28 November 2020

News Flash

अँटिबायोटिक प्रतिरोधाची त्सुनामी!

आरोग्य, प्राणिजगत आणि पर्यावरण या साऱ्यांशी संबंधित इतका दुसरा लक्षवेधी औषधप्रकार नाही.

प्रा. मंजिरी घरत

अँटिबायोटिक औषधांना दाद न देणारे कोडगे किंवा बंडखोर जिवाणू वाढू लागले, ही समस्या गेल्या तीन दशकांतली. त्याविषयी आपण काळजी घेऊ शकतोच. शिवाय, कोविडकाळात लावून घेतलेल्या चांगल्या सवयींचाही लाभ होऊ शकतो..

‘औषधांचे पथ्यपाणी’ या लेखासंदर्भात (३० ऑक्टोबर) वाचकांकडून ई-मेलवर अनेकविध प्रश्न आले. औषधविषयक जाणिवा सजग होताहेत, हे नक्कीच आशादायक चित्र आहे. औषधांच्या पथ्यपाण्याचाच आजचा पुढचा भाग, खास ‘अँटिबायोटिक्स’ (प्रतिजैविके) या औषधप्रकाराला वाहिलेला! जागतिक आरोग्य संघटनेने २०१५ पासून दरवर्षी नोव्हेंबरचा तिसरा आठवडा जागतिक ‘अँटिबायोटिक जनजागरण सप्ताह’ म्हणून यासंबंधी प्रबोधन करण्यासाठी सुरू केला. एखाद्या औषधप्रकाराला ‘वाचवण्यासाठी’ जागतिक व्याप्तीची मोहीम काढावी लागणे हे अभूतपूर्व आहे. डॉक्टर, रुग्ण, फार्मासिस्ट, फार्मा उत्पादक, पशुधनपालक, शेतकरी, पर्यावरणतज्ज्ञ, शासन, प्रशासन अशा विविध घटकांना विशेष लक्ष द्यावे लागणारी ही औषधे. आरोग्य, प्राणिजगत आणि पर्यावरण या साऱ्यांशी संबंधित इतका दुसरा लक्षवेधी औषधप्रकार नाही.

अँटिबायोटिक्स इतकी ‘खास’ का? मधुमेह, हृदयविकार वा इतर आजारांवरील औषधांपेक्षा अँटिबायोटिक्सचे माहात्म्य अधिक का? अँटिबायोटिक्स इतर औषधांपेक्षा वेगळी आहेत. ती शरीरातील विशिष्ट पेशी वा अवयवांवर काम करीत नाहीत, तर शरीरातील जिवाणूजन्य संसर्गाचा, उपद्रवी जिवाणूंचा (बॅक्टेरिया) नायनाट करणे हे त्यांचे काम असते. आजाराची तीव्रता, रुग्णाचे वय, इन्फेक्शनचा प्रकार बघून कोणते अँटिबायोटिक्स द्यायचे, हे ठरवायचे असते. पुन्हा त्याचा ठरावीक कोर्सही असतो. जेव्हा अँटिबायोटिक्सचा कमी वा अति, चुकीचा वापर होतो, तेव्हा रुग्णाच्या शरीरातील जिवाणूंना अँटिबायोटिक्सची काम करण्याची पद्धत जोखण्याची मुबलक संधी मिळते. या संधीचा फायदा उठवण्यात मोठे ‘स्मार्ट’ असतात हे सूक्ष्म जीव! अत्यंत चतुरपणे मग ते स्वत:ला बदलवतात (म्युटेशन). मग त्या औषधाला चकवा देणाऱ्या प्रजाती ते तयार करतात. थोडक्यात, त्यांच्या नवीन पिढय़ा या निर्ढावलेल्या असतात. पूर्वी त्या जिवाणूंना लीलया नामोहरम करणाऱ्या अँटिबायोटिकची परिणामकारकता या कोडग्या जंतूंपुढे कमी होते, संपतेदेखील. यालाच म्हणतात प्रतिजैविक प्रतिरोध किंवा अँटिबायोटिक रेझिस्टन्स. आजमितीला १०० हून अधिक अँटिबायोटिक्स असली तरी त्यातली ‘चालणारी’ (परिणामकारक) फारच थोडी उरली आहेत. हे कोडगे जंतू- सुपरबग्ज- यथावकाश समाजात इतस्तत: संक्रमित होतात व प्रतिरोध ही समस्या वैयक्तिक नाही तर सामाजिक आरोग्याची बाब होते. केवळ एकटय़ा अमेरिकेत २८ लाख ड्रग रेझिस्टन्ट इन्फेक्शन्स दरवर्षी होतात आणि ३५ हजार रुग्ण मृत्यू पावतात.

समजा मधुमेहाचे औषध त्या रुग्णाने अयोग्य वापरले किंवा डॉक्टरांनी अतार्किक उपचार केले, तरी त्याचा त्रास हा त्या रुग्णालाच होतो, समाजाला नाही; किंवा ते औषधही निकामी होत नाही. अँटिबायोटिक्सबाबत मात्र सर्व गणित वेगळे आहे. हे केवळ मानवी औषधोपचार, आरोग्याच्या कक्षेतच सीमित राहत नाही. अन्नोत्पादक प्राण्यांमध्येही (कोंबडय़ा, दूधदुभते देणारी जनावरे) मानवी रुग्णांमध्ये वापरतो तीच अँटिबायोटिक्स वापरली जातात. प्राण्यांना इन्फेक्शन झाल्यावर वापरायच्या या औषधांचा गैरवापर अनेकदा प्राण्यांच्या प्रतिबंधात्मक आणि वाढीसाठी (ग्रोथ प्रमोटर) होतो. त्यामुळे अँटिबायोटिकचा अंश आणि अँटिबायोटिक प्रतिरोधक जंतू यथावकाश अन्नसाखळीत येतात, नकळत आपल्या शरीरात जातात. अँटिबायोटिक्सचा आपल्यावरील हा मारा इथेच नाही थांबत. फार्मा उद्योगाकडून आणि मानवी मलमूत्रातून फेकले गेलेली किंवा नको असलेली अँटिबायोटिक्स पर्यावरणात मुरत जातात. भूमी, पाणी, सांडपाणी यांतील अँटिबायोटिक्स अंश किंवा बंडखोर जंतू आपल्यापर्यंत अन्नसाखळीतून परततात. रुग्णालयांमध्ये योग्य काळजी न घेतल्याने रेझिस्टन्ट इन्फेक्शन्स होण्याचे प्रमाण रुग्णांप्रमाणेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांतही बरेच असते, अतिदक्षता विभाग हा अनेक रेझिस्टन्ट जंतूंचा ‘हॉटस्पॉट’ असू शकतो.

१९३० च्या दशकात ‘पेनिसिलीन’ या अँटिबायोटिकचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग या वैज्ञानिकाने लावला अन् अँटिबायोटिक युग सुरू झाले. त्यानंतर अनेक जंतुप्रादुर्भावावर आपण काबू मिळवला. अँटिबायोटिक्स ही वरदान ठरली. साधारण १९८० सालापर्यंत अँटिबायोटिक्सचे सुवर्णयुग राहिले. ‘पेनिसिलीन’, ‘टेट्रासायक्लिन’, ‘सिप्रोफ्लोक्सासिन’, ‘अझिथ्रोमायसिन’ अशी अनेक अँटिबायोटिक्स उदयास आली. पण याच काळात अँटिबायोटिक्सचा अतार्किक वापरही वाढत गेला. प्रत्येक किरकोळ इन्फेक्शन किंवा आजारावर गरज असो नसो, अँटिबायोटिक्स वापरली जाऊ लागली. आर्थिकदृष्टय़ा फारसे आकर्षक नसल्याने नवीन अँटिबायोटिक्सबाबत संशोधनही थंडावले. पेनिसिलीनपूर्व जगात अँटिबायोटिक्स नसल्याने; तर आज अनेकविध अँटिबायोटिक्स असूनही मानव हतबल आहे. ही सारी परिस्थिती आपण आपल्या चुकांनी ओढवून घेतली आहे. आज आपण ‘डेंजर झोन’मध्ये आहोत. धोरणात्मक पातळीवर निर्णय होत आहे, ‘नॅशनल अँटिबायोटिक अ‍ॅक्शन प्लॅन’ शासनाने केला आहे; पण इतर देशांच्या मानाने आपण या समस्येला न्याय दिलेला नाही. अँटिबायोटिक्स वापरात भारत जगात अग्रेसर आहे. अँटिबायोटिक्सची अतार्किक औषधमिश्रणेही बाजारात आहेत. ‘मागील पानावरून पुढे’ अँटिबायोटिक्सच्या गैरवापराची कथा तशीच चालू आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहक व रुग्णांची भूमिकाही महत्त्वाची आहे.

काही अँटिबायोटिक्स विशिष्ट जिवाणूंविरुद्धच (नॅरो स्पेक्ट्रम) काम करतात. तर काही अँटिबायोटिक्स ही अनेकविध जिवाणूंसाठी (ब्रॉड स्पेक्ट्रम) कर्दनकाळ ठरतात. अँटिबायोटिक्स चालू केले की कोर्स पूर्ण न करण्याकडे अनेकांचा कल असतो. समजा घशाचे इन्फेक्शन झाले आहे, डॉक्टरांनी पाच दिवसांचा १० गोळ्यांचा कोर्स दिला आहे. पहिल्या तीन/चार डोसमध्येच जर रुग्णाला बरे वाटू लागले तर पुढचे डोस टाळले जातात. हे ‘बरे वाटणे’ व ‘बरे होणे’ यांत फरक असतो. तात्पुरते बरे वाटले तरी जिवाणूंचा पूर्ण नायनाट न झाल्याने पुढे कधी तरी बंडखोर जिवाणू परत डोके वर काढतात, तीव्र इन्फेक्शन होऊ शकते. मग अधिक मोठी, महागडी अँटिबायोटिक्स वापरावी लागतात. अँटिबायोटिक्स ही स्वत:च्या मनाने घ्यायची नाहीत. सर्दी हे विषाणूजन्य इन्फेक्शन असून त्याला अँटिबायोटिक्सचा काही उपयोग नसतो. किरकोळ पोट बिघडले तरी ओरल रिहायड्रेशन सॉल्ट्स (जलसंजीवनी) न वापरता थेट ‘ओफ्लोक्सासिन’सारखे अँटिबायोटिक्स घे, घसा जरा खवखवू लागला तर जाऊन ‘अझिथ्रोमायसिन’ घे, असे अँटिबायोटिक्सचा ‘हौसेने’ वापर करणारे रुग्ण सर्वत्र आढळतात. अर्थात, त्यांना आपण अँटिबायोटिक्स वापरत आहोत याची जाणीव वा त्याचे गांभीर्य माहीत असतेच असे नाही. त्यामुळे फार्मासिस्टची जबाबदारी इथे अधिक आहे. रुग्णाला योग्य प्रकारे समजावण्याचे आव्हान फार्मासिस्टपुढे आहे. प्रिस्क्रिप्शनशिवाय अँटिबायोटिक्सची विक्री करता कामा नये. डॉक्टरांनीही अँटिबायोटिक लिहून देताना अतिशय तर्कसुसंगत असणे गरजेचे आहे. अँटिबायोटिकची गरज आहे का, असल्यास नॅरो स्पेक्ट्रम अँटिबायोटिक पुरेसे होणार असताना उगाच ब्रॉड स्पेक्ट्रम वापरणे म्हणजे सुरीने काम होणार असताना विनाकारण तलवार उपसण्याजोगे आहे. ‘मेरोपीनीम’सारखी अगदी ‘शेवटचा उपाय’ (लास्ट रिसॉर्ट) अँटिबायोटिक्सही निष्प्रभ होताहेत. भात्यातील अस्त्रे जपूनच वापरायला हवीत, परदेशांत अँटिबायोटिक ‘प्रिस्क्राइब’ करायचे तर डॉक्टरना स्पष्टीकरण लिहून द्यावे लागते.

कोविडमुळे अँटिबायोटिक प्रतिरोध समस्येत काही फरक पडला असेल का? स्वच्छतेच्या सवयी समाजात वाढल्या, हात धुणे, खोकताना/ शिंकतानाची काळजी, मुखपट्टी यांमुळे पचनसंस्थेची आणि श्वसनमार्गाची इन्फेक्शन्स नक्कीच कमी झाली असणार. कोविडपर्व संपल्यावरही या सवयी कायम ठेवल्यास अँटिबायोटिक्स वापर व प्रतिरोध कमी होण्यास नक्की मदत होईल. ‘गेल्या शंभर वर्षांतील वैद्यकीय प्रगतीला मातीमोल करेल अशी अँटिबायोटिक प्रतिरोधाची त्सुनामी आपल्यावर हळूहळू स्वार होत आहे,’ हे उद्गार आहेत जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. ट्रेडोस यांचे. या त्सुनामीला रोखायचे तर धोरणकर्त्यांपासून ते डॉक्टर, रुग्ण प्रत्येकाने या विषयाचे गांभीर्य ओळखून पावले उचलायला हवीत. नाही तर सूक्ष्मजीवांकडून मानवाची हार निश्चित आहे.

’अँटिबायोटिक्स ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेण्याची औषधे आहेत; स्वमनाने नाही.

’इतर प्रिस्क्रिप्शन औषधांप्रमाणेच अँटिबायोटिक्सच्या औषधांच्या लेबलवर डावीकडे तांबडी रेघ,

Rx ही खूण, शेडय़ुल एच किंवा एच१ असे चौकटीत लिहिलेले असते.

’डॉक्टरांकडून निघताना प्रिस्क्रिप्शनमध्ये अँटिबायोटिक्स लिहिले आहे का, असल्यास कोणते, त्याचा कोर्स किती दिवसांचा हे जाणून घ्यावे, फार्मसीत फार्मासिस्टलाही याबाबत विचारावे.

’जरी त्वरित बरे वाटू लागले तरी अँटिबायोटिक्सचा सांगितलेला कोर्स अर्धवट सोडू नये.

’काही अँटिबायोटिक्सचा आतडय़ातील मित्रजंतूंच्या वसाहतीवर परिणाम होऊन अतिसार झाल्यास, उपयुक्त जिवाणू-पुरवठय़ासाठी प्रोबायॉटिकसारखी उत्पादने फार्मासिस्ट/ डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी.

’मुळात इन्फेक्शन्स होऊ नयेत यासाठी वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयी पाळाव्यात.

लेखिका औषधनिर्माणशास्त्राच्या प्राध्यापक आहेत.

ईमेल : symghar@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2020 12:59 am

Web Title: antibiotics medicine antibiotic awareness week zws 70
Next Stories
1 औषधांचे पथ्य-पाणी..
2 अ‍ॅलर्जी : आडाख्यांपलीकडची ओळख
3 सोडियम-पोटॅशियमची ‘नमकीन’ गोष्ट
Just Now!
X