खरं तर रशिया हा अत्यंत शीत हवामान असणारा देश. मात्र मागील एका फेरीदरम्यान मी तिथल्या उन्हाळ्यामध्ये सोची या शहरात गेलो होतो. नेहमीपेक्षा या वेळी उन्हाचा त्रास जरा जास्तच जाणवत होता. त्यामुळे या वेळी काही रुग्ण सुद्धा वेगवेगळी लक्षणे घेऊन येत होते. त्यातच एक रुग्ण असा होता की काही केल्या त्याची तहान  भागत नव्हती. कितीही थंड पाणी प्यायले तरी थोडय़ावेळाने त्याला लगेच तहान लागत असे. वेगवेगळ्या ठिकाणाचे पाणी सुद्धा पिऊन पाहिले. मात्र तहानेचे शमन काही केल्या होत नव्हते. तिथल्या बहुतांशी डॉक्टरांना दाखवून झाले होते. मात्र काहीही फायदा झाला नाही. मग ते मला भेटायला आले. बराच वेळ चर्चा केल्यानंतर माझ्या असे लक्षात आले की यांना आयुर्वेदात सांगितलेली ‘तृष्णा’ ही व्याधी झाली आहे.

या आजारामध्ये रुग्णास सतत व फार तहान लागते. काही केल्या तहानेचे शमन होत नाही. बऱ्याच वेळा रुग्णाच्या अंगाची सुद्धा लाही लाही होते, रुग्णास दाह जाणवतो, हातापायांची जळजळ होऊ  लागते, जीभेला कोरड पडते, ओठ, जीभ, घसा नेहमी सुकून जातो. सतत पाणी पिऊन सुद्धा समाधान होत नाही. ही सर्व लक्षणे त्यांच्यामध्ये होती. काही रशियन लोकांना गोड फार आवडते. जेवण झाले तरी ते शेवटी गोड खातातच. केक, कुल्फी, आईस्क्रीम हे त्यांचे आवडीचे पदार्थ. म्हणून मी त्यांना या आहाराबद्दल विचारले तर त्यांनी सुद्धा आपण फार गोड खात असल्याची कबुली दिली व माझे निदान पक्के झाले. हा आमज तृष्णेचा प्रकार होता. फार गोड खाल्लय़ाने अशा प्रकारची तहान लागते. असो.
सध्या त्यांना उपशय देणे फार गरजेचे होते. म्हणून मी काही दिवस गोड बंद करण्याचा सल्ला दिला व औषध म्हणून एक घरगुती उपाय सांगितला. गंम्मत म्हणजे एका दिवसातच त्यांना लागणारी तहान बंद झाली. ते माझ्यावर फारच खुश झाले. कारण अनेक दिवस इतक्या डॉक्टरांना दाखवूनही जे सध्या झाले नाही ते मी करून दाखवले होते. मी काहीही वेगळे केले नाही मात्र आज्जीबाईच्या बटव्यातील एक युक्ती वापरली. मी प्रथमत: त्यांचे फ्रिजचे पाणी बंद केले. एका पातेल्यात पाणी घेऊन ते उकळल्यानंतर थंड होत असताना त्यात एक गरम केलेल्या खापराचा तुकडा व एक चिमुट सुंठ टाकायला सांगितली. नंतर ते पाणी गाळून घेऊन दिवसभर थोडे थोडे असे पिण्यास सांगितले. तिथे खापराचा तुकडा मिळविणे महाकठीण झाले होते पण भाजलेल्या मातीपासून तयार होणाऱ्या कोणत्याही मातीच्या भांडय़ाचा तुकडा शोधा म्हटल्यावर त्यांनी ते साध्य केले. या मातीत उष्ण संस्कार व शीत संस्कार असे दुहेरी संस्कार झाल्याने व माती पृथ्वी व आप महाभूत प्रधान असल्याने इथे तेज महाभूतामुळे उत्पन्न अशा ‘तृष्णा’ व्याधीचे शमन झाले. सुंठीने आमाचे पाचन केले व रुग्णास उपशय मिळाला. खरतर आजकाल आपल्याकडेही उन्हाळा वाढला की असे रुग्ण पाहायला मिळतात. त्यात पाश्चिमात्य संस्कृतीमुळे आपणही फ्रिज चे पाणी तहान भागविण्यासाठी वापरू लागतो. कोल्डड्रिंक्स अथवा अन्य शीत पेय वापरतो व तहान आणखीनच वाढते. त्यामुळे आपल्याकडे अशावेळी तहान भागविण्यासाठी हवेशीर ठेवलेल्या छान काळ्या मातीच्या माठातील पाणी ‘वाळा’ घालून पिल्यास पटकन तहान भागते. किंवा वर सांगितलेला उपाय करावा. लक्षात ठेवा आयुर्वेदात पाण्याचेसुद्धा पचन व्हावे लागते असे सांगितले आहे. जेवढे जास्त थंड पाणी प्याल तेवढी जास्त उष्णता शरीरात ते पाणी पचविण्यासाठी तयार करावी लागणार. शरीरात आपण एक घोट पाणी प्यायलो तरी त्यास पचन संस्थेतूनच जावे लागते. नंतर रक्तात मिसळून मग किडनीमध्ये येते व नंतर अनावश्यक पाणी मूत्र, स्वेद अथवा मलावाटे बाहेर टाकले जाते. त्यामुळे जास्त पाणी प्यायल्यानेच तहान भागते असे नाही. उलट यामुळे आपल्या पचनशक्ती वरचा व किडनीवरचा अनावश्यक ताणच वाढवत असतो व अनेक आजारांना निमंत्रण देत असतो.

china sinking
न्यूयॉर्क आणि टोकियोनंतर चीनमधील शहरेही जलमय; जगातील ‘ही’ शहरे पाण्याखाली जाण्याचे कारण काय?
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण
idli rajma among top 25 dishes most damaging biodiversity reseach
आलू पराठ्यापेक्षा इडली जास्त हानिकारक, चणा मसाला, राजमा खाण्यापूर्वी ‘हा’ धक्कादायक अहवाल वाचाच

– वैद्य हरीश पाटणकर