03 March 2021

News Flash

औषध जुने, उपयोग नवे!

औषधांचे पुनरुद्देशीकरण हे भविष्यात निश्चितच अधिकाधिक होत राहणार

प्रा. मंजिरी घरत

कुणी सांगावे असेही होईल की एकाच घरात एकच औषध दोन रुग्णांमध्ये अगदी वेगवेगळ्या आजारांसाठी वापरले जाईल. औषधाचा डोस, उत्पादक, वेगळे असू शकेल पण त्यातील ‘बहुरूपी’ औषध तेच असेल..

‘कोविडमधील माझे स्थान’ या विषयावर गप्पांच्या कार्यक्रमाला सारी दिग्गज आणि नवोदित औषधे जमली होती. या निमित्ताने प्रत्येक जण त्याचा जन्म, आयुष्यातील चढउतारांना उजाळा देणार होता. जुने जाणते अ‍ॅस्पिरिन, त्याने पुढाकार घेतला आणि प्रथम बोलू लागला-

‘‘ऐका ना, माझा पहिला जन्म कधी झाला, आहे माहीत? पार १९१७ साली माझे बारसे झाले वेदनाशामक म्हणून. माझ्याविषयी संशोधकांमध्ये अतीव उत्सुकता पहिल्यापासूनच होती. १९७०च्या दशकात त्यांना असा शोध लागला मी रक्त पातळ करू शकतो, रक्ताची गुठळी होऊ देत नाही, ते सुद्धा वेदनाशामक म्हणून वापरतात त्यापेक्षा कमी डोसमध्ये. मग काय? माझा परत नव्याने जन्म झाला. आता मी वेदनाशामक कमी पण हृदयविकार, हार्ट अ‍ॅटॅक रोखण्यासाठीचे औषध म्हणून जास्त ओळखले जातो. खरे तर या नवीन अवतारामुळे मी टिकलो. नाही तर मला इतकी स्पर्धा होती नवनवीन वेदनाशामकांची, की कदाचित त्यांच्यासमोर नसतो तरलो मी.’’

जमलेल्या औषध परिवारातून साहजिकच उद्गार निघाले ‘ग्रेटच आहेस तू..!’ आणि आपलाही असे काही नवीन अवतार येऊन महत्त्व वाढेल का या विचारात ही मंडळी गढली. तेवढय़ात थॅलिडोमाइडने संभाषणात उडी घेतली. ‘‘अरे माझा गाशा गुंडाळला होता मी १९६१ सालीच. मी तेव्हा वागलोही  वाईटच. जर्मनी, इंग्लंडमधील गर्भवती माऊलींनी मला त्यांना होणाऱ्या उलटय़ा थांबवायला घेतले आणि मी थेट पोटातल्या बाळापर्यंत पोहोचून बाळाच्या हातापायाची वाढ थांबव, बाळाला अपंग कर असे उद्योग केले. वैद्यकीय इतिहासात मी कुप्रसिद्ध झालो. मला वाटले संपले आपले आयुष्य. औषध नियंत्रकांनी मला पार हद्दपार केले, पण संशोधकांनी मात्र केराची टोपली न दाखवता वेगळा विचार केला. ते मला घेऊन प्रयोग करतच राहिले. मीही पापाचे परिमार्जन म्हणून कर्करोगासाठी आणि कुष्ठरोगासाठी उपयुक्तता दाखवली. कित्येक दशकांनंतर अक्षरश: थडग्यातून बाहेर आलो. हो आता वापरावर थोडी बंधने असली तरीही मला मानाचे स्थान आहे. कुणाचे नशीब कधी कसे फळफळेल नाही सांगता येत.’’ स्वत:वर खूश असलेले थॅलिडोमाइड म्हणाले.

‘‘अगदी आमच्या मनातले बोललास मित्रा-’’ हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन आनंदून उद्गारले आणि रेमडेसिविर, टॉसिलीझूमाब यांनी हसून दुजोरा दिला. मग चर्चा मुख्य मुद्दय़ावर आली- या तिघांनी पूर्वी त्यांचा कसा माफक वापर होता.. पण आता करोनाविरुद्ध गुण दाखवल्याने कसे जगभर नाव झाले, कशी प्रचंड मागणी आहे.. याचे रसभरित वर्णन चालू केले.

मंडळी, आपल्या लक्षात आले असेल कशाबद्दल आहे चर्चा ती. एखादे औषध नवीन येते, त्यास मान्यता मिळते ती एका विशिष्ट आजारावरील उपयोगासाठी; पण कालांतराने तेच औषध इतर काही आजारांतही उपयुक्त असल्याचे पुराव्यांनी सिद्ध होते. औषध आधीच मान्यताप्राप्त (भले वेगळ्या आजारासाठी असेल) असल्याने त्याची सुरक्षितता, साइड-इफेक्ट्सही सिद्ध झालेले असतात. त्यामुळे या नवीन उपयोगास मान्यता मिळवायला लागणारा कालावधी आणि खर्च, पूर्णतया नवीन औषधाच्या शोध आणि विकासाच्या  नेहमीच्या (कन्व्हेन्शनल) प्रक्रियेपेक्षा तुलनेने बराच कमी असतो. अशा या ‘फास्ट ट्रॅक स्मार्ट ड्रग डिस्कव्हरी’ला म्हणतात- ‘ड्रग रीपर्पजिंग’. आपण ‘औषध पुनरुद्देशीकरण’ असे म्हणू. किरकोळ काही तरी प्रयोग करून औषधाचे पुनरुद्देशीकरण करता येत नाही. त्यासाठी त्या जुन्या औषधाला स्वत:ला नवीन वापरासाठी सिद्ध करावे लागते. शास्त्राच्या कसोटय़ांवर उतरावे लागते. एका आजारात वापरायला लागणारा डोस आणि पुनरुद्देशित उपयोगासाठी वापरावा लागणारा डोस वेगवेगळा असू शकतो, किंबहुना बरेचदा तसेच दिसते.

पुनरुद्देशीकरण कधी अपघाताने होते. पण गेल्या काही वर्षांत पुनरुद्देशीकरणाला चालना मिळाली असल्याने हे काम शिस्तबद्धरीत्या, तर्कशुद्ध पद्धतीने चालताना दिसते. औषधाची कार्यपद्धती, आजारात होणारे शरीरातील बदल, साइड-इफेक्ट्स याचा अभ्यास करून (एक आजारात औषधाचा दिसणारा साइड इफेक्ट दुसऱ्या आजारात उपयुक्त परिणाम ठरू शकतो) अस्तित्वातील सर्व औषधांच्या संग्रहाचे (‘लायब्ररी’चे) विविध उपयोगांसाठी प्रत्यक्ष प्रयोगशाळेत ‘स्क्रीनिंग’ किंवा संगणकीय बायोइन्फोर्मॅटिक्स पद्धतीने औषधांच्या डेटाबेसचे स्क्रीनिंग केले जाते. ‘होतकरू’ औषध उमेदवारांवर पुढे चाचण्या केल्या जातात. अशा प्रकारे सध्या वापरातील किंवा विस्मृतीत गेलेली किंवा बंदी आलेली औषधेही नव्याने परत येत आहेत. कर्करोगासाठी कोणती औषधे पुनरुद्देशित करता येतील का यासाठी अनेक वर्षे खास संशोधन चालू आहे. भारतात पुनरुद्देशित उपयोगासाठी त्या औषधाचे नव्याने पेटंट घ्यावे लागत नाही; पण इतर अनेक देशांत यासाठी पेटंट मिळवता येते.

रीपर्पज औषधांची बरीच इंटरेस्टिंग उदाहरणे आहेत. त्यातील थोडी पाहू. मिनॉक्सिडील हे १९७९ पासून उच्चरक्तदाब कमी करण्यासाठीचे औषध. ते वापरताना लक्षात आले की रुग्णांमध्ये केसांची वाढ खूप होत होती. झाले, संशोधनाला चालना मिळाली. १९८८ मध्ये मिनॉक्सिडील हे केसगळती, टक्कल यावर बाह्य़ वापरासाठी (एक्स्टर्नल यूज) बाजारात रुजू झाले. मिथोट्रिक्सएट हे औषध कर्करोगावरील; पण कालांतराने त्यास संधिवाताचे औषध म्हणूनही मान्यता मिळाली.

सिल्डेनाफिल (‘व्हायग्रा’मधील औषधाचे मूळ नाव ) हे हृदयरोगावरील औषध म्हणून विकसित करताना क्लिनिकल ट्रायल्समध्ये त्याची याकामी फारशी गुणवत्ता दिसून आली नाही. पण औषधाचे शरीरावरील परिणामांचे निरीक्षण करताना दिसून आले की हे पुरुषांमधील लैंगिक दुर्बलतेसाठी अधिक उपयुक्त होईल. त्यास १९९८ मध्ये मान्यता मिळाली, जगभर ते प्रसिद्ध झाले. नंतर सिल्डेनाफिल फुप्फुसजन्य उच्च रक्तदाबासाठी (पल्मोनरी हायपरटेन्शन) ‘रीपर्पज’ झाले २००५ साली. अर्थात औषधाच्या अशा नवीन उपयोगाची माहिती सर्वत्र लगेच पोहोचतेच असे नाही. त्यामुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो. काही वर्षांपूर्वी एका फार्मासिस्टने फोन केला. फार्मसीमध्ये आलेल्या  महिला रुग्णाच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये सिल्डेनाफिल लिहिलेले होते. पुरुषांसाठीचे औषध महिलेला कसे या विचाराने तो गोंधळला. मी तपशील विचारला. प्रिस्क्रिप्शन हृदयरोगतज्ज्ञाचे होते, औषध तिला ‘पल्मोनरी हायपरटेन्शन’साठी दिले आहे, ‘मेडिकेशन एरर’ नाही; हे ऐकून त्याला हायसे वाटले.

कोविडवर रामबाण औषध अद्याप नाहीच. काही औषधांचे तात्पुरते पुनरुद्देशीकरण करण्यात आले. रेमडेसिविर हे औषध अँटी-व्हायरल, वेगवेगळ्या विषाणूजन्य इन्फेक्शन्समध्ये त्याचा परिणाम होतो का याची चाचपणी चालू होती २००९ पासून. जेव्हा  इबोला या रोगाची साथ २०१५ मध्ये आली, तेव्हा रेमडेसिविर लागू पडते का यासाठी चाचण्या झाल्या. तसेच आता कोविड रुग्णांमध्ये केलेल्या चाचण्यांमध्ये काही प्रमाणात सकारात्मक परिणाम मिळाल्याने रेमडेसिविर ‘आणीबाणीच्या परिस्थितीतील उपयोगा’साठी (इमर्जन्सी यूज) गंभीर रुग्णांमध्ये वापरास मान्य झाले. टॉसिलीझूमाब हे  विशिष्ट प्रकारच्या संधिवातामध्ये वापरण्यासाठी मान्यताप्राप्त आहे. ते अतिसक्रिय रोगप्रतिकार यंत्रणेला काबूत आणते. काही कोविड रुग्णांमध्ये रोगप्रतिकार यंत्रणा भरकटून रासायनिक वादळ (सायटोकाइन स्टॉर्म) चालू होऊन गंभीर गुंतागुंत होते. अशा रुग्णांसाठी ‘इमर्जन्सी यूज’ मान्यता टॉसिलीझूमाबला मिळाली. नुकत्याच झालेल्या नवीन चाचण्यांचे निकाल उत्साहवर्धक नसल्याने त्याच्या उपयुक्ततेविषयी आता साशंकता निर्माण होत आहे. स्टिरॉइड्स प्रकारातील जुनी औषधे कोविडमध्ये उपयुक्त ठरत आहेत. हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन हे मुळात मलेरियावर, संधिवातासाठी वापरतात. कोविडची साथ आल्यावर काही ट्रायल्समध्ये त्याची थोडी उपयुक्तता दिसली. ते कोविड प्रतिबंधासाठी आरोग्यसेवकांमध्ये वापरले गेले. जगभर अनेक अभ्यासांमध्ये उलटसुलट निष्कर्ष असल्याने त्याच्या वापराविषयी गोंधळाचे वातावरण आहे.

औषधांचे पुनरुद्देशीकरण हे भविष्यात निश्चितच अधिकाधिक होत राहणार. नवनवीन औषधांचा शोध घेतानाच आपल्या भात्यात असलेली सर्व अस्त्रे  साध्य, असाध्य किंवा नव्या आजारांसाठी लागू होतात का हे संशोधक नक्कीच तपासत राहणार. नेहमीच्या ‘न्यू ड्रग डिस्कव्हरी डेव्हलपमेंट’चा १०-१२ वर्षे कालावधी, अब्जावधी रुपये खर्च, या मानाने ‘जुन्यातून नवे’ हा  शॉर्टकट ठरतो. कुणी सांगावे असेही होईल की एकाच घरात एकच औषध दोन रुग्णांमध्ये अगदी वेगवेगळ्या आजारांसाठी वापरले जाईल. औषधाचा डोस, उत्पादक, वेगळे असू शकेल पण त्यातील ‘बहुरूपी’ औषध तेच असेल. शक्यता भरपूर  आहेत. विज्ञानाची भरारी अफाट आहे.

हे सर्व वाचताना औषध विविधांगी परिणाम करत असते, आधुनिक विज्ञान त्याचा बारकाईने अभ्यास करते हे तर लक्षात आलेच असेल पण औषध लिहून देताना, डिस्पेन्स करताना, विकत घेताना आणि वापरताना प्रत्येक पातळीवर किती सजगता पाळणे महत्त्वाचे हेही अधोरेखित होतेच.

लेखिका औषधनिर्माणशास्त्राच्या प्राध्यापक आहेत.

ईमेल : symghar@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2020 3:03 am

Web Title: one drug many uses article about medicine multi use drugs zws 70
Next Stories
1 उपाय, उपयोग आणि अपाय!
2 करोना येता घरा..
3 ग्राहकाला औैषध-माहितीचा ‘उपचार’
Just Now!
X