर करून आपापले परफॉर्मन्स आशयगर्भ केल्याचा इतिहास आहेच. स्त्रीजन्माबद्दल (दिवंगत) रुमाना हुसेन यांनी मुंबईत १९९५ साली केलेल्या परफॉर्मन्समध्ये, त्यांनी प्रेक्षकांतील स्त्रियांनाही सहभागी करून घेतलं होतं. स्त्री म्हणून केलेल्या, केल्या जाणाऱ्या किंवा कराव्या लागणाऱ्या कृतींचा अर्थ आपण साऱ्याच जणी शोधू, असं आवाहन त्या परफॉर्मन्समध्ये होतं. पण हे परफॉर्मन्स (बॉइस ते रुमाना हुसेन आणि नंतरही) काही प्रमाणात कथात्मतेकडे झुकू लागलं होतं. यीव क्लांच्या निव्वळ दृश्य ‘अ‍ॅक्शन’सारखी कृतिप्रधानता त्यात नव्हती. तालीम नसली, तरी या परफॉर्मन्सची ‘रंगावृत्ती’ कलावंताच्या डोक्यात तयारच असणार, असं भासायचं. ते कदाचित आवश्यकही असेल, असं समाधान करून घ्यावं लागायचं. याचा अर्थ असा की, ‘परफॉर्मन्स आर्ट’ ही पूर्णत बंडखोर ‘अ‍ॅक्शन’ उरली नसून आता ‘क्षण जगणं’ शाबूत ठेवूनही ती थोडीफार सुघटित झाली आहे.

Samsung company release To Galaxy AI features for flagship devices Check list if your phone is on the list
आनंदाची बातमी! आता सॅमसंगच्या ‘या’ स्मार्टफोनमध्ये येणार AI फीचर्स; पाहा संपूर्ण यादी
Indian Foreign reserves at a record high
परकीय गंगाजळी ६४८.५६ अब्ज डॉलरच्या उच्चांकी पातळीवर
rbi commemorative coins
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९० रुपयांचे नाणे लाँच, RBI ला ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गिफ्ट
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

निखिल चोप्रानं जर कधी परफॉर्मन्स केला, तर त्यातही हा किंचितसा सुघटितपणा असतोच. निखिलनं गेल्या सुमारे दहा वर्षांत अनेकदा निरनिराळे परफॉर्मन्स केले, त्यांपैकी काही जगभरच्या आर्ट गॅलऱ्यांत किंवा कलासंग्रहात होते, तर त्यांचे काही परफॉर्मन्स द्वैवार्षिक महाप्रदर्शनांमध्ये (बिएनाले) झाले होते. निखिलचे हे परफॉर्मन्स बहुतेकदा दोन-अडीच दिवसांचे असतात, त्यात तो किमान एक व्यक्तित्व धारण करतो. बहुतेकदा या अशा परफॉर्मन्समध्ये निखिल सातत्यानं (‘अथकपणे’ नव्हे. तो थकतो, झोपही घेतो.. पण जागा असतो तेव्हा सातत्यानं) भिंतींवर किंवा कागदांवर चित्रकाम करत असतो. तो साधारण काय करणार आहे, त्याचा शेवट कसा होणार आहे, त्यासाठी कोणकोणते कपडे तो घालणार आहे, मेकअप करणार असल्यास कसा, हे सारं त्याला माहीत असतं, म्हणजे त्याची ‘रंगावृत्ती’ अस्फुटपणे का होईना, तयार असते.

तरीही, निखिलचा परफॉर्मन्स- विशेषत त्या दोन-अडीच दिवसांपैकी सुरुवातीची आणि शेवटची काही मिनिटं, अनुभवण्याजोगी असतात. निखिलचे विविध परफॉर्मन्स पाहिले असल्यास, सुरुवात आणि शेवट यांखेरीजही मध्येच जाऊन तो काय करतोय पाहावं, असंही प्रेक्षकाला वाटतं. त्याचं थकणं, त्याचं त्या काही तासांमधलं जगणं, अगदी कमीत कमी पदार्थ, बऱ्याच वेळाच्या अंतरानं काहीसं अधाशासारखे खाणं.. हे सारं पाहण्यात ‘समाधान’ काहीच नाही. पण तो भूमिकेत शिरला आहे, भूमिकेचा ‘कैदी’ झाला आहे किंवा त्या परफॉर्मन्समधल्या (तात्पुरत्या) व्यक्तित्वासाठी तो स्वतचं व्यक्तित्व पार विसरून गेला आहे, हे त्याला एरवी पाहिलं/ त्याच्याशी एरवी बोललं तर फारच लक्षात येतं.

तरीही, एक सूत्र निखिलच्या अनेक परफॉर्मन्समधून दिसून येतं. त्याचे आजोबा योगराज चोप्रा हे हौशी चित्रकार होते. निसर्गचित्रं काढायचे. रंग असल्यास रंगवायचेही, पण रेखाटायचे नक्की. त्यांचं व्यक्तित्व निखिल अनेकदा जगतो. यथातथ्य निसर्गरेखाटनं करण्यात निखिलचा हातखंडा आहे, हे प्रेक्षकाला कळतं. भारतीय प्रेक्षक एरवीही गणपती साकारताना, जहांगीर आर्ट गॅलरीच्या बाहेर वगैरे कोणी व्यक्तिरेखाटनं करत असताना अशी दृश्यं पाहायला सरावलेले असतातच. पण निखिलचा भर केवळ चित्रं काढून दाखवण्यावर नसतो. काही परफॉर्मन्समध्ये त्यानं चित्रं रेखाटून पुन्हा सर्व भिंती काळय़ा किंवा पांढऱ्या करून टाकलेल्या आहेत. हे बहुतेक सारे परफॉर्मन्स सुरू करताना निखिल स्वच्छ असतो. केवळ अंतर्वस्त्रावर असतो. हळूहळू कपडे चढवतो, कधी कधी तर परफॉर्मन्स सुरू असतानाच थांबून दाढीही करतो. अंघोळ वगैरे अर्थातच बंद दाराआड; पण खाणंपिणं प्रेक्षकांसमोरच.

आत्ता या मजकुरासोबत जी चित्रं आहेत, ती निखिलनं सुमारे दोन वर्षांपूर्वी ‘कोची बिएनाले’मध्ये केलेल्या ५२ तासांच्या परफॉर्मन्सची आहेत. यापैकी पहिल्या तासातलं जे छायाचित्र आहे, त्यात निखिलनं एका चौरस आकाराच्या खोलीत सर्व भिंती रंगवायला सुरुवात केली होती. समोरच्या प्रेक्षकांमध्ये भारतातील सर्वात ज्येष्ठ कलासमीक्षक डॉ. गीता कपूर यादेखील होत्या. वयपरत्वे त्या खिडकीत बसायला जागा होती, तिथं बसल्या होत्या. याच पांढऱ्या चौकोनी खोलीच्या मधल्या भिंतीपासनं निखिलची सुरुवात झाली. स्वतच्या डावीकडे जात-जात तो खोलीच्या कोपऱ्यात, बेसिनपाशी आला. तो सुलेखनासारखे- किंवा किमान कोणत्यातरी अगम्य लिपीत लिहिल्यासारखे फराटे मारत होता फक्त. त्याची नजर जाईल तिथं हातातला ब्रशही जायचा आणि भिरीभिरी नजरेचा तो प्रवास फराटय़ातूनच कळायचा. तरीही, गीता कपूर यांच्यापर्यंत निखिल पोहोचला तोवर फार कुणाला या अनुभवाचा अर्थ लागू शकला नव्हता. त्यानंतर डॉ. कपूर यांना तिथून उठावं लागलं आणि अनेक प्रेक्षकांनी खोलीबाहेरच जाणं पसंत केलं, इतक्या प्रमाणात खोलीच्या सर्व भिंतींवर निखिल काम करू लागला होता.. ओल्या-काळय़ा रंगद्रावणानिशी त्यानं भिंतींवर, कोपऱ्यांमध्ये त्याची नजर खोलीभर कसकशी फिरली, याचा नकाशा किंवा कार्डिओग्रामसारखा एखादा वैद्यकीय प्रकारचा आलेखच रेखून ठेवला होता जणू.

त्या पहिल्या तास-दीड तासातून कळलं.. हा कैदी आहे. कोठडीत आणलं गेल्यावर, कोठडी ‘आपलीशी’ करण्याआधी- किंवा करण्यासाठी- त्याची नजर कोठडीभर फिरावी, तशीच निखिलची नजर फिरलीय.

पुढल्या ५०-५१ तासांत निखिल फराटेच मारत होता. जोरकस फराटे. त्या आवेशाचीच लय. कुठे तरी फट शोधतोय जणू, किंवा त्या भिंती त्याच्या फराटय़ांमुळेच नष्ट होतील, असं त्याला वाटतं आहे जणू. दुसऱ्या दिवशी दुपारी पाहिलं तर झोपला होता खोलीच्या मधोमध. खोली अर्धी काळी झाली होती. पण मध्येच, या खोलीच्या समोरच दिसणाऱ्या होडय़ा, जहाजं असे काही तपशील भिंतींवर उमटल्याचंही लक्षात येत होतं.

पुढे ती खोली पूर्णच काळी झाली. तिसऱ्या दिवशीची सकाळ झाली, खिडकीतून कवडसे झिरपू लागले, तेव्हा निखिलनं अंगभर काळी कफनी घातली होती. तो तिथून धावत सुटला, नाहीसा झाला.. तो (बहुधा कोचीतल्या त्याच्या निवास-स्थळी आराम वगैरे करून) दुसऱ्या दिवशी उगवला. कैदी त्या कोठडीतून पळून गेला होता. एकेकाळची ती पांढरी खोली आता खरोखरच ‘कोठडी’सारखी दिसू लागली होती. तिच्यात अंधारच वस्तीला आला होता. निखिलनं स्वत मात्र प्रकाश पाहिला होता.

या परफॉर्मन्सचं नाव ‘काळा मोती’ असं निखिलनं ठेवलं होतं. ते आधी जाहीरही झालं होतं. पण मोत्याऐवजी, शिंपल्याची कोठडीच खरी ठरली.

निखिलच्या त्याआधीच्या निसर्गरेखाटनांसारखं हे नव्हतं. इथं सुरुवातच, मिटवून टाकण्याच्या उद्देशानं झाली होती. थोडाफार निसर्ग दिसला, पण एरवी काळाच. निखिलही त्यात पूर्ण काळा झाला होता.

हा ‘प्रयोग’ म्हणून कसा होता, हे आजही सांगता येणार नाही. पण निखिल चोप्राचा चित्र-योग थांबलेला नाही, हे नक्की. परफॉर्मन्स आर्टच्या ‘माध्यमा’तून तो सुरूच आहे.

abhijit.tamhane@expressindia.com

अभिजीत ताम्हणे