News Flash

‘अंतिम मुदती’ची काळजी कशासाठी?

आयड्रॉप्स, ड्राय सिरप यांसारख्या काही औषध प्रकारांना दोन एक्स्पायरी असतात.

प्रा. मंजिरी घरत

औषध आणि आरोग्य यांविषयीच्या समकालीन प्रश्नांची चर्चा करणाऱ्या पाक्षिक सदरातला हा पहिलाच लेख, औषधांच्या अंतिम मुदतीची ‘काळजी कशाला?’ अशा बेफिकीर प्रश्नांना लगाम घालणारा आणि काळजी नेमकी कशासाठी हवी, हे सांगणारा..

समाजमाध्यमांवर गेल्या काही महिन्यांपासून औषधांच्या अंतिम मुदतीविषयी एक संदेश फिरत आहे. ‘एक्स्पायरीनंतरही औषधे कशी उत्तम स्थितीत असतात’ याविषयीचे दाखले आणि ‘अंतिम मुदत हा फार्मा उद्योगाने त्यांच्या फायद्यासाठी केलेला प्रकार असावा’ अशा काही बाबी त्या संदेशात नमूद केलेल्या आहेत. तेव्हापासून याबाबत नेमकी वस्तुस्थिती काय, अशी सतत विचारणा ग्राहकांकडून तर होतेच आहे; पण अनेक डॉक्टरांनीही अंतिम मुदतीविषयी नेमके शास्त्रीय सत्य काय, असे विचारले. म्हणून या लेखमालेचा पहिला लेख अंतिम मुदतीविषयी!

औषध वापरण्याची कमाल कालमर्यादा म्हणजे त्याची अंतिम मुदत वा एक्स्पायरी. या मुदतीनंतर औषधाची उपयुक्तता संपुष्टात येते. उत्पादन तारखेपासून साधारणत: एक ते पाच वर्षांच्या कालावधीत बहुतेक औषधांची एक्स्पायरी असते. पूर्वीपासून अ‍ॅलोपॅथिक आणि आता अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक औषधांवरही अशी मुदत लेबलवर नमूद करणे कायद्याने बंधनकारक आहे.

अशी अंतिम तारीख का असते? प्रत्येक औषध हे एक रसायन आहे. जर औषधांचे विघटन वा इतर काही रासायनिक फेरफार झाले तर औषधांची गुणकारकता कमी होऊ  शकते. दुष्परिणामही होऊ  शकतात. मूळ औषधी द्रव्यात इतर अनेक सहायक घटक मिसळून त्याला वेगवेगळ्या ‘डोसेज फॉर्म’चे अंतिम स्वरूप दिलेले असते. हवा, तापमान, आद्र्रता अशा अनेक गोष्टींचा औषधावर व या सहायक घटकांवरही सतत परिणाम होत असतो. त्यामुळे अंतर्गत विघटन, रंग-रूप-चवीत बदल, जंतूंची लागण असे काही दृश्य वा अदृश्य बदल होऊ  शकतात. हे लक्षात घेऊन प्रत्येक औषधाची निर्मिती करताना ते नेमके किती काळासाठी सुरक्षित व प्रभावी राहणार आहे, याचा अभ्यास (स्टॅबिलिटी स्टडी) करून त्याचे आयुर्मान (शेल्फ लाइफ) ठरवले जाते. या शेल्फ लाइफचा शेवट म्हणजे त्याची एक्स्पायरी. लेबलवर लिहिलेल्या औषधाच्या प्रमाणातील किमान नव्वद टक्के औषध एक्स्पायरी तारखेपर्यंत उत्तम रासायनिक स्वरूपात टिकून असते व ते अपेक्षित परिणाम साधू शकते, अशी ग्वाही उत्पादक या अंतिम तारखेद्वारे देत असतो. औषध तेच असले तरी त्याच्या वेगवेगळ्या डोसेज फॉर्मला (टॅब्लेट्स, सिरप, मलम वगैरे) वेगवेगळी अंतिम मुदत असू शकते. एक्स्पायरी एक किंवा दोन महिन्यांवर आली की औषध दुकानात फार्मसिस्ट शेल्फवरून ती औषधे काढून स्वतंत्र ‘एक्स्पायरी कक्षा’मध्ये ठेवतात. तेथून ही औषधे परत पाठवली जातात. औषधे विकत घेताना अंतिम मुदत वाचून खात्री करणे हे प्रत्येक जागरूक ग्राहकाचे कर्तव्य आहे. पण विनाकारण ‘ताज्या’ औषधांचा आग्रह धरणेही उचित नाही. उत्पादन तारीख जरी समजा २-३ वर्षांपूर्वीची असली तरी अंतिम मुदतीपर्यंत औषध उत्तम, गुणकारी व सुरक्षित असते. आयड्रॉप्स, ड्राय सिरप यांसारख्या काही औषध प्रकारांना दोन एक्स्पायरी असतात. एक अर्थातच नेहमीची उत्पादन तारखेपासूनची अंतिम मुदत आणि दुसरी औषध उघडून वापरण्यास सुरुवात केल्यापासूनची. आयड्रॉप्स, डोळ्यांमध्ये घालण्याच्या क्रीम्स हे सहसा एक महिन्याच्या आतच वापरायचे असतात. त्यासंबंधी लेबलवर सूचना असते. घरात औषधे कशी/कुठे ठेवतो, कशी वापरतो यावरही औषधाचे भवितव्य ठरते. औषधांची साठवण जर उन्हात, गॅसपाशी, दमट वातावरणात झाली असेल, तर ‘एक्स्पायरी’च्या आधीच औषध खराब होईल. जर नियमित घेण्याची औषधे असतील तर ती रोजच्या रोज घेतली जाऊन संपतात; बाकी कधी तरी लागणारी औषधे भारंभार विकत घेऊच नयेत. घरात कोरडय़ा व थंड ठिकाणी प्रकाशापासून दूर सर्व औषधे ठेवावीत.

उत्पादकाने दिलेली अंतिम तारीख झाली की लगोलग दुसऱ्या दिवशी औषध खरंच टाकाऊ  होते का? समाजमाध्यमांतल्या (वर उल्लेख केलेल्या) ‘फॉर्वर्डस’मुळे तर अधिकच संभ्रम वाढलेत. या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ किंवा ‘नाही’ असे त्रोटक आणि निर्णायक नाही. या संदर्भात झालेले दोन महत्त्वाचे अभ्यास म्हणजे अमेरिकी अन्न आणि औषध प्रशासनाने तेथील लष्करासाठी केलेली १२२ मुदतबाह्य़ झालेल्या औषधांची चाचणी. यापैकी ९० टक्के औषधांमधील औषधीद्रव्य (अ‍ॅक्टिव्ह इन्ग्रेडियंट) योग्य प्रमाणात- म्हणजे लेबलवर लिहिलेल्या प्रमाणाच्या ९० टक्के होते. म्हणजे त्यांची क्षमता योग्य होती. त्याआधी २०१२ मध्ये कॅलिफोर्निया विषनियंत्रण केंद्राने, दहा वर्षांपूर्वीच मुदतबाह्य़ झालेल्या १४ औषधांची चाचणी केली. या १४ पैकी १२ औषधांत औषधी द्रव्याचे प्रमाण योग्य होते. हे दोन महत्त्वाचे अभ्यास आपल्याला अंतिम तारखेच्या संकल्पनेबाबत शंका निर्माण जरूर करतात. पण काही फार महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. वरील चाचण्यांमध्ये औषधाचे प्रमाण योग्य आढळले; पण त्याची परिणामकारकता किंवा त्यात काही इतर घटक द्रव्ये तयार झाली होती का, हे पाहण्यात आले नव्हते. सर्व औषधे आपापल्या मूळ पॅकिंगमध्ये सीलबंद होती, उघडलेली नव्हती. योग्य तापमान आणि नियंत्रित आद्र्रतेमध्ये साठवण केलेली होती. सर्व औषधे टॅब्लेट्स आणि कॅप्सूल होत्या, जे द्रवरूप औषधांपेक्षा कधीही अधिक स्थिर असतात. यावरून या अभ्यासाच्या मर्यादा लक्षात याव्यात.

काही औषधे- उदाहरणार्थ इन्सुलिन, नायट्रोग्लिसरीन, अ‍ॅड्रिनालिन, अँटिबायोटिक्स ही मुदतीनंतर लवकरच मोठय़ा प्रमाणात विघटित होतात, हे सिद्ध झालेले आहे. द्रवरूप औषधेही अंतिम तारखेनंतर – किंवा योग्य साठवण केली नाही तर त्याआधीच- विघटित होण्यास सुरुवात होते. बाकी अनेक औषधे समजा आवश्यक प्रमाणात टिकून राहत असतीलही, पण त्यात काही इतर उपद्रवी घटक द्रव्ये तयार होत नसतीलच असे नाही. मुदतबाह्य़ झालेल्या टेट्रासायक्लीन अँटिबायोटिकमध्ये तयार झालेल्या विषारी द्रव्यांमुळे मूत्रपिंडे निकामी झाल्याची उदाहरणे आहेत. अ‍ॅस्पिरिनमध्ये सॅलिसिलिक अ‍ॅसिड तयार होऊ  शकते. आयड्रॉप्सच्या उघडलेल्या बाटलीत एक महिन्यानंतर जंतूंची वाढ होऊ  शकते.

सारांश, अंतिम तारखेनंतर औषध लगोलग टाकाऊ  होत नसेलही; पण ते परिणामकारक, सुरक्षित राहील असे नाही. याबाबत स्वतंत्रपणे अधिक संशोधन होणे गरजेचे आहे आणि हे सिद्ध झाले तर त्याप्रमाणे फार्मा उत्पादकांना बदल करावे लागतील. तात्पर्य हेच की, अंतिम मुदतीचे बंधन पाळणे इष्ट!

मुदतबाह्य़ औषधांच्या विल्हेवाटीसाठी परदेशांतील ग्राहकांसमोर नेमके कोणते पर्याय असतात, याची चर्चा पुढील लेखात.

‘औषधभान’ ते ‘आरोग्यनामा’..

नवीन दशक चालू झाले. मागच्या दशकाच्या सुरुवातीस वर्षभर ‘औषधभान’ ही लेखमाला लिहिली होती. २०११ मध्ये लिहिलेल्या त्या लेखमालेचा उद्देश औषधसाक्षरता रुजवणे, औषधांच्या सजग वापराविषयी ग्राहकांना संवेदनशील करणे असा होता. गेली अनेक वर्षे फार्मसी क्षेत्रात लोकल/ग्लोबल पातळीवर काम करत असताना बाहेरच्या जगात आरोग्य क्षेत्रात होणारी प्रगती, तेथील रुग्णकेंद्रित सुस्पष्ट धोरणे व त्याची तंतोतंत अंमलबजावणी, फार्मासिस्टची सातत्याने विस्तारणारी भूमिका, तेथील शिक्षण क्षेत्रात होणारे कालानुरूप बदल, आधुनिक तंत्रज्ञानाने आरोग्य क्षेत्रात होऊ घातलेली क्रांती हे सर्व जाणून घेण्याची संधी सातत्याने मिळत गेली. बाहेरच्या देशात आरोग्य क्षेत्रात सर्व आलबेल आहे, अनुकरणीय आहे असे मुळीच नाही; पण जाणवणारे सर्वात मुख्य वैशिष्टय़ म्हणजे तेथील आरोग्यविषयक धोरणे आणि व्यवस्था या रुग्ण सुरक्षेप्रति खूप संवेदनशील असतात. या पार्श्वभूमीवर आपली परिस्थिती फार वेगळी आहे हे सांगायची गरज नाहीच. ‘आरोग्यनामा’चा उद्देश- जागतिक स्तरावर औषध/आरोग्य क्षेत्रात ज्या चांगल्या प्रथा, धोरणे आहेत, काही नवीन घडामोडी आहेत (किंवा काही फसवणुकीही) त्यांची माहिती करून देऊन आपल्याकडेही असे असावे किंवा असे होऊ  शकते यासंबंधीची विचारप्रक्रिया चालू करणे, हा आहे. याखेरीज काही नैमित्तिक महत्त्वाचे आणि अँटिबायोटिक प्रतिरोधसारखे दुर्दैवाने आजही चिंतेच्या असलेल्या विषयांचीही यात चर्चा करणार आहोतच. आपल्याला महत्त्वाचे वाटणारे काही विषय, सूचना असल्यास जरूर कळवा, ही वाचकांना विनंती!

लेखिका औषधनिर्माणशास्त्राच्या प्राध्यापक आहेत. ईमेल : symghar@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2020 4:53 am

Web Title: article about medicine and health zws 70
Just Now!
X