31 October 2020

News Flash

मीठ

आयुर्वेदात हे श्रेष्ठ मीठ सांगितले आहे.

मागील सदरात आपण मीठ आणि थायरॉइडचा संबंध पहिला होता. मात्र बऱ्याचदा आयुर्वेदाला कोणते मीठ अपेक्षित आहे याबद्दल बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो. कारण मीठ हा सर्व रसांचा राजा आहे. त्याच्याशिवाय अन्नाला चव येणे शक्य नाही. मीठ खारट असले तरी गुजरातीत मिठाला ‘मीठू’ असे म्हणतात. हिंदीत त्याला ‘सबरस’ असे म्हणतात. समुद्राचे खारे पाणी समुद्रकिनारी वाफे बनवून त्यात साठवले जाते व सूर्याच्या उष्णतेने हे पाणी सुकून जाते आणि मीठ बनते. सध्या जगामध्ये हेच मीठ जास्त वापरले जाते. तसेच खाणीतूनही मीठ निघते त्याला सैंधव असे म्हणतात.
आयुर्वेदात हे श्रेष्ठ मीठ सांगितले आहे. आयुर्वेदात ‘लवण रस’मध्ये प्रमुख पाच प्रकार सांगितले आहेत. यास ‘पंचलवण’ असे म्हणतात. सैंधेलोण, पादेलोण, बीडलवण, सौवर्चल व सामुद्रलवण असे. पैकी सैंधव लवण हे इतर लवणांपेक्षा सौम्य आहे त्यामुळे आहारात मीठ वज्र्य करावयाचे झाल्यास तसेच रक्तदाब वाढला असल्यास सैंधवचा वापर करतात. आयुर्वेदात सैंधव मिठाचे महत्त्व फार आहे. मोठय़ा मिठाचे म्हणजे समुद्रापासून मिळणाऱ्या मिठाचेही अनेक उपयोग आहेत. कारण या मिठाचे कातडी कमावण्याच्या व्यवसायापासून ते रस्त्यावरील बर्फ वितळून रस्ता मोकळा करण्यापर्यंत वापर होतो. मोठमोठय़ा मसाल्याच्या, चिप्स, वेफर्स, सॉस इत्यादी पदार्थाच्या निर्माण प्रक्रियेमध्ये याच मोठय़ा मिठाचा वापर फार मोठय़ा प्रमाणात होतो. एवढेच काय पण घरात साधं लोणचं लावायचं असेल तरी हेच मीठ वापरलं जातं. यावरून तुम्हाला त्याच्या विविध उपयोगाचा तर अंदाज आलाच असेल. तर हे तेच मोठे मीठ ज्याबद्दल मी बोलत आहे. सध्या यात कृत्रिमरीत्या आयोडिन घातल्याने बऱ्याचदा त्याची नैसर्गिक चव व गुणधर्मही बदलतात. त्यामुळे आयुर्वेद कोणत्याही एकाच मिठाला अथवा एकांगी विचाराला थारा देत नाही. गरजेनुसार व व्याधीनुसार आयुर्वेदात वेगवेगळ्या मिठाचा प्रकार व उपयोग केलेला आढळून येतो. यावरून आपले आचार्य व आपल्या परंपरा किती प्रगत होत्या हेच अधोरेखित होत आहे. या मोठय़ा मिठाचा खडा जिभेवर ठेवून बघा. गेलेली रुची परत येते. काहीही खाण्याची इच्छा नसेल तर खावेसे वाटते. अन्नाला चव येते. मीठ नसेल तर अन्न बेचव होते. दुखणाऱ्या भागावर आमची आज्जी या मोठय़ा मिठाचे खडे तव्यावर गरम करून कापडात बांधून त्याचा शेक द्यायची. दुखणं पटकन थांबायचं. याच मोठय़ा मिठाचा खडा दाढ दुखत असली की त्या दाढेत धरून ठेवला की दाढदुखी पटकन थांबायची. काही लोक पूर्वीच्या काळी हे मीठ व हळद एकत्र करून दात घासायचे. हे उत्तम किटाणूनाशक आहे. तुम्ही स्वत: खरंच एकदा तरी हळद मिठाने दात घासून पाहा. पूर्ण मुखातून लालास्राव सुरू होतो, जिभेवरचा पांढरा थर जातो. दातांचे आरोग्य वाढते. प्रत्येक चित्रपटात पूर्वी याच मोठय़ा मिठाच्या पाण्याच्या पट्टय़ा तयार करून ताप आलेल्या व्यक्तीच्या कपाळावर ताप कमी करण्यासाठी, तो डोक्यात जाऊ नये यासाठी वापरल्या जायच्या. कोमट मिठाच्या पाण्याने आंघोळ केली की, कणकण जाते, अंग मोकळे होते, अंगदुखी थांबते. ओवा व मीठ वाटून चूर्ण घेतल्यास पोटदुखी लगेच थांबते. मिठाबरोबर मिरे वाटून खाल्ले तर उलटी बंद होते. जुलाब सुरू झाल्यास हेच मीठ आणि लिंबू पाणी एकत्र करून दिले जाते. हे मीठ घेतले नाही तर अशक्तपणा जाणवतो. हाडे ठिसूळ होतात. काहींना रात्रीअपरात्री पायांना गोळे येतात. पिंडऱ्या दुखू लागतात. या उलट मीठ जास्त घेतले तर केस गळू लागतात. केस पांढरे होतात. चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. सतत नेत्रविकार मागे लागतात, रांजणवाडय़ा उठतात. मिठाचे आहारातील प्रमाण जास्त झाल्यास पचन बिघडते व पित्त वाढून आमशयाचा दाह होतो. पण या मिठाशिवाय माणसाचे जगणे अवघड आहे. कारण मीठ ही एक जीवनावश्यक वस्तू आहे.
वैद्य हरीश पाटणकर
harishpatankar@yahoo.co.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2016 1:40 am

Web Title: ayurvedic treatment and medicines 2
Next Stories
1 थायरॉइड
2 बहुगुणी हळद
3 मधुमेह
Just Now!
X