19 January 2021

News Flash

‘वयस्कर’ होताना..

आयुष्यमान जरी वाढले तरी आयुष्याची वाढलेली वर्षे ही निरोगी राहण्याचे प्रमाण कमी झाले

(संग्रहित छायाचित्र)

प्रा. मंजिरी घरत

घरातल्या वयस्कर, ज्येष्ठ व्यक्तींच्या व्याधी, मग त्यासाठी अनेकपरींची औषधे नि गोळ्या, त्यांचे वेळापत्रक पाळण्यातली तारांबळ.. हे नेहमीचेच, पण टाळता येण्यासारखे असते. त्याहीपेक्षा, वृद्धत्वी होणारा त्रास टाळण्यासाठी प्रयत्न चांगलेच. पण सध्या वृद्धांनी आणि वृद्धांची काळजी घेणे हे आपणा सर्वाना शक्य आहे..

अलीकडे एका आंतरराष्ट्रीय (आभासी) मीटिंगमध्ये बोलताना, एक स्विस सहकारी कोविडविषयी सहज म्हणाली, ‘‘आफ्रिका खूप तरुण आहे, ६० टक्के आफ्रिकन २५ वर्षांच्या आत आणि सरासरी वय फक्त १९ आहे, तुम्ही आणि आम्ही (आशिया व युरोप) फार वृद्ध आहोत, आणि हेही एक कारण आहे आफ्रिकेत कोविडचे प्रमाण तुलनेने कमी असण्याचे.’’ – अरे हो, खरेच की! – अशी सर्वाचीच साहजिक प्रतिक्रिया झाली.

आपला आजचा विषय कोविड नव्हे, निरोगी वार्धक्य आहे. मानवी इतिहासात प्रथमच वृद्धांची (६० वा ६५ हून जास्त वय) संख्या अधिक झाली आहे. ‘वार्धक्याची त्सुनामी’ असे या परिस्थितीचे वर्णन केले जाते. वैद्यकीय सुविधांची उपलब्धता, औषधोपचारांतील प्रगती यामुळे अनेक आजारांवर आपण मात केली किंवा नियंत्रण मिळवले. सरासरी आयुष्यमान वाढले, ८०-९० वर्षांपर्यंत आयुष्य ही नवलाईची बाब राहिली नाही. साधारण ७० कोटी वृद्ध लोक सध्या जगात आहेत. जपानमध्ये सर्वाधिक म्हणजे २८ टक्के लोक पासष्टी पार केलेले आहेत तर इटलीत २३ टक्के, पोर्तुगालमध्ये २२ टक्के, अमेरिकेत १६ टक्के, चीनमध्ये १२ टक्के. भारतात आज साधारण ८ टक्के; पण आणखी तीन दशकांत हे प्रमाण २० टक्के होणार असा अंदाज आहे. आज १२ कोटींहून जास्त वृद्ध भारतात आहेत.

आयुष्यमान जरी वाढले तरी आयुष्याची वाढलेली वर्षे ही निरोगी राहण्याचे प्रमाण कमी झाले. वृद्धांचे आरोग्य (जेरिअ‍ॅट्रिक मेडिसिन) या विषयात काम करणारे प्रा. आइसयक यांनी सन १९६५ मध्ये, ‘‘वार्धक्यातील राक्षस’ म्हणजे चलनवलनावर येणाऱ्या मर्यादा, बौद्धिक क्षमतेवर परिणाम, विस्मरण’ असे सांगितले. नंतरच्या काळात यासोबतच नैराश्य, चिंता, निद्रानाश, अल्झायमर, पडणे, हाडे मोडणे, गुडघेदुखी अशा समस्या दिसतात. वयपरत्वे यकृत, किडनी यांचे काम मंदावते; स्नायूंची बळकटी घटते, त्यामुळे औषधे देताना याचा विचार करून द्यावी लागतात, याला औषधोपचार दृष्टीने विशेष परिस्थिती (स्पेशल सिच्युएशन) म्हणतात. वाढणारे वय, वाढत्या व्याधी आणि वाढती औषधे असे समीकरण झाले. ४० ते ५० टक्के रुग्णांमध्ये मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, संधिवात, नैराश्य असे विविध आजार एकत्र असतात. त्यामुळे पॉलीफार्मसी म्हणजे साधारण पाचहून अधिक औषधे दररोज घ्यावी लागणे हे चित्र घरोघरी आहे. औषधांच्या वाढत्या संख्येसोबत औषधाचे दुष्परिणाम, एका औषधाची दुसऱ्या औषधाशी आंतरक्रिया याचे प्रमाणही वाढते.

घटती स्मरणशक्ती, कमी दिसणे, अनेक औषधांनी उडणारा गोंधळ, एवढी औषधे घेण्यास येणारा कंटाळा यामुळे औषधे योग्य वेळी, अचूकतेने घेतली जात नाहीत आणि उपचारातील अपेक्षित यश मिळत नाही. औषधे वेळेवर घेतली जावीत म्हणून काय काय करता येते? फार्मासिस्ट वा इतर आरोग्य व्यावसायिकाने रुग्ण किंवा रुग्णाची काळजी घेणाऱ्या कुटुंबीय/ सहायकास औषधाचे उपयोग, त्याच्या वेळा, ते कसे घ्यायचे याबद्दल नीट समजावून सांगणे गरजेचे असते. टेलिफोनिक रिमाइंडर्स, मोबाइलवर अलार्म लावणे, औषधाचे वेळापत्रक कॅलेंडरवर किंवा तक्ता स्वरूपात रुग्णास लिहून देणे, गोळ्यांच्या स्ट्रिपवर मार्कर पेनाने वेळा लिहून ठेवणे, वेगवेगळ्या वेळी घ्यायच्या औषधांसाठी वेगळी पिशवी/ बॉक्स असे काही उपाय औषधे वेळच्या वेळीच घेण्यासाठी यासाठी करता येतात.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून परदेशात इलेक्ट्रॉनिक माध्यमातूनही औषधवेळांचे स्मरण देण्यासाठी नवनवीन साधने येत आहेत. गोळ्या घेण्यास विसरणे जसे नेहमीचेच, तसे आपण गोळी घेतली नाही असे वाटून पुन्हा गोळी घेतली जाते, हेही अनेकदा होणारे. यावर, कुटुंबीय किंवा मदतनीससमोर रुग्णाने औषधे घेणे किंवा त्यांनीच वेळापत्रकप्रमाणे औषधे देणे हा एक उपाय असतो. ‘डोस डिस्पेंसिंग एड’ म्हणजे औषध घेण्यास सुकर व्हावे, एकही गोळी विसरली जाऊ नये किंवा डबल घेतली जाऊ नये यासाठी तयार केलेली साधने. यामध्येही परदेशात वेगवेगळे प्रकार आहेत, पण आपल्याकडे छोटे हवाबंद कप्पे असलेले ‘पिल बॉक्स’ उपलब्ध आहेत. गोळ्यांच्या स्ट्रिप्समधून काढून वेळापत्रकानुसार सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र अशा वेगवेगळ्या कप्प्यांत सुटय़ा गोळ्या ठेवता येतात. पण असे पिल बॉक्स भरणाऱ्या व्यक्तीने नीट अभ्यासून, अचूकपणे हे करायला हवे! बॉक्समधील कप्प्यांची झाकणेही नीट बंद करायला हवीत.

ज्यांनी प्रयत्नपूर्वक आरोग्य जपले आहे आणि अर्थातच नैसर्गिकरीत्या जनुकांची साथ आहे ते बऱ्यापैकी आरोग्ययुक्त, औषधमुक्त दीर्घायुष्य जगतात. त्यांचे ‘वय’ दिसत नाही. औषधांच्या कुबडय़ा कमीत कमी लागाव्यात, आरोग्यसंपन्न वृद्धत्व असावे, मन- मेंदू- शरीर कार्यक्षम कृतिशील (फन्क्शनल अ‍ॅबिलिटीज टिकवणारे) राहावे, यासाठी ते विकसित करण्याची निरंतर प्रक्रिया म्हणजे ‘हेल्दी एजिंग’ (निरोगी वृद्धत्व). खरे तर ही प्रक्रिया आपण आईच्या पोटात असतानाच चालू होते- ‘आरोग्य कुंडली’ काही प्रमाणात तिथेच बनते. पण अर्थात बाह्य घटकही तितकेच महत्त्वाचे. जनुके आणि बालपण, तारुण्य व मध्यमवयात असलेली जीवनशैली, सभोवतालची परिस्थिती, हे सारे आयुष्याची संध्याकाळ कशी असेल हे ठरवत असते. त्यात आहार, विहार, विचार सगळे आले. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर व्यायाम, आहार, वजन नियंत्रण, व्यसनापासून दूर राहणे, ताणतणाव व्यवस्थापन, पुरेशी झोप, वार्षिक वैद्यकीय तपासणी या बाबींचे महत्त्व आहेच.

मानसिक, बौद्धिक क्षमता टिकाव्यात यासाठी काय करावे, काय करू नये यावर खूप संशोधन चालू आहे. विस्मरण, अल्झायमरसारख्या समस्या, लक्षणे दिसायच्या खूप आधी मेंदूत पेशींचा ऱ्हास चालू होतो असे आता मानले जाते. मेंदूला ‘खाद्य’ पुरवणे, त्याला काही नवीन शिकण्याचे आव्हान देणे गरजेचे असते. ‘वापरा नाही तर विसरा’ (यूज इट ऑर लूज इट) असा काहीसा प्रकार मेंदूच्या पेशींबाबत असतो. योगाभ्यास, छंद जोपासणे, संगीत, एकलकोंडेपण टाळणे, मित्रमैत्रिणींचा सहवास (सोशलायझेशन), सजगता बाळगणे या साऱ्याचा मेंदूवर सकारात्मक परिणाम दिसून येतो. मनातल्या मनात नव्हे, तर मोठय़ांदा उच्चारत रोज थोडा वेळ नियमाने काही श्लोक, पाढे किंवा काही वाचन करणे यामुळे स्मरणशक्ती चांगली राहण्यास मदत होते आणि हे कोणत्याही वयात उपयुक्त ठरते, असे संशोधकांनी दाखवून दिले आहे. आपल्या पूर्वजांच्या दैनंदिनीचा हा एक भाग होताच; आपणही ही सवय जाणीवपूर्वक जोपासली पाहिजे. स्मार्टफोनचा वापर, समाजमाध्यमे यांत आपण सारेच फार गुंतून पडत आहोत, त्याचे दुष्परिणाम स्मरणशक्ती, मन एकाग्र करण्याची क्षमता अशा बऱ्याच क्षमतांवर होत आहेत, हे लक्षात घेऊन त्याचा मर्यादित वापर, अधूनमधून ‘डिजिटल डीटॉक्स’ यासाठी प्रयत्नशील राहणे खूप आवश्यक आहे. आतडय़ातील सूक्ष्म जीवांचे महत्त्व हे अनेकविध कारणांसाठी आहे हे आपण ‘आरोग्यनामा’च्या लेखांमध्ये पाहिले आहेच. पुन्हा एकदा नमूद करावेसे वाटते की, मेंदूचे आरोग्य सांभाळण्यासाठीही आतडय़ातील उपयुक्त सूक्ष्म जीवांशी मैत्र जोपासले पाहिजे.

२०२० ते २०३० हे ‘निरोगी वाध्र्यक्यासाठीचे दशक’ म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने अलीकडेच जाहीर केले. प्रत्येक देशात शासन, सामाजिक आणि व्यावसायिक संस्था, शिक्षण संस्था, माध्यमे या सर्वानी समन्वयाने वृद्धांचे आयुष्य अधिक सुखकर, सुरक्षित होण्यासाठी, त्यांना आत्मसन्मानाने जगता यावे यासाठी योजना आखून पावले उचलावीत, अशी अपेक्षा यामागे आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आमंत्रणावरून २०१५ मध्ये ‘निरोगी वृद्धत्व’ या विषयावर जपानमध्ये जागतिक परिषदेत सहभागी झाले होते, तेव्हा या विषयात वेगवेगळे देश किती धोरणे आखताहेत, जनजागरण करताहेत हे जाणून घेण्याची संधी लाभली होती. आपल्याकडे २०११ मध्ये वृद्धांसाठी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम अमलात आला, पण तसे अजून खूप भरीव काही त्यात घडलेले दिसत नाही. मात्र अनेक बिगरशासकीय संस्था वृद्धांच्या सामाजिक, भावनिक, आरोग्य समस्यांसाठी काम करताना दिसतात. वैद्यक, नर्सिग, फार्मसी पदवी शिक्षणात ‘वृद्धांचे आरोग्य’ यावर तितकासा भर अद्याप आपल्याकडे दिला जात नाही.

वैयक्तिक पातळीवर आपण आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. म्हातारपणाची आर्थिक तरतूद आपण करतो- किंवा त्याचा विचार तरुणपणापासूनच डोक्यात असतो, तसाच आरोग्याविषयी दृष्टिकोन असायला हवा. अत्यंत नैसर्गिकपणे येणाऱ्या या अटळ टप्प्याला ‘तयारीने’ सामोरे जायला हवे.

लेखिका औषधनिर्माणशास्त्राच्या प्राध्यापक आहेत.

ईमेल : symghar@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2020 12:06 am

Web Title: article on as an adult abn 97
Next Stories
1 अँटिबायोटिक प्रतिरोधाची त्सुनामी!
2 औषधांचे पथ्य-पाणी..
3 अ‍ॅलर्जी : आडाख्यांपलीकडची ओळख
Just Now!
X