04 August 2020

News Flash

कोंडा

एखाद्या आजाराचे निदान कुठे असेल हे खरंच बऱ्याचदा अनाकलनीय असते.

एखाद्या आजाराचे निदान कुठे असेल हे खरंच बऱ्याचदा अनाकलनीय असते. एकदा आमच्या चिकित्सालयात अशीच गंमत झाली. एक रुग्ण दोन महिने माझ्याकडे डोक्यातील ‘कोंडा’ घालविण्यासाठी उपचार घेत होता. मात्र त्यांच्या डोक्यातील ‘कोंडा’ काही हटायला तयार नव्हता. बरेच उपचार करून झाले, मात्र त्यांच्या डाव्या बाजूच्या डोक्यावरील कोंडा जात नव्हता, उजव्या बाजूचा पूर्णत: गेला होता. बरं असं का होत आहे ते पण कळत नव्हतं. रुग्ण पुन्हा आल्यावर मात्र मी संपूर्ण माहिती परत घ्यायची ठरवलं, सर्व प्रश्न विचारून झाले. दिनचर्या सगळी सांगून झाली. तरीही निदान काही सापडत नव्हते. आता मात्र माझं डोकंच चालेनासं झालं, कारण औषधात मी कुठे चुकत असेल असं मला बिलकुल वाटत नव्हतं. मग प्रश्न उरतो तो फक्त रुग्णाच्या पथ्य पाळण्याचा. रुग्णसुद्धा सांगितलेल्या सर्व गोष्टी पाळत होता. अगदी छोटय़ा छोटय़ा गोष्टीसुद्धा. मग नक्की काय चुकतं आहे हे कळायला मार्ग नाही. मग दिनचर्येत सापडत नाही तर रात्रचर्येत सापडेल या विचाराने ते रात्री झोपतात कधी, कसे, कुठे? या गोष्टी विचारायला सुरुवात केली. गंमत म्हणजे मला जे निदान सापडलं ते ऐकून तुम्हाला सुद्धा हसायला येईल. तो रुग्ण पुण्यात शिकायला आलेला होता, कॉट बेसिसवर रूम घेऊन राहात होता. एका रूममध्ये चार विद्यार्थी. त्यामुळे गप्पा मारत एकमेकांकडे पाहात झोपायची लागलेली सवय. त्यामुळे याला फक्त डाव्या कुशीवरच झोपायची सवय लागली. असे काही विद्यार्थी एक-दोन महिने बेडशीट धुवत नाहीत. साधं झटकत पण नाहीत. त्यामुळे कितीही औषधे दिली तरी त्याचा कोंडा डोक्यावरून उशीत आणि उशीवरून डोक्यात एवढाच प्रवास करत होता. त्यामुळे उजव्या बाजूचा कोंडा घालविण्यात यश आलं. मात्र डाव्या बाजूला येत नव्हतं. त्यास हे निदर्शनास आणून दिलं आणि बेडशीट स्वच्छ ठेवण्याबरोबरच रोज डोक्याखाली एक नवीन वर्तमानपत्र टाकून झोपण्यास सांगितलं. अवघ्या दहा दिवसांतच त्याचा कोंडा पूर्णपणे बरा झाला. असो. तर मग हा कोंडा घालविण्यासाठी आपण घरच्या घरी काय करू शकतो? हा का जात नाही? याचे काही प्रकार आहेत का? याचे होण्याचे नक्की कारण काय? या सर्वाची उत्तरं आज आपण पाहू. खरं तर कोंडा हे आपल्या शरीरातील डोक्याच्या त्वचेचाच एक मल भाग आहे. मग यात निर्माण होणारे जंतू ( इन्फेक्शन) म्हणजे आयुर्वेदानुसार औद्भीज म्हणजे घामातून निर्माण होणारे कृमी होय. या कृमींना पोषक वातावरण मिळू लागलं की डोक्यात केसांच्या मुळाशी त्यांची वाढ होऊ  लागते. याचं प्रमाण अधिक झालं की स्काल्प सोरीअसीस नावाचा आजार सुरू होतो. एखाद्याच ठिकाणी जास्त झाले की तिथले केस गळून जातात व ‘इंद्रलुप्त’ म्हणजे ‘चाई’ नावाचा आजार होतो. याला बोली भाषेत चावी लागणे, चाई पडणे असेही म्हणतात. या सर्व प्रकारांत छोटे छोटे कृमी अर्थात इन्फेक्शन त्या ठिकाणी असतंच. सूक्ष्म दर्शकाखाली पाहिलं की दिसतं ते. त्यामुळे अस्वच्छता असणं, इतरांचा कंगवा, टॉवेल, रुमाल व अन्य गोष्टी शेअर करणं इत्यादी कारणांनी हा कोंडा पसरतो. पूर्वी एका कंपनीची फार सुंदर जाहिरात होती ‘डोक्याला डोकं भिडते जिथे.. उवांना नवे घर मिळते तिथे’ या आशयाची. त्याचप्रमाणे संपर्कामुळे हा कोंडा, उवा, लिखा वाढतात हेच समजतं. हे घालविण्यासाठी सर्वात महत्त्वाचं की अशा प्रकारे संपर्क होणाऱ्या सर्व गोष्टी सर्वप्रथम लक्षपूर्वक टाळणं. स्वच्छता राखणं. घाम आला तरी लगेच तो टॉवेलने टिपून घेणं. जास्त काळ हेल्मेट, स्कार्फ इत्यादी न वापरणं, वापरल्यास स्वच्छता राखणं.
आज्जीबाईच्या बटव्यातील खालील उपचार केले तरी कोंडा पटकन कमी होण्यास फार मदत होते. डोक्याला १० दिवस सलग निंब तेल व करंज तेल एकत्र करून त्यात थोडा भीमसेनी कापूर घालून लावणं. रोज शिकेकाई, रिठय़ाचे दळ, माका व आमलकी यांचे मिश्रण करून त्याचा काढा तयार करून त्याने केस धुतल्यास कोंडा पूर्णपणे जातो. खाज बंद होते व केसांचे आरोग्यही सुधारते. पूर्वीच्या काळी याच गोष्टी वापरल्या जायच्या. आता मात्र जाहिरातींमुळे आपल्याला या उपचारांची आठवण होत नाही. चाई किंवा स्काल्प सोरीअसीससाठी मात्र वैद्यांकडूनच औषधोपचार घ्यावेत.

– वैद्य हरीश पाटणकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2016 1:21 am

Web Title: dandruff
Next Stories
1 बहुगुणी ‘नतुराल क्रिस्टल’
2 पोट साफ होत नाही?
3 उचकी
Just Now!
X