28 November 2020

News Flash

औषधांचे पथ्य-पाणी..

सर्वात जास्त औषधे तोंडावाटे घेतली जातात. अन्नाप्रमाणेच औषधांचाही प्रवास अन्ननलिका, जठर व नंतर आतडी असा होतो

(संग्रहित छायाचित्र)

प्रा. मंजिरी घरत

रिकाम्या पोटी घेण्याचे औषध जेवणानंतर घेतले तर लागू पडत नाही, असे का? किंवा, रोजच्या औषधाची गोळी आदल्या दिवशी घ्यायची विसरलो म्हणून आज दोन घ्याव्या असे का नाही होत? यामागची तर्कसंगती जाणून घेतली, म्हणजे एकंदर ‘औषध-साक्षरता’ वाढली, तर औषधांचे पथ्यपाणी डोळसपणे पाळले जाईल..

दहाएक वर्षांपूर्वीची सत्य घटना. एका मोठय़ा उद्योगपतींचे वडील पार्किन्सन्सने आजारी होते, वय ७५ च्या आसपास, उत्तमोत्तम डॉक्टर्सचे उपचार, सर्व औषधे वेळच्या वेळी, काळजी घ्यायला मदतनीस, पण तरी रुग्णाच्या स्थितीत फारसा फरक पडत नव्हता. उद्योगपतीच्या मनात असे का होतेय हे घोळत असते. ते अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना तेथील हॉस्पिटलमधील एका क्लिनिकल फार्मासिस्टला वडिलांची केस सविस्तर सांगतात. फार्मासिस्टच्या ताबडतोब लक्षात येते कुठे चुकतेय ते. औषधे अचूक आहेत, पण चुकतेय हे की उपचारातील जी मुख्य गोळी (लिवोडोपा) आहे ती जेवणाआधी थोडा वेळ, म्हणजे रिकाम्या पोटी घ्यायचीये. तुम्ही ती जेवणानंतर देताय, त्यामुळे त्याचा परिणाम होत नाहीये. उद्योगपतीसाठी हा ‘युरेका’ क्षण होता, ताबडतोब घरी फोन करून ते दुरुस्ती करायला सांगतात आणि काही दिवसांत रुग्ण सुधारतो.

खूप अंगदुखी होत असल्याने ती नेहमीच्या फॅमिली डॉक्टरकडे गेली, तिची विचारपूस करून त्यांनी औषधचिठ्ठी लिहून दिली, केमिस्टकडून औषध घेऊन घरी आली. आणलेली डोलो ६५०ची गोळी ती घेऊ लागली अंगदुखीसाठी. तापासाठी क्रोसिनची गोळी हे समीकरण तिच्या मनात पक्के होते. अधूनमधून कणकण वाटते म्हणून डोलोसोबत क्रोसिनही चालू ठेवली तिने. असे ४-५ दिवस सुरू राहिले. दोन्ही गोळ्यांमध्ये असलेल्या पॅरासिटामोल या औषधाचा अतिरिक्त डोस तिच्या शरीरात जाऊ लागला, आणि तिला मळमळ, उलटय़ांचा त्रास होऊ लागला.

* * *

काही दिवसांपूर्वी या स्तंभात आपण ‘औषधोपचारांना मात्रा मार्गदर्शक तत्त्वांची’ म्हणजे औषधोपचार कसे तर्कसुसंगत असावेत याविषयी चर्चा केली. असे गृहीत धरू की अचूक रोगनिदान करून तर्कसुसंगत (रॅशनल) औषधोपचार डॉक्टरांनी लिहून दिले, फार्मासिस्टने औषधे अचूक डिस्पेन्स केली. औषधे चांगल्या दर्जाची आहेत. म्हणजे सारे काही यथास्थित आणि आता उपचाराचा हवा तो परिणाम दिसायलाच हवा! ..पण काही वेळा हे अपेक्षित यश येतेच असे नाही. उलट कधी आजाराची गुंतागुंत वाढते, नवीन व्याधी निर्माण होताहेत की औषधांचे साइड इफेक्ट्स आहेत हे कधीकधी लक्षातही येत नाही.

याची कारणे अनेक, आणि ती मुख्यत: रुग्ण-वर्तनाशी संबंधित आहेत. रुग्णाची औषधविषयक अपुरी समज, औषध वेळापत्रक न पाळणे, लिहून दिलेल्या औषधांसोबत ‘सेल्फ मेडिकेशन’, फेरतपासणीस न जाणे अशी अनेक कारणे असतात. औषध लिहून देताना त्याविषयी सविस्तर समजावयाला डॉक्टरना वेळ नसतो आणि फार्मासिस्ट औषधे-समुपदेशन करेल अशी अजून तरी प्रगती झालेली नाही. प्रगत देशांत फार्मसीत रुग्णांना औषधे विकत घेताना औषधविषयक समुपदेशन केले जातेच, औषध माहितीपत्रके दिली जातात, शिवाय रुग्णांच्या औषधाचा मेडिसिन यूज रिव्ह्यू फी५्री६ (औषधउपचार कसे लागू होताहेत याचा आढावा रुग्णाशी बोलून फार्मासिस्ट घेतो, डॉक्टरांना कळवतो. अगदी कोविडकाळातही फार्मासिस्ट इंटरनेटद्वारे ‘टेलिहेल्थ’ सेवा देत आहेत.) अशी काही व्यवस्था, आपल्याकडे तूर्त तरी नाही. त्यामुळे रुग्णांनी स्वत:च अधिक सजग, जबाबदार होणे महत्त्वाचे आहे. आजारात पथ्यपाणी करतात. पण औषधाचे पथ्यपाणी, त्यांचे तंत्रही सांभाळावे लागते. काही बाबींचा ऊहापोह करू.

सर्वात जास्त औषधे तोंडावाटे घेतली जातात. अन्नाप्रमाणेच औषधांचाही प्रवास अन्ननलिका, जठर व नंतर आतडी असा होतो. औषधांचा परिणाम होण्यासाठी त्यांचे रक्तात शोषण (अ‍ॅब्सॉप्र्शन) होणे महत्त्वाचे असते. बऱ्याचशा औषधांचे शोषण हे लहान आतडय़ातून होते. औषधे आतडय़ात किती वेळात, किती प्रमाणात पोहोचतात याचा थेट संबंध औषधाच्या परिणामकारकतेशी असतो. रिकाम्या पोटी अन्नाची लुडबुड नसल्याने औषध आतडय़ात झटपट पोहोचते. याउलट भरल्या पोटी विलंब लागू शकतो. काही अन्नघटकांची औषधाबरोबर आंतरक्रिया (इंटरॅक्शन) होऊन औषधांचे शोषण कमी होऊ शकते. ‘रिकाम्या पोटी’चा अर्थ जेवणआधी किंवा जेवल्यानंतर दोन तासांनी. अन्नाचा मुक्काम जठरात साधारण दोन तास असतो, म्हणून खाल्ल्यानंतर दोन तासांनी पोट रिकामे असे मानले जाते. ‘भरल्या पोटी’ म्हणजे अर्थातच जेवणासोबत किंवा जेवणानंतर.

थोडे अपवाद वगळता बहुतांश औषधे रिकाम्या पोटी उत्तम शोषली जातात. अ‍ॅसिडिटी/अल्सरसाठीचे रॅन्टिडिन, ओमेप्रॅझॉल, मधुमेहासाठी इन्सुलिन इंजेक्शन, ग्लीमेपिराइड, ग्लीक्लाझाइड जेवणाआधीच घ्यायची. पण बरीच औषधे रिकाम्या पोटी घेतल्यास पोट बिघडणे, जळजळ, उलटी असे होते म्हणून भरल्यापोटी दिली जातात. बरीचशी वेदनाशामके उदा. आयबुप्रोफेन, डायक्लोफेनॅक जेवल्यानंतर घ्यायची. ग्रिसिओफलव्हिन, फ्लूकोनाझोलसारखी अँटी-फंगल औषधे अन्नात विरघळतात व त्यांचे शोषण चांगले होते, म्हणून भरल्या पोटी घ्यायची. अल्बेंडाझोल हे जंतासाठीचे औषध रात्री जेवल्यानंतर घ्यायचे. मधुमेहासाठीची अ‍ॅकाबरेज, वोबीग्लोज ही औषधे जेवणाच्या पहिल्या घासासोबत घ्यायची. ही फक्त थोडी उदाहरणे दिली. अनेक औषधांवर अन्नाचा, पचनसंस्थेतील वातावरणाचा परिणाम होत नाही त्यामुळे ती रिकाम्या पोटी, भरल्या पोटी आधीही घेतली तरी चालतात. अलीकडे बऱ्याच डॉक्टरांच्या संगणकीय प्रिस्क्रिप्शनमध्ये औषध जेवण आधी का नंतर घ्यायचे ते सुस्पष्ट लिहिलेले असते. पण तसे नसेल तर आपल्याला हा प्रश्न जरूर पडावा आणि याबाबत डॉक्टरांना जरूर विचारावे.

औषधाचे वेळापत्रक कसोशीने पाळणे महत्त्वाचे असते. दिवसातून दोनदा, एकदा असे वेळापत्रक कसे ठरवले जाते? औषध घेतल्यानंतर त्याची रक्तात एक पातळी तयार होते, त्यामुळे औषधाचा परिणाम दिसू लागतो. काही वेळात औषधाचे विघटन होऊन ते शरीराबाहेर मूत्रावाटे वगैरे फेकले जाण्याची प्रक्रियाही चालू होते, औषधाचा परिणाम किती वेळ राहतो (डय़ूरेशन ऑफ अ‍ॅक्शन) यावर पुढच्या डोसची वेळ ठरवली जाते. दीर्घकालीन आजारावरील औषधे एकदा वेळ/ वेळा ठरवल्या की शक्यतो त्याच वेळेला घ्यायची. त्यामुळे औषधाची रक्तातील पातळी कायम स्थिर राखली जाते आणि औषधाचा गुण येतो. आधीची वेळ चुकल्यास पुढच्या डोसच्या वेळी डबल डोस घेणे हे चुकीचे आहे. साधारण ५० टक्के रुग्ण औषधे वेळच्या वेळी घेत नाहीत (नॉन-अ‍ॅड्हीरन्स) किंवा उपचारात धरसोड करतात.

आणखी एक गडबड होऊ शकते. म्हणजे एकच औषधी घटक दोन वेगळ्या ब्रँडच्या औषधातून  पोटात जातो आणि त्या औषधी घटकाचा डबल डोस होऊन विपरीत परिणाम होऊ शकतात. लेखाच्या सुरुवातीस दिलेल्या दुसऱ्या उदाहरणात दोन्ही औषधांचे व्यापारी नावे वेगळी, पण पॅरासिटामोल हा घटक सामायिक होता. क्रोसिन घेऊ का नको हे ना तिने डॉक्टरांना विचारले, ना डॉक्टर वा फार्मासिस्टने तिला ‘इतर कोणती औषधे घेता?’ हा प्रश्न विचारला. तसेच एकच रुग्ण दोन-तीन स्पेशालिस्ट डॉक्टर्सकडे निरनिराळ्या कारणांनी जातो. आपल्याकडे एक लाखांवर ब्रॅण्ड्स आहेत. म्हणून प्रत्येक डॉक्टरना आपण घेत असलेली सर्व औषधे सांगणे, नावे लक्षात राहात नसल्यास चक्क गोळ्यांच्या स्ट्रिप/ बाटली सोबत घेऊन जाणे योग्य. शिवाय डॉक्टरांनीही रुग्णास इतर काय औषधे घेता हे विचारणे महत्त्वाचे आहे. ही काळजी घेतल्यास एकच औषध (वेगळ्या व्यापारी नावाने) पुन्हा घेतले जाणार नाही.

औषध घेताना औषध प्रकार (डोसेज फॉर्म) योग्यरीत्या घेतले तरच त्याचा उपयोग होतो. टॅब्लेट्सचे वेगवेगळे प्रकार असतात जर चघळायची गोळी असेल तर ती गिळायची नाही, आधी चघळायची (सध्या अनेकांनी ‘व्हिटामिन सी’च्या ‘च्यूएबल’ गोळ्या खाल्ल्या असतील). आवरणयुक्त (एसआर, ईआर, सीआर) गोळी असेल तर अख्खीच गिळायची, तुकडे करायचे नाहीत. गोळी कोणत्या प्रकारची आहे ते लेबलवर लिहिलेले असते. द्रव औषधे घेताना बाटलीसोबत येणारा मापाचा कप किंवा लहान मुलांसाठी ड्रॉपर वापरून मोजून-मापून औषध घ्यायचे, जेणेकरून अचूक डोस पोटात जाईल. दम्यासाठी वापरायचे इन्हेलर (हुंगण्याचे औषध) कसे वापरायचे हे डॉक्टर, असिस्टन्ट किंवा फार्मासिस्टकडून किंवा इन्हेलरसोबत येणारे माहितीपत्रक वाचून शिकायचे. योग्य तंत्राने नाही वापरले तर बरेचसे औषध हे फुप्फुसात पोहोचत नाही, गुण येत नाही, शिवाय ते फुकट जाते ते वेगळेच.

एकंदर काय जर औषधे घ्यावीच लागणार असतीलच, तर ती सुजाणपणे घेतल्यास उपचार उत्तमरीत्या लागू पडतील. म्हणूनच ‘औषध-साक्षर’ होणे, औषधांचे पथ्य पाळणे गरजेचे आहे.

लेखिका औषधनिर्माणशास्त्राच्या प्राध्यापक आहेत.

ईमेल : symghar@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 12:03 am

Web Title: article on medicine diet water abn 97
Next Stories
1 अ‍ॅलर्जी : आडाख्यांपलीकडची ओळख
2 सोडियम-पोटॅशियमची ‘नमकीन’ गोष्ट
3 फार्मासिस्ट घडवताना!
Just Now!
X