25 September 2020

News Flash

उपाय, उपयोग आणि अपाय!

अनेक औषधे, फूड प्रॉडक्ट्सच्या लेबलवर ‘इम्युनिटी’ या शब्दाचा अलगदपणे नव्याने समावेश करण्यात आला.

संग्रहित छायाचित्र

 

प्रा. मंजिरी घरत

‘इम्युनिटी बूस्टर’- रोगप्रतिकारशक्तिवर्धक- या लेबलाचे आकर्षण ग्राहकांत वाढते आहे. व्यावसायिक गैरप्रकार रोखता येतीलही. पण मुळात रोगप्रतिकारशक्ती ही ‘विकत’ घेण्याची गोष्ट नाही, घरच्या घरी केलेला काढादेखील किती प्रमाणात घ्यावा याला धरबंध आहे, त्याचाही अपाय होऊ शकतो, हे लक्षात घेतले पाहिजे..

एका ‘इम्युनिटी बूस्टर’ हर्बल औषधाची मोठी जाहिरात पाहून केमिस्टकडून आणलेल्या त्या महागडय़ा औषधाचे ड्रॉप्स सकाळी उठल्या उठल्या त्याने घेतले. थोडय़ा वेळाने काढा झाला. नाश्त्यानंतर मल्टीव्हिटॅमिन्सचा खुराक झाला. गुळण्या, वाफारा, गरम पाणी पिणे, हळद दूध असे घरगुती उपायही त्याचे चालू असायचे. समाजमाध्यमे, माध्यमे आणि गूगलन करत आणखी काय काय करावे म्हणजे आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत होईल याचा मागोवा घेणे त्याचे चालूच असायचे.

आपल्यापैकी बरेच जण वर वर्णन केलेल्या ‘त्या’च्यामध्ये कमीअधिक स्वत:ला प्रमाणात पाहू शकतील. मार्चमध्ये करोनाच्या आगमनापासून आरोग्याच्या चांगल्या सवयी वाढल्या. आरोग्यविषयक जाणिवा, उत्सुकता वाढली. आयुष मंत्रालयाने पत्रक काढून कोविड प्रतिबंधासाठी रोगप्रतिकारशक्ती महत्त्वाची हे सांगून काही उपायही सुचवले. जीवनसत्त्वे, खनिजे, आहार, घरगुती उपाय, काढा, इम्युनिटी, लस याची चर्चा होऊ लागली. आपापल्या परीने बरेच जण उपाय (बहुतांशी स्वमनाने) करू लागले. त्यातही काय करावे, काय टाळावे याविषयी गोंधळ होताच. इम्युनिटी (रोगप्रतिकारकशक्ती) हा परवलीचा जादूई शब्द झाला. गूगलवर ‘इम्युनिटी’, ‘हळद’, ‘झिंक’, ‘गुळवेल’ वगैरे सर्चचे प्रमाण तब्बल  ३५० टक्क्यांनी वाढले.

कोविडमुळे काही क्षेत्रात मंदी, तर काही क्षेत्रात संधी असे झाले. अनेक औषधे, फूड प्रॉडक्ट्सच्या लेबलवर ‘इम्युनिटी’ या शब्दाचा अलगदपणे नव्याने समावेश करण्यात आला. ‘इम्युनिटी बूस्टर’  (रोगप्रतिकारकशक्तिवर्धक) उत्पादने आणि त्यांच्या जाहिरातींना पूर आला. यात व्हिटॅमिन्स, खनिजे, हर्बल, होमिओपॅथिक, आयुर्वेदिक, फूड सप्लिमेंट्स, हेल्थ ड्रिंक्स सगळे आले, चक्क काही हॅण्ड सॅनिटायझर्सच्या लेबलवर, इतकेच काय तर कहर म्हणजे एका कंपनीच्या ब्रेडच्या लेबलवरसुद्धा ‘इम्युनिटी बूस्टर’ असे लक्षवेधीपणे छापले गेले. सॅनिटायझरचा इम्युनिटी बूस्टर हा दावा कसा ते सिद्ध करा, तसेच ब्रेडच्या बाबतीतही ‘अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडिया’ने उत्पादकांकडे हरकत घेतली. ब्रेडच्या लेबलवरील इम्युनिटी बूस्टर हा दावा उत्पादकाने काढून टाकला. (या वेगाने तुळशीच्या रोपांपासून ते हळद, लसूण, आवळा, सर्व मसाल्याचे पदार्थ अशा जिनसांवर ‘इम्युनिटी बूस्टर’चे लेबल दिसले असते, असो) प्रॉन्टो कन्सल्टन्सी या बाजार-अभ्यास कंपनीने देशभरात जून महिन्यात केलेल्या पाहणीत औषध-दुकानांतील ९२ टक्के बिलांमध्ये किमान एक तरी इम्युनिटी बूस्टर होते. एरवी हे प्रमाण साधारण ४० टक्क्यांहूनही कमी असते!

रोगप्रतिकारकशक्ती आणि त्यासाठी काम करणारी यंत्रणा ही गुंतागुंतीची आहे. शरीरावर जंतूंनी आक्रमण केल्यास ही यंत्रणा जागरूक होते, लढायला पहिले सैन्य पांढऱ्या रक्तपेशींचे (न्यूट्रोफिल्स) असते, तद्नंतर नेमका शत्रू कोण याचा अंदाज घेत ‘टी’ आणि ‘बी’ लिम्फोसाइट्स या प्रतिकारक पेशी जाग्या होऊन कामाला लागतात; त्यांच्यात समन्वय, संवादासाठी सायटोकाइनसारखी प्रथिने असतात, वेगवेगळी प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) असतात. अशा प्रकारे विविध पेशी आणि रसायने या सर्वाचा संयुक्त प्रतिसाद म्हणजे रोगप्रतिकारशक्तीची यंत्रणा. या यंत्रणेला जागे करणाऱ्या प्रत्येक आक्रमणाच्या विरुद्ध ती नेमकेपणाने काम करते. सर्वसामान्यपणे इम्युनिटी वाढली किंवा कमी झाली हे पाहण्यासाठी सरळ सोपे मापदंड नाहीत. इम्युनिटीचे नाते सकस चौरस आहार, व्यायाम, झोप, ताणतणाव नियंत्रण, पचनसंस्थेतील चांगले सूक्ष्मजीव (मायक्रोफ्लोरा) या साऱ्यांशी आहे. आणि ती निरंतर घडणारी प्रक्रिया आहे.

इम्युनिटी वाढवण्याचा दावा करून आकर्षित करणारी उत्पादने दर्जेदार असतीलही; पण त्यांचे नेमके काय टेस्टिंग होते, त्याची आपल्याला गरज आहे का, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी नक्की उपयुक्तता आहे का, अपाय काय होऊ शकतो हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. या उत्पादनांसाठी किंमत नियंत्रण नाही, प्रिस्क्रिप्शनही लागत नाही, हे मुद्दे आहेतच. पण तरीही अशा प्रकारचे कोणतेही उपाय स्वमनाने करण्यापेक्षा असे काही बूस्टर घ्यावे का, असल्यास कोणते, किती प्रमाणात आणि किती काळासाठी हे आपल्या आसपासच्या त्या क्षेत्रातील (अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथी वगैरे) तज्ज्ञ डॉक्टरना विचारून केलेले योग्य. इम्युनिटी ही काही सहज ‘विकत’ घेण्याची चीज नव्हे. ‘पी हळद हो गोरी’ असे काही होत नसते.

जीवनसत्त्वे आणि खनिजे हे सर्व सूक्ष्म पोषक घटक (मायक्रोन्यूट्रियंट) काही नेमक्या प्रमाणातच शरीराला जरुरी असतात. कमतरता किंवा प्रमाण जास्त झाले तर त्याचे विपरीत पडसाद उमटतात. हे लक्षात घेऊन सर्व घटकांची दैनिक शारीरिक गरज (रेकमेन्डेड डेली अलाउन्स) ठरवली जाते. खनिज ‘झिंक’ हे प्रतिकारशक्तीसाठी उपयुक्त आहे, कोविडची लागण झालेल्या रुग्णांना झिंकच्या गोळ्या दिल्या जातात. झिंकची दैनंदिन गरज निरोगी प्रौढ व्यक्तीला ११ ते १४ मिलीग्रॅम असते. व्हिटॅमिन ‘सी’सुद्धा त्याच्या रोगप्रतिकारक क्षमतेमुळे आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मामुळे कोविड रुग्णांना दिले जात. या व्हिटॅमिनची दैनंदिन गरज निरोगी प्रौढ व्यक्तीला ८० ते ९० मिलीग्रॅम आहे. आपल्या रोजच्या आहारातून व्हिटॅमिन ‘सी’, झिंक पुरेसे मिळत असते, मिळू शकते. म्हणून सरसकट सर्वानी वैद्यकीय सल्ल्याशिवाय स्वमनाने घेऊ नये.

स्तनदा माता, गरोदर स्त्रिया, आजारी व्यक्ती, वृद्ध यांना सूक्ष्मघटकांची कमतरता किंवा वाढीव गरज असू शकते आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना प्रतिबंध किंवा उपचार यासाठी व्हिटॅमिन/ खनिजे सप्लिमेंट स्वरूपात जरुरी असतात. तसेच लोह, व्हिटॅमिन बी-१२, व्हिटॅमिन- डी या घटकांची कमतरता आपल्याकडे अनेकांमध्ये आढळते. रक्ततपासणी करून, कमतरता असल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार सप्लिमेंट घेणे योग्यच; पण नॉर्मल आहार असणाऱ्या सर्वानी सरसकट कोणतीही सप्लिमेंट स्वत:हून घेत राहायची गरज नसते. शरीरात सूक्ष्म पोषक घटकांमध्ये एकमेकांत संतुलन असते. समजा झिंक सप्लिमेंट गरज नसताना प्रमाणाबाहेर खूप काळ घेत राहिले तर तांबे, लोह घटकांचे रक्तात शोषण कमी होते. त्यामुळे अ‍ॅनेमिया आणि इतर दुष्परिणाम होऊ शकतात. कॅल्शिअमच्या गोळ्याही त्याची शरीरात कमतरता नसताना स्वमनाने घेत राहिल्यास किडनी, हृदयावर दुष्परिणाम होऊ शकतात. या सूक्ष्म घटकांच्या इतर औषधांशी आंतरक्रियाही होऊ शकतात. कमतरता नसताना घेतलेली जीवनसत्त्वे (अगदी बी कॉम्प्लेक्ससारखी पाण्यात विरघळणारीसुद्धा) अधिक प्रमाणात शरीरात गेली तरी त्याचे विपरीत परिणाम होतात. वेगवेगळ्या मात्रेमध्ये (स्ट्रेंग्थ) हे सूक्ष्म घटक उपलब्ध असतात. प्रतिबंधात्मकसाठी कमी मात्रा, उपचारांसाठी जास्त मात्रा. उदा. झिंक ५ / २० किंवा ५० मिलीग्रॅम या स्ट्रेंग्थमध्ये असते. इतर औषधांप्रमाणेच इथेही ‘स्ट्रेंग्थ’कडे लक्ष देणे जरुरीचे आहे.

आता जाताजाता थोडेसे ‘काढा’ या घरगुती उपायाबाबत. काढा हा घराघरांतून केला जातो. मार्च एप्रिल महिन्यापासून आणि ती एक चांगली सवय आहे. पण काढय़ात काळी मिरी, दालचिनी असे मसाल्याचे पदार्थ (जे आपल्या रोजच्या आहारातही असतात) वापरले जातात; त्यांचे नेमके प्रमाण काय, दिवसातून काढा किती वेळा, किती घ्यायचा, मधुमेह असेल तर काढय़ाच्या रेसिपीत काही फरक करायचा का, हे सर्व आयुर्वेदतज्ज्ञांना विचारून करणे योग्य. कारण मसाल्याच्या पदार्थाचे जर काढय़ातून अतिसेवन झाले तर अ‍ॅसिडिटी, माउथ अल्सर होणे, नाकातून रक्त येणे हे प्रकारही होऊ शकतात आणि सध्याही अशी उदाहरणे दिसत आहेत.

आजची ही चर्चा कोविडनिमित्ताने झाली; पण एरवीही वैद्यकीय कारण नसताना वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेतलेली सप्लिमेंट्स किंवा इम्युनिटी बूस्टर्स हे सुआरोग्यासाठी शॉर्टकट ठरत नाहीत, आपल्या पारंपरिक आहारात सर्व पोषक घटकांचा समावेश असतो. चांगल्या सकस आहारातून नैसर्गिक मिळणाऱ्या पोषणाला बाहेरून घेतलेली उत्पादने पर्याय नाहीत हे कायमच लक्षात ठेवणे महत्त्वाचे. त्यावर अधिक विचार, नियोजन करून, तज्ज्ञांचा सल्ला घेणे उपयुक्त आहे. स्वमनाने बाजारातून, मल्टीलेव्हल मार्केटिंग किंवा ऑनलाइन असे खरेदी करत जास्त व्हिटॅमिन्स किंवा खनिजे बाहेरून पूरक उत्पादन (सप्लिमेंट) स्वरूपात घेतली तर इम्युनिटी वाढेल, तब्येत अधिक चांगली राहील- ‘अधिकस्य अधिकम फलम’- असे इथे काही समीकरण नसते. गरज, उपाय, उपयोग, अपाय या साऱ्याचे सारासार विचार, कोणत्याही अतिरेकी उपाय स्वमनाने न करता योग्य

वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे निश्चितच आपल्या हिताचे.

लेखिका औषधनिर्माणशास्त्राच्या प्राध्यापक आहेत.

ईमेल : symghar@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 12:03 am

Web Title: article on immunity remedies uses and disadvantages abn 97
Next Stories
1 करोना येता घरा..
2 ग्राहकाला औैषध-माहितीचा ‘उपचार’
3 मनाचिये गुंतागुंती..
Just Now!
X