प्रा. मंजिरी घरत

what is learning disorder marathi, learning disorder marathi article
Health Special: अध्ययन अक्षमता म्हणजे काय ? अशा मुलांसाठी काय करायचं?
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral
mumbai malad 14 year old girl dies first period stress How to maintain mental health of a girl during the first period What should be the role of parents doctor said
पहिल्या मासिक पाळीवेळी मुलीचं मानसिक आरोग्य कसं जपावं? पालकांची भूमिका कशी असावी? वाचा…
Car Ridden Boys Throw Water Balloons at people on a busy in road delhi viral video
बापरे! भर रस्त्यात चालत्या कारमधून लोकांच्या अंगावर फेकले पाण्याचे फुगे, तरुणांचा संतापजनक प्रकार; व्हिडीओ व्हायरल

क्लोस्ट्रिडियम, लॅक्टोबॅसिलय ही नावे जड वाटतील.. पण अशा कित्येकांना आपण आपल्या शरीरात वागवतो; यांपैकी अनेकांमुळे निरोगी राहातो!

ख्रिस्तपूर्व (बिफोर ख्राइस्ट- बीसी) आणि ख्रिस्तानंतरचा काळ (अ‍ॅनो डॉमिनी- एडी) अशी काळाची एक विभागणी केली जाते. आज कोरोनाने जगभर जी उलथापालथ केली आहे आणि त्याचे आरोग्य, आर्थिक, सामाजिक, मानसिक असे सर्वदूर आणि दूरगामी जे परिणाम राहणार आहेत त्याचा विचार करता कोरोना-पूर्व (बिफोर कोरोना) आणि कोरोना-नंतर असे शब्दप्रयोग करावे लागणार आहेत इतकी कोरोनाची महती आहे. आपल्यातील बहुसंख्यांच्या आयुष्याला आलेला अल्पविराम काही दिवसांत संपेल आणि काही मर्यादा असतील कदाचित; पण आपले रहाटगाडगे चालू होईल तेव्हा काय काळजी घ्यायची याची मानसिक पूर्वतयारी करणे  हे लॉकडाऊनच्या या दुसऱ्या पंधरवडय़ात उचित राहील. इन्फेक्शन्स होऊच नयेत यासाठी कोरोनाने लावलेल्या चांगल्या सवयी- हात धुणे आदी स्वच्छता, खोकताना/ शिंकतानाची काळजी टिकवायच्या. शक्य तेवढे आणि शक्य त्या सर्व ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळणे हे करावेच लागेल. आजारी पडूच नये यासाठी जीवनशैलीत बदल करून रोगप्रतिकारक शक्ती उत्तम ठेवणे हे अनेक इन्फेक्शन्ससाठीचे आपणच आपल्यासाठी तयार केलेले एक प्रकारचे व्हॅक्सिन (रोगप्रतिबंधात्मक लस) असेल. या नवीन पर्वाला सामोरे जाताना आपल्याला निश्चितच अधिक गांभीर्याने जीवनशैली आणि आरोग्याचा विचार करावा लागेल.

सूक्ष्म जीव किती संहारक असू शकतात आणि किती वेगवेगळी इन्फेक्शन्स होतात हे आपण जाणून आहोत. त्यांच्याशी आपली लढाई चालूच राहील; पण एका बाजूला इतके उपद्रवी जंतू आपल्याला जेरीस आणताना दुसरीकडे आपल्या प्रत्येकाच्याच शरीरात, त्वचेवर, तोंडात आणि विशेषत: पचनसंस्थेत कायम वास्तव्याला असलेल्या आरोग्यरक्षक सूक्ष्म जीवांशी ओळख आणि त्यांचा आपल्या जीवनशैली आणि विविध आजारांशी सिद्ध होत असलेला संबंध पाहणे इंटरेस्टिंग ठरेल.

आपल्या आतडय़ात अक्षरश: अब्जावधी जिवाणू आणि थोडय़ा प्रमाणात विषाणू, यीस्ट कायम अधिवास करत असतात. या निवासी सूक्ष्म जीवांच्या वसाहतींना म्हणतात गट (gut) फ्लोरा, मायक्रोफ्लोरा किंवा मायक्रोबायोटा. यात साधारण बॅक्टरॉइड्स, बिफीडोबॅक्ट्रिअम, क्लोस्ट्रिडियम, लॅक्टोबॅसिलय अशा साधारण ३० ते ४० जिवाणूंच्या जाती सर्वाधिक आणि इतर अल्प प्रमाणात आढळतात. शरीरातील एकूण सर्व पेशींच्या संख्येएवढी, म्हणजे एक पेशी, तर एक सूक्ष्म जीव, एकास एक प्रमाणात, इतकी प्रचंड यांची संख्या असते असा संशोधकांचा अंदाज आहे. जन्मापासून वयाच्या साधारण पहिल्या दोन-तीन वर्षांपर्यंत आतडय़ात या वसाहती पूर्ण विकसित होऊन आतडय़ाच्या आतील आवरणाशी सख्य करत स्थिरस्थावर होतात. प्रत्येक व्यक्तीगणिक हा फ्लोरा भिन्न असतो. सूक्ष्म जीवांच्या काही जाती एखाद्या व्यक्तीत अल्पसंख्य असतील तर दुसऱ्या व्यक्तीत त्या बहुसंख्य असतील. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ हे येथे तंतोतंत लागू पडते. आपल्या स्टूल्सची (fecal matter) चाचणी करून फ्लोरात कोणते सूक्ष्म जीव आहेत याचा अंदाज येऊ शकतो.

आपल्या फ्लोरातील बरेचसे जिवाणू एक तर निरुपद्रवी असतात किंवा उपयुक्त असतात. उपद्रवी जिवाणूच्या जाती असतीलच तर त्या अत्यल्प. सहसा कुणी डिवचल्याशिवाय त्या त्रास देत नाहीत. थोडक्यात हा मायक्रोबायोटा आपला मित्रपक्ष असतो. त्यांचे भरगच्च भक्कम वास्तव्य असते तेव्हा बाहेरून येणाऱ्या उपद्रवी जंतूंना ते सहसा आतडय़ात स्थान देत नाहीत. ‘एकमेकां साह्य़ करू अवघे धरू सुपंथ’ या जीवनपद्धतीनुसार सूक्ष्म जीव सुखेनव नांदत असतात. एका जातीचे जिवाणू जे पदार्थ बनवतात ते दुसऱ्या जातीच्या जिवाणूंना पूरक असतात. अशा प्रकारच्या समन्वयातून ‘के’ आणि ‘बी-१२’ जीवनसत्त्वांची निर्मिती हे जिवाणू करतात. आपण खाल्लेले, न पचलेले काबरेहायड्रेट्स हे त्यांचे खाद्य, त्यांना नेमके काय खाद्य मिळालेय त्यानुसार त्याचे विघटन होऊन वेगवेगळी शॉर्ट चेन फॅटी अ‍ॅसिड्स (एससीएफए) ते बनवतात. इतरही अनेक रसायने हे जिवाणू आपण खाल्लेल्या अन्नपदार्थाचे विघटन करून करतात. ही सारी फॅटी अ‍ॅसिड्स आणि रसायने अनेक कार्ये करतात. आतडय़ातून  शोषली जाऊन शरीराला ऊर्जा पुरवतात. चयापचयाची गती (मेटाबॉलिक रेट) वाढवतात, शरीरातील दाह (इन्फ्लेमेशन) कमी करतात, इन्सुलिनचे काम सुरळीत ठेवतात. कोलेस्टेरॉल नियंत्रण, आतडय़ाच्या आवरणातील पेशींचे कर्करोगापासून संरक्षण, क्षुधाशांती झाल्याचा संदेश मेंदूला देणे, मेंदूशी सातत्याने संवाद अशी त्यांची कामे चालू असतात. आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी आतडय़ातील हे सूक्ष्म जीव ‘टी’ मदतनीस पेशी नावाच्या संरक्षक पेशींना मदत करतात आणि या ‘टी’ पेशी मग विषाणू आणि इतर जंतूंवर अधिक जोमाने हल्ला करतात.

या कोटय़वधी सूक्ष्म जीवांचे एकत्र वजन केले तर ते साधारण आपल्या मेंदूइतके भरेल. आपल्या आरोग्यावर सत्ता गाजवणाऱ्या या फ्लोराला वेगळ्या अवयवाचा दर्जाच खरे तर द्यायला हवा. आणखी एक इंटरेस्टिंग बाब म्हणजे एकाच कुटुंबातील एकत्र राहणाऱ्या व्यक्तींमध्ये या सूक्ष्म जीवांची देवघेव विविध मार्गे होऊ शकते आणि त्यामुळे एकमेकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

हा फ्लोरा जितका उपयुक्त आणि वैविध्यपूर्ण सूक्ष्म जीवांनी संपन्न तितके आपले आरोग्य उत्तम, व्याधी कमी. पण जर का या फ्लोरामध्ये गडबड झाली की मग मात्र अनेक नकोशा घटनांची साखळी चालू होते. आतडय़ातील या बऱ्यावाईट जिवाणूंचे संख्याबळ बदलते, सारे जैवरासायनिक वातावरण बिघडून जाते, उपयुक्त रसायने बनत नाहीत आणि व्याधींना सुरुवात होते. मधुमेह, लठ्ठपणा, इरिटेबल बाऊल सिन्ड्रोम, रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होऊन इन्फेक्शन्स, कर्करोग असे विविध आजार होऊ शकतात. इतकेच नाही तर पार्किन्सन, नराश्य, स्किझोफ्रेनिया होण्यातही बिघडलेल्या फ्लोराचा सहभाग असू शकतो हे आता अभ्यासांती लक्षात येत आहे. जन्मजात सोबत आलेली जनुके आणि नंतर घडलेली किंवा बिघडलेली ही सूक्ष्म जीव वसाहत यांवर आरोग्याचा बराचसा आलेख तयार होतो असे आता लक्षात येत आहे. ख्रिस्तपूर्व काळात वैद्यकाचा जनक हिप्पोक्रेटने म्हटले होते- ‘सर्व व्याधींची सुरुवात पोटातून होते’ – याचा अर्थ आपल्याला आता पूर्ण उमगतोय का?

हा फ्लोरा कधी बिघडतो? हा फ्लोरा डिस्टर्ब होण्याची काय कारणे असतात? याला कसे जपायचे? या सूक्ष्म जीवांची वाढ आपण काय खातो त्याप्रमाणे होते. आपल्या आहारानुसार काही प्रकारच्या सूक्ष्म जीवांची पदास जास्त, काहींची कमी होणार. म्हणतात ना ‘वुइ आर व्हॉट वुइ ईट’. विविध भाज्या, फळे, विविध प्रकारची धान्ये यांनी युक्त समतोल, सकस, ताजा आहार गुणी/उपयुक्त जिवाणूंच्या जातींना प्रोत्साहन देतो. प्रादेशिक/ पारंपरिक जेवणातील अनेक पदार्थात विरघळणारे तंतू (सोल्युबल फायबर्स) असतात, त्यामुळे ते प्रीबायॉटिक म्हणजे रोगप्रतिकारक जंतूंच्या वाढीसाठी उपकारक आहेत. तेच तेच कायम खाण्यापेक्षा जितके खाण्यात वैविध्य तितका फ्लोरा समृद्ध होतो, पण चुकीचा आहार रोगजंतूंची वृद्धी करतो. जंक फूड, अति प्रमाणात चरबीयुक्त, अति कबरेदके, अति प्रमाणात प्रोसेस्ड फूड, अति प्रमाणात मांसाहार, अँटिबायोटिक्सचा अतिरेकी वापर या सर्व गोष्टींमुळे फ्लोरावर अत्याचार होणार, रोगकारक सूक्ष्म जीवांची वाढ होणार, हा शापच. पण उ:शाप असा की आपण आहार बदलला तर काही काळात फ्लोरामध्ये सुधारणा होऊ शकते. अति ताणतणाव, कमी झोप, मद्य आणि धूम्रपान, व्यायामाचा अभाव हेही आपल्या फ्लोरावर विपरीत परिणाम करतात.

अँटिबायोटिक्स शरीरात उपद्रवी जिवाणूंना नामोहरम करतानाच आतडय़ातील उपयुक्त जिवाणूंनासुद्धा डिस्टर्ब करतात. परिणामी आतडय़ातील संधिसाधू उपद्रवी जिवाणू, यीस्ट डोके वर काढतात आणि रुग्णास डायरिया होतो. अँटिबायोटिक वारंवार वापरल्यास फ्लोरा डिस्टर्ब झाल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. विकसित देशांत किरकोळ तक्रारींवर लगेच अँटिबायोटिक अजिबात देत नाहीत. संयम ठेवून बाकी उपाय करत वाट पाहिली जाते. तोच संयम आपणही शिकायला हवा. अँटिबायोटिक प्रतिरोध होऊ नये आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहावी या दोन्ही कारणांसाठी अँटिबायोटिक्सचा अतिरेकी वापर टाळायला हवा. अल्सर, अ‍ॅसिडिटीवर स्वत:च ‘ओमेप्रॅझॉल’सारखी औषधे दीर्घकाळ वापरली तर फ्लोरा बदलून पोटात इन्फेक्शन्स वाढीस लागतात असे अलीकडील संशोधनात दिसून येत आहे. म्हणूनच बेजबाबदार सेल्फ मेडिकेशन करू नये हे निश्चित. प्रोबियॉटिक प्रकारातील उत्पादने असतात त्यात उपयुक्त जिवाणू किंवा यीस्ट असतात. बिघडलेला फ्लोरा काही प्रमाणात पुनर्वसन करण्यास ती मदत करतात.

आतडय़ातील सूक्ष्म जीवांची दुनिया अनोखी आहे, अधिक संशोधन चालू आहे; पण आरोग्य आपल्या हातात- सॉरी- आतडय़ात आहे, असेच उमजते आहे. उत्तम आहार-विहार ठेवून आपण या सूक्ष्म जीवांना सांभाळू या, मग तेही आपल्याला सांभाळतीलच. खबरदारी आपली, जबाबदारी त्यांची!

लेखिका औषधनिर्माणशास्त्राच्या प्राध्यापक आहेत.

ईमेल : symghar@yahoo.com