News Flash

औषधोपचारांना मात्रा मार्गदर्शक तत्त्वांची

परदेशांतील वैद्यक व्यावसायिकांचे काम प्राथमिक आरोग्य सेवेच्या स्तरापासूनच विशिष्ट गाइडलाइन्सच्या चौकटीत चाललेले दिसते

(संग्रहित छायाचित्र)

 

प्रा. मंजिरी घरत

रुग्णावर डॉक्टर विनाकारण औषधांचा मारा तर करीत नाहीत ना? कोविड-१९ सारख्या रोगांत एखाद्याच औषधावर भिस्त ठेवणे किती योग्य? यासारखे प्रश्न उद्भवू नयेत यासाठी इलाज आहे- औषध देण्यासाठी तसेच एकंदर उपचारांसाठी सर्वमान्य ‘मार्गदर्शक तत्त्वे’ आखणे आणि सर्वानी त्यांचा आदर करणे!

नुकतेच राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने एक पत्रक काढले. काही ठिकाणी टॉसिलिझुमाब या औषधाचा कोविड रुग्णांमध्ये अतिवापर होत आहे तो थांबवा आणि तर्कसंगत वापरच करा, अशा आशयाचे हे पत्रक आहे (नवीन माहितीप्रमाणे हे औषध फारसे उपयुक्तही नाही). खरे तर कोविड उपचारांसाठी ‘उपचार मार्गदर्शक तत्त्वे’- गाइडलाइन्स- राज्य शासनाने अर्थातच ‘आयसीएमआर’च्या (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) आधाराने प्रसृत केली आहेत. त्यात कोविडइतका लक्षवेधी, पटकन बातमी होणारा विषय असूनही काही ठिकाणी गाइडलाइन न जुमानता या महागडय़ा औषधाचा तर्कविसंगत- इर्रॅशनल वापर झाला. नुसते हेच औषध नाही तर रेमडेसिविर किंवा स्टीरॉइड्स प्रकारातल्या इतर औषधांचाही काही ठिकाणी अतिवापर झाल्याचे दिसून येत आहे.

सर्वसामान्यांसाठी आरोग्यसेवा उपलब्ध असणे (अ‍ॅक्सेस), परवडणारी (अ‍ॅफोर्डेबिलिटी)असणे जितके महत्त्वाचे, तितकेच या सेवेचा दर्जाही (क्वालिटी) महत्त्वाचा. आज आपण आरोग्य क्षेत्रातील अनेक अपुऱ्या सुविधा, तोकडे मन्युष्यबळ, अशा उणिवांची नेहमी चर्चा होताना पाहतो. त्याबाबत उपाय करण्याचा प्रयत्न दिसतो. औषधांवरही चर्चा असते; पण ती सहसा औषध उपलब्धता, किंमत, जेनेरिक वगैरेवर केंद्रित असते. ‘इसेन्शिअल मेडिसिन लिस्ट’ (समाजात नेहमी आढळणाऱ्या आजारांना उपचार करण्यासाठी लागणारी आवश्यक औषधे. सध्या या यादीत ३७६ औषधे आहेत) या यादीचा उल्लेखसुद्धा किंमत नियंत्रणसंदर्भात अधिक होतो. पण औषधांचा तर्कसुसंगत वापर (रॅशनल ड्रग यूज), स्टॅण्डर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स /गाइडलाइन्स याबाबतीत विचार, चर्चा अभावानेच दिसते. एखाद्या आजारावर वेगवेगळे उपचार होऊ शकतात, नव्हे केलेही जातात. समजा एखाद्या रुग्णाचे पोट बिघडले आहे, रुग्णास बाकी काही तक्रार नाही, जुनाट व्याधी नाहीत. मग उपचारार्थ जलसंजीवनी क्षार (ओआरएफ), छोटी (नॅरो स्पेक्ट्रम) किंवा मोठी (ब्रॉड स्पेक्ट्रम) अँटिबायोटिक्स, कृमींसाठीचे औषध, प्रोबायॉटिक, आतडय़ाची गती मंदावणारी औषधे, जीवनसत्त्वे असे बरेच पर्याय असू शकतात. मग त्या रुग्णाच्या त्या विशिष्ट स्थितीत यापैकी योग्य औषधयोजना कोणती? नेमके याचेच मार्गदर्शन स्टॅण्डर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स / गाइडलाइन्स करतात. योग्य रोगनिदान करून, योग्य औषध, योग्य मात्रेत आणि योग्य कालावधीसाठी रुग्णाला देणे म्हणजे रॅशनल ड्रग यूज. यात औषधाची किंमत माफक असणेही आले, शक्यतो इसेन्शिअल मेडिसिन यादीतील औषधे (कारण त्यांच्या किमती नियंत्रित असतात) द्यावीत, औषधाची निवड अचूक असावी, आवश्यक असतील तेवढीच औषधे द्यावी, विनाकारण औषधांचा भडिमार होऊ देऊ नये, चुकीचा डोस/ चुकीचा कालावधी असे काही होऊ नये- हे सारे अभिप्रेत असते. अशा तर्कसंगत औषधोपचारांसाठी एक महत्त्वाचा पाया ठरतात स्टॅण्डर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स / गाइडलाइन्स. यांना आपण ‘मानक उपचार प्रणाली/ मार्गदर्शक तत्त्वे’ म्हणू शकतो. ही मार्गदर्शक तत्त्वे अतिशय पद्धतशीरपणे विकसित केलेली असतात, ज्यामुळे तत्कालीन परिस्थितीत औषधोपचार आणि इतर उपचारांबाबत योग्य निर्णय घेण्यास मदत होते. ही मार्गदर्शक तत्त्वे अनेकविध मुद्दय़ांचा, निकषांचा विचार करून (उदा. रुग्णाची सद्य:स्थिती, वय, पूर्वेतिहास, इतर आजार वगैरे) प्राप्त परिस्थितीत रुग्णासाठी कोणते औषधोपचार सर्वोत्तम, परिणामकारक आणि सुरक्षित ठरतील तसेच रोगनिदान चाचण्या, मॉनिटिरिंग यासाठी उत्तम मार्गदर्शन करतात. पण ‘अमुक आजार म्हणजे तमुक औषधे’ इतके सोपेसरळ ‘मेडिसिन कुकबुक’ या गाइडलाइन्स नव्हेत. उपचार करणाऱ्या डॉक्टरांना त्यांचे ज्ञान, अनुभव यांसोबतच अशा गाइडलाइन्सची चौकट ही उपचार योग्य मार्गावर ठेवण्यास उपयुक्त आणि आश्वासक ठरते. गाइडलाइनमुळे एकाच आजारावर आणि साधारण सारखी आजारस्थिती असलेल्या रुग्णावर कुठेही उपचार झाले तरी त्यात फार तफावत आढळत नाही,  एकवाक्यता (कन्सिस्टन्सी) येते. वैद्यकतज्ज्ञ, औषधतज्ज्ञ, संशोधक यांनी शास्त्र आणि पुराव्यांवर आधारित (एव्हिडन्स बेस्ड) गाइडलाइन्स बनवलेल्या असतात. शास्त्र हे वेगाने बदलत असते, वेळोवेळी गाइडलाइन्समध्ये आवश्यक ते बदल, सुधारणा केल्या जातात. त्या अपडेट केल्या नाही गेल्या, तर मात्र हे कालबाह्य उपचार घातक ठरू शकतात. काही गाइडलाइन्स स्थानिक स्थितीनुसारच बनवाव्या लागतात, उदा. अँटिबायोटिक्सच्या. ज्या विभागासाठी लागू करायच्या, तेथील इन्फेक्शन्स, रेझिस्टन्ट जिवाणू यांचा पॅटर्न पाहून अँटिबायोटिक गाइडलाइन्स बनवाव्या लागतात.

अशा मार्गदर्शक तत्त्वांचा वापर सर्व प्रगत देशांत केला जातो. परदेशांतील वैद्यक व्यावसायिकांचे काम प्राथमिक आरोग्य सेवेच्या स्तरापासूनच विशिष्ट गाइडलाइन्सच्या चौकटीत चाललेले दिसते. त्यामुळे उपचार प्रमाणित असतात. अँटिबायोटिक्ससारखी औषधे ऊठसूट वापरता येत नाहीत. रुग्णही गाइडलाइन्सचे महत्त्व जाणतात. अशा गाइडलाइन्समुळे वैद्यकीय व्यावसायिकांच्या प्रिस्क्रिप्शन-लेखनाच्या ‘स्वातंत्र्या’वर गदा येते का? ते संकुचित होते का? वरकरणी असे वाटू शकते. पण अशा मार्गदर्शक तत्त्वांमुळे त्यांना अचूक निदानावर पूर्ण लक्ष केंद्रित करता येते, त्यानुसार सर्वोत्तम उपचार गाइडलाइन्सच्या आधारे ते देऊ शकतात. त्यातूनही आवश्यक असेल तेव्हा गाइडलाइनच्या बाहेर जाऊन उपचार करण्याचे स्वातंत्र्य, अधिकार डॉक्टरांना असतेच. या गाइडलाइन म्हणजे कायदेशीर बंधन नव्हेत. पण गाइडलाइन बाजूला का ठेवावी लागली याबाबतचे कारण तर्कसुसंगत असावे अशी अपेक्षा असते. अनेक देशांत तर, नियमानुसार ते लिखित स्वरूपात नमूद करून ठेवावे लागते.

ट्रीटमेंट गाइडलाइन्सची उपयुक्तता काळाने सिद्ध केलेली आहे. इंग्लंडमध्ये ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर हेल्थ अ‍ॅण्ड केअर एक्सलन्स’ म्हणजे ‘नाइस’ या संस्थेने तयार केलेल्या गाइडलाइन्स अतिशय परिपूर्ण आहेत. १९९० च्या दशकापासून त्या अमलात असून जगभर त्या प्रमाण मानल्या जातात.

आपल्याकडे स्टॅण्डर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स / गाइडलाइन्स सरकार, रुग्णालये, व्यावसायिक संस्थांनी, काही आजारांसाठी बनवल्या आहेत. पण या संकल्पनेचा प्रसार-प्रचार देशभर सर्व स्तरांत, विशेषत: प्राथमिक आरोग्य सेवेत, तितकासा झालेला दिसत नाही. क्षयरोग उपचारांसाठी शासनाने सातत्याने मार्गदर्शिका बनवल्या. पण त्या मुख्यत: शासकीय रुग्णालयांपुरत्याच राहिल्या. ‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट २०१०’च्या संकेतस्थळावर काही आजारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आहेत.

एका सर्वेक्षणामध्ये नवोदित डॉक्टरांना कॉलेजात शिकलेली थिअरी आणि प्रत्यक्षातील प्रॅक्टिस याची सांगड घालताना प्रिस्क्रायबिंगसाठी, या गाइडलाइन्समुळे आत्मविश्वास वाढल्याचे त्यांनी नमूद केले. स्पेशालिस्ट डॉक्टरांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. त्यांचे स्पेशलायझेशन सोडून इतर आजारांसाठीच्या गाइडलाइन्स त्यांना विशेष उपयुक्त वाटल्या. आपल्याकडे ट्रीटमेंट गाइडलाइन्सची संकल्पना, उपयुक्तता, वाव, त्यातील अडचणी समजून त्या दृष्टीने गांभीर्याने विचार झाला पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेने बनवलेल्या किंवा इतर ग्लोबल गाइडलाइन योग्य ते बदल करून आपण वापरू शकतो. किंवा शासनाच्या पुढाकाराने मेडिकल कौन्सिल, असोसिएशन्स यांनी एकत्र होऊन नवीन गाइडलाइन्स बनवणे, त्याची माहिती सर्व (शासकीय आणि खासगी) छोटी मोठी रुग्णालये, जनरल प्रॅक्टिशनर्स, स्पेशालिस्टपर्यंत पोहोचवणे, आणि वैद्यकीय जगतात रुजवणे महत्त्वाचे आहे. ऑनलाइनच्या काळात तर हे सहजसाध्य आहे. मात्र मार्गदर्शिका अचूक, व्यवहार्य आणि वास्तव लक्षात घेऊन बनवलेल्या असाव्यात. शासकीय व खासगी क्षेत्रातील तज्ज्ञ, पब्लिक हेल्थ एक्स्पर्ट्स या साऱ्यांना सामील करून घेऊन कन्सल्टेटिव्ह प्रक्रियेने सहमतीने त्या तयार व्हाव्या. हे काम वेळखाऊ असले तरी महत्त्वाचे आहे. आवश्यक त्या सुधारणा गाइडलाइन्समध्ये सातत्याने केल्या गेल्या पाहिजेत. समजा टॉसिलिझुमाब जर उपयुक्त नाही हे सिद्ध झाले असेल तर गाइडलाइनमध्ये बदल करावा लागेल, ती माहिती सर्वत्र पोहोचली पाहिजे.

इंडियन मेडिकल कौन्सिल रेग्युलेशन- २००२ मधील कलम १.५. प्रमाणे प्रिस्क्रिप्शनमध्ये औषधाचे नाव जेनेरिक (मूळ नाव) लिहावे, प्रिस्क्रिप्शन तर्कसंगत असावे. पण वस्तुस्थिती तशी नाही. त्याची कारणे अनेक आहेत. आपल्याकडे अनावश्यक औषधे, अतार्किक औषध मिश्रणे भरपूर आहेत. फार्मा कंपन्यांची चढाओढ, ब्रॅण्ड्सची बजबजपुरी आहे. त्याची चर्चा आज इथे नाही पण या साऱ्या पार्श्वभूमीवर ट्रीटमेंट गाइडलाइन्सचे महत्त्व अधिकच वाढते.

आणि हो – रॅशनल ड्रग यूज, मार्गदर्शक तत्त्वे यांवर वैद्यकीय अभ्यासक्रमात अधिक भर असला पाहिजे. तदनंतर ‘निरंतर वैद्यक शिक्षणा’तून (सीएमई) ते ठसवले पाहिजे. अलीकडेच ‘प्रिस्क्रायबिंग कौशल्य’ या विषयावर इंटर्न डॉक्टर्ससाठी खास ऑनलाइन प्रशिक्षण चालू होणार असल्याचे संकेत आहेत आणि ती स्वागतार्ह बाब आहे.

लेखिका औषधनिर्माणशास्त्राच्या प्राध्यापक आहेत.

ईमेल : symghar@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2020 12:03 am

Web Title: dosage guidelines for medication abn 97
Next Stories
1 औषध जुने, उपयोग नवे!
2 उपाय, उपयोग आणि अपाय!
3 करोना येता घरा..
Just Now!
X