|| प्रा. मंजिरी घरत

शनिवारचा दिवस. सकाळची वेळ. अमेरिकेतील विविध गावांमधल्या औषध दुकानांत येणाऱ्यांची वर्दळ नेहमीपेक्षा आज खूप जास्त होती आणि सर्व जण येताना हातात छोटय़ा पिशव्या घेऊन येत होते आणि जाताना मात्र रिकाम्या हाताने जात होते. नेमके काय चालू होते या फार्मसींमध्ये? इतके लोक काय घेऊन येत होते या दुकानांत?

आपण औषधे आणतो, वापरतो, काही संपून जातात, काही उरतात. ती मुदतबाह्य़ झाल्याचे कधी तरी लक्षात येते, कधी अर्धवट कापलेल्या स्ट्रिप्सवरील एक्सपायरी तारीख गायब असते, कधी तरी पूर्वी आणलेल्या, नमित्तिक वापरलेल्या औषधांचे उपयोग आठवत नसतात. एकंदर ही औषधे आपल्याला नकोशी असतात. मग तुम्ही-आम्ही काय करतो? कचऱ्याच्या डब्यात किंवा सिंक, टॉयलेटमध्ये फेकून देतो. यापेक्षा आणखी काही पर्याय आपल्याकडे आहेत का उपलब्ध? सध्या तरी नाहीत. पण विकसित देशांत ग्राहकांसाठी विचारपूर्वक धोरण आखून सुविधा केलेल्या आहेत. त्याविषयीची चर्चा आज.

निसर्गातील औषध प्रदूषण गेले काही वर्षे जाणवू लागले आहे. या औषध प्रदूषणाची तीन प्रमुख कारणे : मुदतबाह्य़, निरुपयोगी झालेली कचऱ्यात किंवा इतरत्र टाकलेली औषधे, मानवी मलमूत्रातून बाहेर पडलेली औषधे आणि औषध कारखान्यांनी, रुग्णालयांनी नकोशी झालेली औषधे नियमानुसार प्रक्रिया करून किंवा नियमबाह्य़पणे टाकलेली (डम्प केलेली) औषधे. ही औषधे भूगर्भ, पाणी यांत मुरत जातात. या औषधांनी निसर्गातील जलचर, वनस्पती यांच्यावर तर घातक परिणाम होत आहेतच, पण औषधांचे अंश पाण्याचे स्रोत, माती, खत असे सर्वत्र पोहोचून अन्नसाखळीत प्रवेश करतात. आपल्या नकळत अशा प्रकारे औषधांचे कॉकटेल शरीरात जाण्याची शक्यता असते किंवा जातही असावे. अंत:स्रावी ग्रंथींचे काम डिस्टर्ब करणे, प्रजनन समस्या, कर्करोग, हृदयरोग असे काहीही होऊ शकते; अर्थात याबाबत आपला अभ्यास सध्या तरी तुटपुंजा आहे. अँटिबायोटिक्स प्रतिरोधाचे एक कारण अँटिबायोटिक्सची अयोग्य विल्हेवाट हे आता लक्षात येत आहे. फार्मा उद्योगासाठी मुदतबाह्य़ औषधांची विल्हेवाट कशी लावावी याविषयी औषध कायद्यात नियम आहेत. सहसा अशी औषधे जाळली (इन्सिनरेशन) जातात. पण ग्राहकांनी अशा औषधांचे काय करावे यासाठी कोणतेही नियम आपल्याकडे अद्याप नाहीत. म्हणून आपण औषधे कचऱ्यात किंवा इथेतिथे फेकतो. ही औषधे या ना त्या प्रकारे पर्यावरणावर तर विपरीत परिणाम करतातच, पण नशेसाठी वापर, लहान मुले किंवा जनावरांनी खाल्ल्याने त्यांना विषबाधा, तसेच पुनर्वापर होण्याची भीतीदायक शक्यताही असते. काही वर्षांपूर्वी मुंबईत कचऱ्यातील औषधांचे शिस्तीत वर्गीकरण करून रिपॅकिंग करून विक्रीस आणणाऱ्या समाजकंटकांची टोळी अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पकडली होती.

विकसित देशांत औषधांची विल्हेवाट हा विषय संवेदनशीलपणे, गांभीर्याने हाताळला जातो. औषध प्रशासन आणि अन्य संबंधित वेबसाइट्सवर  ग्राहकांसाठी मार्गदर्शन असते. काही औषधांच्या लेबलवरही यासंबंधी सूचना असतात. मुदतबाह्य़ आणि निरुपयोगी झालेल्या स्र्१ी२ू१्रस्र्३्रल्ल औषधाच्या विल्हेवाटीसाठी अमेरिकेत ड्रग एन्फोर्समेंट एजन्सीने २०१० सालापासून वर्षांतून काही दिवस ‘ड्रग टेक-बॅक’ या उपक्रमासाठी निश्चित केले. लेखाच्या सुरुवातीस उल्लेख केलेल्या फार्मसीमध्ये हाच उपक्रम चालू होता. ऑस्ट्रेलियात ‘रिटर्न ऑफ अनयूज्ड मेडिसिन्स’ (आरयूएम – ‘रम’) हा उपक्रम राबवला जातो. काही निवडक फार्मसीच्या दुकानांमध्ये आणि शासनकृत इतर काही केंद्रे, रुग्णालये येथे औषधे टाकण्यासाठी सीलबंद बॉक्स ठेवलेला असतो. ज्या सहजतेने आपण पत्र पत्रपेटीत टाकतो तसेच औषधे या बंद बॉक्समध्ये टाकायची. कोणत्याही ग्राहकाला ही औषधे कोठून आली, कोण वापरते वगरे प्रश्न विचारले जात नाहीत, त्यामुळे अगदी नशाबाज मंडळीदेखील मोकळेपणाने त्यांची नशिली औषधे आणून अशा बॉक्सेसमध्ये टाकतात. नंतर ही जमा झालेली औषधे काळजीपूर्वक पोलीस व औषध प्रशासनाच्या देखरेखीखाली जाळून नष्ट केली जातात. जाळण्याची ही प्रक्रिया स्वस्त नाही. ज्याने जन्म दिला त्याने अंतिम प्रवासातही सहभागी व्हावे (फ्रॉम क्रेडल टु ग्रेव्ह) या भूमिकेतून उत्पादकांनाही या उपक्रमात जबाबदारी दिली जाते. कोठेही औषधे चुकीच्या हाती लागणार नाहीत, कोणतेही गरप्रकार होणार नाहीत यावर कडक नजर ठेवली जाते. मागील वर्षी एप्रिलमध्ये अमेरिकेत ‘ड्रग टेक-बॅक’च्या एकदिवसीय उपक्रमात एकूण ६२५० ठिकाणी तब्बल ४७० टन औषधे जमा केली गेली. अशा प्रकारे काही दिवस निश्चित करून ग्राहकांना त्यासंबंधी आगाऊ माहिती दिली जाते. भरपूर प्रसिद्धी केली जाते. याशिवाय पोलीस केंद्रांमध्ये, काही फार्मसीमध्ये, काही रुग्णालयांत कायमस्वरूपी बॉक्सेससुद्धा ठेवलेले असतात. गूगल करून आपल्या जवळचे औषधे जमा करणारे केंद्र कोणते हे ग्राहक शोधून काढू शकतात. अमेरिका, युरोपीय देश, ऑस्ट्रेलिया येथे अशा प्रकारे औषधांची पद्धतशीरपणे वासलात लावली जाते. या उपक्रमांमध्ये फार्मासिस्ट महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतो. या प्रकारे केलेली औषधांची विल्हेवाट हा सर्वात उत्तम मार्ग समजला जातो. पण काही औषधे ग्राहकांना घरातील कचऱ्यात फेकायची असल्यास, दळलेल्या कॉफीच्या बिया किंवा तत्सम टाकाऊ पदार्थात मिसळून मग प्लास्टिकच्या पिशवीत बंद करून औषधे कचऱ्यात टाकण्याची मुभा ग्राहकांना आहे.

केरळचा पुढाकार

औषधे, पर्यावरण आणि आपले आरोग्य असा एकत्रित विचार आपल्या धोरणांमध्ये फारसा दिसत नाही. यासंबंधी विचारप्रक्रिया तातडीने चालू होणे गरजेचे आहे. या संदर्भात एक स्वागतार्ह घटना म्हणजे केरळमधील नवीन प्रयोग. पाश्चिमात्य धर्तीवर केरळ औषध प्रशासन आणि केमिस्ट संघटनेने एकत्र येऊन प्रायोगिक तत्त्वावर निवडक केमिस्टच्या दुकानांत मुदतबाह्य़ नकोशी औषधे परत घेण्यासाठी बंद बॉक्स ठेवले आहेत. त्यासंबंधी नागरिकांत जागरूकता निर्माण केली. या लेखाच्या निमित्ताने केरळच्या राज्य औषध नियंत्रकांशी चर्चा केली तेव्हा नागरिकांचा प्रतिसाद आणि फार्मासिस्टचा सहभाग याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. केंद्र शासनाकडे त्यांनी यासंबंधी प्रस्ताव सादर केल्याचे सांगितले. आपल्यासाठी नावीन्यपूर्ण आणि अनुकरणीय असा हा प्रयोग आहे. न वापरलेल्या औषधांचा दिवसेंदिवस वाढणारा आणि पर्यावरणात मुरणारा कचरा ही पर्यावरण आणि सामाजिक आरोग्याची जटिल समस्या ठरणार आहे हे ओळखून त्वरित पावले उचलणे गरजेचे आहे.

औषधांच्या विल्हेवाटीबद्दल ग्राहकांसाठी कोणतेही नियम वा मार्गदर्शक तत्त्वे सध्या तरी नाहीत. ती केंद्र शासनाने तयार करण्यासाठी प्रक्रिया चालू व्हावी यासाठी नागरिकांनी आग्रही असायला हवे.

– तोपर्यंत राज्यस्तरावर अन्न आणि औषध प्रशासन, आरोग्य विभाग यांनी यासंबंधी विचार करून केरळसारखा प्रयोग महाराष्ट्रात काही ठिकाणी राबवण्याचा विचार करावा. तसेच त्यांच्या कडक देखरेखीखाली  ‘ड्रग टेक-बॅक’ उपक्रमही यशस्वी होऊ शकेल. प्लास्टिकबंदी झाल्यावर  जसे स्वयंसेवी संस्था/ नागरिक एकत्र येऊन प्लास्टिक कचरा गोळा करण्यासाठीचे उपक्रम चालू झाले, तसाच प्रतिसाद मिळू शकेल. औषधे जाळण्यासाठीच्या सुविधा पुरेशा असणे, त्यासाठी्रचा खर्च याचाही विचार व्हावा.

– सध्या प्राप्त परिस्थितीत दुसरे योग्य मार्ग नसताना औषधे फेकताना गोळ्या, स्ट्रिप कापून कचऱ्यात टाकायच्या, द्रव औषधांत पाणी घालून मग सिंक किंवा टॉयलेटमध्ये टाकायची. औषधे कधीही मूळ पॅकिंगमध्ये फेकायची नाहीत.

– उगाच भारंभार औषधे स्वमनाने विकत आणायची नाहीत आणि डॉक्टरांनी सांगितल्या बरहुकूम औषधे घ्यायची म्हणजे औषधे घरात फारशी उरणारच नाहीत.

– मुदतबाह्य़ न झालेल्या (सुस्थितीतील) पण नको असलेल्या औषधांचा इतर गरजू रुग्णांसाठी वापर करावा यासाठी काही सेवाभावी संघटना प्रयत्नशील असतात. विचार खूप स्तुत्य आहे. मुंबईत काही ठिकाणी असे प्रयोग झाले आहेत. पण अनेक मुद्दे आहेत. औषधांचे स्टोरेज नीट झाले का? पॅकिंग बाहेरून उत्तम दिसले तरी आतील औषधे नक्की सुरक्षित आहेत का? दान म्हणून आलेल्या औषधांचा स्रोत योग्य आहे की कुणी बेकायदा घेऊन इथे जमा केली? कायद्यातही यासाठी तरतूद अद्याप नाही. अनेक बाबींचा विचार होणे गरजेचे आहे. नंतरच या पर्यायाचा स्वीकार करता येईल.

लेखिका औषधनिर्माणशास्त्राच्या प्राध्यापक आहेत.

ईमेल : symghar@yahoo.com