उन्हाळा वाढू लागला की बऱ्याच जणांना डोकेदुखीचा त्रास जाणवू लागतो. या डोकेदुखीमागची कारणे आणि प्रकार दोन्ही वेगवेगळे असतात. आधुनिक चिकित्सा पद्धतीप्रमाणे मात्र प्रत्येक डोकेदुखीवर एकच औषध दिलं जातं. ते म्हणजे वेदनाशामक औषध वा पेन किलर. आयुर्वेदात मात्र यातील प्रत्येक लक्षणाचा बारकाईने विचार केला जातो व त्यानुसार त्याची चिकित्साही बदलते.

काही लोकांचे एसीतून उन्हात व उन्हातून एसीमध्ये आले की डोके दुखू लागते. हा प्रकार दोन विरोधी गुणांच्या गोष्टी एकत्र केल्याने होतो. आपले शरीर हा बदल स्वीकारायला लगेच तयार झालेले नसते त्यामुळे शिर:प्रदेशातील तापमान नियंत्रक केंद्रावर ताण येऊन डोके दुखू लागते. आपल्याकडे साधारण सध्या उन्हाळ्यामध्ये एसी १७ ते २० अंश सेल्सिअस या तापमानाला सेट केला जातो, तर त्याच वेळी बाहेरील तापमान ४० पर्यंत गेलेले असते. अचानक आत-बाहेर केल्याने शरीराला एकदम २० अंश सेल्सिअसच्या बदलाला सामोरे जावे लागते. रशियामध्ये तर कधी कधी बाहेरील तापमान उणे २० व आतील रूम तापमान २० अंश असल्याने ४० अंशांचा फरक पडतो व तेथील बहुतांशी लोकांना मायग्रेन अथवा सततची बारीक डोकेदुखी मागे लागलेले अनेक रुग्ण मी पाहिले आहेत. काही रुग्ण बाहेरून भर उन्हातून फिरून आले की लगेच जोरात लावलेल्या पंख्याच्या वाऱ्याखाली बसतात अथवा फ्रिजमधील थंडगार पाणी भरपूर प्रमाणात पितात. ही सवय असणाऱ्यांचेही कालांतराने डोके दुखू लागते. फ्रिजमधील थंड पाणी अथवा आइस्क्रीम शरीरात आल्यानंतर त्याचे पचन व्हावे लागते. हे पचन करण्यासाठी शरीराला अगोदर या दोन्हीला उणे तापमानातून शरीरातील सामान्य तापमानाला आणावे लागते. यासाठी जास्त ऊर्जा खर्च होते. पर्यायाने जास्त पित्तस्राव झाल्याने पित्त वाढून डोके दुखू लागते. काही लोकांचे सूर्य जसजसा वर चढू लागतो तसतसे डोके दुखणे वाढू लागते. या प्रकाराला ‘सूर्यावर्त’ असे म्हणतात. सायंकाळ झाली कीडोके दुखणे थांबते. पुन्हा दुसऱ्या दिवशी तसेच. या प्रकारात माका म्हणजे भृंगराज डोक्यावर स्वरस काढून लावावा व वैद्यांच्या सल्ल्याने २-२ चमचे रस पोटातूनही घ्यावा म्हणजे यातून कायमची मुक्ती मिळते. तर यातच काहींना अर्धशिशी म्हणजे अर्धे डोकेदुखीचा त्रास होतो. तर काहींना फक्त माथा शूल होतो. आमचे आजोबा अर्धशिशी झालेल्यांना अर्धी सुपारी उगाळून कपाळावर लेप लावायला सांगत याने अर्ध डोकेदुखी लगेच थांबते. तर काहींना ते ज्या बाजूचे डोके दुखत आहे त्या बाजूच्या नाकपुडीत अग्निकर्म करून रक्तस्राव होऊ देत, यामुळेसुद्धा अर्धशिशी पटकन बरी होत असे. फक्त माथा शूल असेल, घणाने घाव घातल्याप्रमाणे डोके दुखत असेल तर दूर्वाची पेंडी तयार करून डोक्याला बांधावी किंवा दूर्वा स्वरस २-२ थेंब दोन्ही नाकपुडय़ांमध्ये टाकावा. ज्यांचे सतत बारीक डोके दुखत असते त्यांनी सुंठीचा लेप कपाळावर लावावा.

water bodies, Tadoba,
ताडोबातील वाघांना आवडे नैसर्गिक पाणवठे, रखरखत्या उन्हापासून बचावासाठी….
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन
8 Poses For hair growth, healthy scalp,
मानेपासून खांदा व कंबरेपर्यंत केस वाढण्यासाठी ‘या’ ८ हालचाली करून पाहाच; केस धुताना सुद्धा ‘ही’ गोष्ट पाळा

काहींना पित्त वाढल्याने डोके दुखते, यांना उलटी केल्याशिवाय, पित्त बाहेर पडल्याशिवाय बरे वाटत नाही. यांनी किमान एकदा तरी आयुर्वेद शास्त्रोक्त वमन हा पंचकर्म उपचार करून घ्यावा. यामुळे पित्तज डोकेदुखीच्या कायमच्या त्रासापासून मुक्ती मिळते. तर काहींचे कफ वाढल्याने, सततच्या सर्दीमुळे डोके दुखत असते. अशांनी ओव्याच्या पुरचुंडीने शेकावे. काहींना वाहनावरून जास्त प्रवास केल्याने, कामाचा अतिरिक्त ताण पडल्याने, थंड वारे लागल्याने डोके दुखू लागते. हा वातज प्रकार आहे. यात कापूर घातलेल्या खोबरेल तेलाने डोक्याचा मसाज केल्यास बरे वाटते. ज्यांना रात्री जागरण झाल्याने डोके दुखत आहे त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी जेवणापूर्वी झोप घ्यावी व आहारात तूप व गुलकंद घ्यावा. बऱ्याच जणांना पोट साफ होत नसल्यामुळे डोके दुखू लागते. त्यांना पोट साफ होण्याचे औषध दिले की लगेच बरे वाटते. लक्षात ठेवा आपल्या प्रत्येकाचे डोके दुखण्याचे कारण वेगवेगळे असते, त्यामुळे आयुर्वेदात प्रत्येक डोकेदुखीची वेगवेगळी चिकित्सा सांगितली आहे.

– वैद्य हरीश पाटणकर