11 December 2019

News Flash

प्रामाणिकपणाचा ‘योग’

या कलाकृतीचं नाव ‘द प्रॉबेबल ट्रस्ट रजिस्ट्री’ असं असून तिचं दृश्य-रूप हे तीन गोलाकार ‘काउंटर’वजा होतं.

 

शीर्षकात ‘योग’ असा उल्लेख केलाच कशाला असं व्हायला नको, म्हणून आधी एक खुलासा : रामदेवबाबाच नव्हे तर अगदी धीरेन्द्र ब्रह्मचारीसुद्धा भारतात ‘योगगुरू’ म्हणून ओळखले जात नव्हते; अशा काळात- सन १९७० मध्ये अ‍ॅड्रियन पायपर या अमेरिकी तरुणीनं योगाभ्यास सुरू केला आणि आजही- वय ६८ असूनही- योगाला अ‍ॅड्रियन यांनी अंतर दिलेलं नाही. मात्र योगाभ्यासाचा आणि त्यांचा संबंध तसा खासगीच असून त्या दृश्यकलावंत म्हणूनच अधिक ओळखल्या जातात. ‘अ‍ॅड्रियन पायपर रिसर्च आर्काइव्ह फाउंडेशन’ ही संस्था गेल्या दशकभरात त्यांनी बर्लिन शहरात स्थापली असून योग आणि पौर्वात्य-पाश्चात्त्य तत्त्वज्ञान या विषयांचा त्यांचा ग्रंथसंग्रह तिथे निवडल्या गेलेल्या अभ्यासकांसाठी खुला करण्यात येतो. तरीदेखील अ‍ॅड्रियन पायपर यांची मुख्य ओळख दृश्यकलावंत किंवा ‘संकल्पनात्मक कलावंत’ अशी आहे.

हा खुलासा वाचूनही ‘असं कसं काय?’ हा प्रश्न पडू शकतो. प्रश्न पडले पाहिजेत, प्रश्नांचा आदरही केला पाहिजे. म्हणून अ‍ॅड्रियन यांच्याबद्दल आणखी थोडं :

अ‍ॅड्रियन यांनी १९६९ सालात दृश्यकलेची पदवी घेतली होती आणि तत्त्वज्ञान विषयात १९७४ साली पदवी (बीए) तसंच १९८४ साली हार्वर्ड विद्यापीठातून पीएच.डी. केली होती. पुढेही अ‍ॅड्रियन यांनी झेन, तिबेटी (हीनयान) बुद्धधम्म असा अभ्यास सुरू ठेवला. मात्र योग किंवा पौर्वात्य अध्यात्माचा अभ्यास यांचा धंदा न मांडता १९६९ मध्ये घेतलेल्या कला-पदवीच्या आधारे त्यांनी निर्वाह चालवला. ‘संकल्पनात्मक कला’ किंवा ‘कन्सेप्च्युअल आर्ट’ हा कलाप्रवाह ज्या चित्रकारांमुळे ओळखला जातो, त्यांत अ‍ॅड्रियन पायपर यांनाही स्थान आहे. हा कला प्रकार ‘दृश्यकले’च्या व्यापक परिघातच मोजला जात असला, तरी रंग-रेषा-आकार-अवकाश यांची रचना करण्यावर न थांबता, तसंच ‘काय सांगायचं आहे?’ यावर न थांबता किंवा कलाकृतीमागचा आशय/ हेतू तपासण्यावरही समाधान न मानता, सौंदर्यशास्त्रीय प्रयोगांवर भर देणारा आणि त्यासाठी ‘कला’ ही मूलत: एक वैचारिक संकल्पना आहे, असं मानून त्या संकल्पनेचा विस्तार करणं हे काम अंगीकारणारा, असा प्रवाह म्हणजे ‘संकल्पनात्मक कला’ असं थोडक्यात सांगता येईल. आणखी खूप सोप्पेपणानं सांगायचं तर : ‘याला कला म्हणायचं का,’ असा प्रश्न जिच्यामुळे सामान्यजनांना भले पडेल; परंतु गांभीर्यानं किंवा अभ्यासूपणानं कलेकडे पाहणाऱ्यांना ‘ही कला आहेच’ हे नाकारताच आलेलं नाही- येणार नाही, अशा अनेक कलाकृती ‘संकल्पनात्मक कले’च्या प्रवाहातल्या असतात.

आता मुद्दय़ावर येऊ. शीर्षक पुन्हा वाचा. ‘प्रामाणिकपणाचा ‘योग.’’ म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर खुलासावजा भाषेत नाही देता येणार. या शीर्षकाचा संबंध एका कलाकृतीशी आहे. ती कलाकृती काय होती, हे त्यासाठी समजून घेऊ या. ‘व्हेनिस बिएनाले’ या जागातिक महाप्रदर्शनाच्या २०१५ सालच्या खेपेला भेट देणाऱ्या तब्बल पाच लाख प्रेक्षकांपैकी किमान काही हजार प्रेक्षक या कलाकृतीत प्रत्यक्ष ‘सहभागी’सुद्धा झाले होते. या प्रदर्शनाला जाण्याचा योग स्वत:च्या खिशाला खार लावल्यामुळे जुळवून आणता आला, त्यामुळे ही कलाकृती वाचकांना आत्ता फोटोत दिसते आहे त्याऐवजी प्रत्यक्ष पाहता आली, मुख्य म्हणजे तिच्या तीनपैकी दोन भागांत सहभागी होण्याचा निर्णयही घेता आला. त्यामुळे या कलाकृतीबद्दल इथं अधिकच आत्मीयतेनं लिहिलं जाणं स्वाभाविक आहे; ते टाळण्याचा प्रयत्न करून शक्यतो कोरडं वर्णन असं :

या कलाकृतीचं नाव ‘द प्रॉबेबल ट्रस्ट रजिस्ट्री’ असं असून तिचं दृश्य-रूप हे तीन गोलाकार ‘काउंटर’वजा होतं. ही तिन्ही काउंटर्स साधारण एकमेकांसमोरच होती, पण प्रत्येक काउंटरच्या समोर सुमारे बारा-पंधरा लोकांना उभं राहायला पुरेशी जागा होती आणि प्रत्येक काउंटरच्या मागे एक प्रशस्त भिंत होती. प्रत्येक काउंटरवर स्वागतकांसारखे तरुण वा तरुणी, मागच्या भिंतीवर सुवर्णवर्खायुक्त व्हिनाइल वापरून बनवलेल्या अक्षरांनिशी जे वाक्य तयार झालं होतं, त्या वाक्याची ‘प्रतिज्ञा’लोकांकडून नाव-पत्त्यासह लिहून घेत होते. ती तीन वाक्यं, किंवा त्या तीन ‘प्रतिज्ञा’ इंग्रजीत होत्या. पुढे कंसात त्यांचं मराठी रूपांतर दिलं आहे :

भाग पहिला : ‘आय विल ऑलवेज बी टू एक्स्पेन्सिव्ह टु बाय’ (मला कोणीही विकत घेऊ शकू नये, असे माझे आचरण नेहमी असेल)

भाग दुसरा : ‘आय विल ऑलवेज मीन व्हॉट आय से’ (मी नेहमी जे बोलेन, ते अर्थ लक्षात घेऊन आणि तसे वागण्याची तयारी ठेवूनच बोलेन)

भाग तिसरा : ‘आय विल ऑलवेज डू व्हॉट आय से आय विल डू’  (मी जे करेन असे म्हणेन, ते मी करेनच).

‘ही माझी प्रतिज्ञा आहे. आजपासून माझ्या वागण्यात फरक पडेल, किंवा मी नेहमीच तसे वागत असल्यास तेच वर्तन पुढेही टिकवण्याची जबाबदारी मी घेत आहे.’ अशा आशयाच्या छापील कागदावर तुमचं नाव, पत्ता, दूरध्वनी/ भ्रमणध्वनी, ईमेल असे सर्व तपशील अ‍ॅड्रियन पायपरनं (त्यांचा कोणताही गैरवापर होणार नाही, अशी स्पष्ट हमी देऊन मगच) जमा केले.

ही कलाकृती. एवढीच. यात कुठे आहे कला? त्यात ‘आजकालचं’ काय आहे?

स्वत्व टिकवणं, अशी आणि एवढीच संकल्पना या तिन्ही प्रतिज्ञांमधून दिसते. त्या अर्थानं ही ‘संकल्पनात्मक कलाकृती’ ठरते. परंतु हा झाला अभ्यासक/ दर्दी यांना समजणारा भाग. आपण प्रेक्षकांनीच जर विचार केला तर काय लक्षात येईल?

‘स्वत्व टिकवणं आजच्या काळात अवघड आहे.. आणि एखादी वर्तनशैली अंगी बाणवून अवघड गोष्ट साध्य करणं हे कलेचंच (मग ते नृत्य असो, गायन / अभिनय असो.. कोणत्याही कलेचं) एक तत्त्व आहे.. अ‍ॅड्रियन पायपर जगण्याच्या कलेबद्दल बोलू पाहते आहे आणि ती कला प्रत्येकानं आपापलीच विकसित केली पाहिजे हेही बजावते आहे’ असं काही तरी येईल का लक्षात कुणाच्या?

माहीत नाही. पण ज्यांना प्रतिज्ञा आठवत राहतील, त्यांना या ‘कलाकृती’बद्दलही आदर वाटत राहील.

अभिजीत ताम्हणे abhijit.tamhane@expressindia.com

First Published on December 4, 2016 12:45 am

Web Title: yoga practitioner artist adrian piper
Just Now!
X