सद्गुरूंविषयी ज्ञानेश्वर माउलींच्या अंत:करणात असलेल्या प्रगाढ प्रेमाभक्तीच्या जाणिवेनं साऱ्यांचीच मनं भावरोमांचित झाली होती.. अचलानंद दादा म्हणाले..
अचलदादा – सद्गुरूंची पूर्णकृपा प्राप्त झाल्यावर भवचिंता सरेलच ना? मग कुठली कामना उरेल का? सद्गुरूकृपेनं माउलींना ही पूर्णकाम स्थितीच लाभली होती.. ‘‘कां चिंतामणी आलिया हातीं। सदा विजयवृत्ति मनोरथीं। तैसा मी पूर्णकाम श्रीनिवृत्ति। ज्ञानदेव म्हणे।।’’ सद्गुरू कृपेचा चिंतामणी हाती आल्यानं चिंता मिटली आणि चिंतन सुरू झालं.. मग वृत्तींवर कायमचा विजय साधला आणि सर्व अपूर्णता नष्ट झाली..
हृदयेंद्र – मघाशी तुम्ही दोघं काही ओव्या पुटपुटत होतात.. त्यामागचं गूढ मला काही कळलं नाही..
बुवा – (हसतात) अहो सगुणाची शेज, निर्गुणाची बाज आणि त्यापलीकडे विसावलेल्या कृष्णमूर्तीचं वर्णन ऐकून माझ्या मनात चांगदेव पासष्ठीतल्या ओव्या आल्या आणि त्याचवेळी अचलानंद दादांनी ज्ञानेश्वरीतल्या क्षर, अक्षर आणि उत्तम पुरुषाचं वर्णन असलेल्या ओव्या म्हटल्या.. त्यामुळे एकाच भावावेगात असलेल्या माणसांची अंत:करणं एकाच विचाराची कशी असतात, हे जाणवून मलाही आनंद वाटला..
कर्मेद्र – क्षर, अक्षर, उत्तम पुरुष?
बुवा – थोडा धीर धरा! सारं काही या चर्चेत येईलच.. पण आधी अगदी पहिल्या शब्दापासून सुरुवात करू.. सगुणाची शेज निर्गुणाची बाज! तर सगुण आणि निर्गुण या दोन फार मोठय़ा गोष्टींचा इथं उल्लेख आहे..
अचलदादा – बुवा, क्षमा मागतो.. पण मला वाटतं शेज आणि बाज या दोन गोष्टींची त्यांच्याशी सांगड आहे आणि त्यामुळे या रूपकांचा थोडा उलगडा आधी झाला ना, तर अर्थ अधिक स्पष्ट होईल.. नाही का?
बुवा – (हसत) बरं तसं करू! पेढा कोणत्या दिशेनं खाल्ला तरी गोडच लागणार ना? तर दादांच्या सांगण्यानुसार शेज आणि बाजेकडे आधी वळू.. शेज म्हणजे बिछाना आणि बाज म्हणजे खाटलं! आता हृदयेंद्र उत्तर भारतात गुरुजींच्या घरी जात असतो म्हणून त्यानं बाज पाहिली असेल.. शहरात ती अस्तंगतच झाली आहे.. पोलादी कडय़ांवर ताणलेल्या जाड प्लॅस्टिक किंवा रेक्झिनच्या पट्टय़ांची घडीची बाज काहीकाळ दिसत असे.. पण तिला त्या गावाकडच्या बाजेची सर नाही.. गावाकडची बाज आहे ना, ती सुताच्या जाड दोऱ्यांनी फार कौशल्यानं बांधली जाते.. या बाजेवर बिछाना टाकला ना की ती लपून जाते.. तिचे चार खांब दिसतात, पण बरेचदा बिछानाही चारही बाजूनं ऐसपैस पसरला असला ना आणि खालपर्यंत विसावत असला तर बाज दिसतही नाही.. तर बाज हा आधार असतो आणि तिच्यावरचा बिछाना तेवढा लोकांना दिसतो.. तसा सगुणाला निर्गुणाचा आधार आहे.. आणि गंमत अशी की निर्गुणालाही सगुणाचाच आधार आहे!
अचलदादा – या शेज आणि बाजेचा विचार करताना आणखी काही अर्थछटा जाणवतात.. ज्ञानेंद्रजी तुमच्याकडेच मागे मी निसर्गदत्त महाराजांचं पुस्तक वाचलं होतं.. त्यात एके ठिकाणी ते म्हणाले की तुम्ही बिछान्यावर झोपता आणि झोप लागते तेव्हा तुम्ही बिछाना सोडलेला नसतो, फक्त त्याचा विसर पडला असतो! आपण झोपण्यासाठी म्हणून अंग टाकतो तेव्हा बिछानाच जाणवतो! म्हणजे गादी मऊ आहे की नाही? उशी जाड आहे की मऊ? उंच आहे की पातळ? अंगावरची चादर जाड आहे की हलकी? या सगळ्या गोष्टी जाणवतात, पण एकदा झोप लागली की या साऱ्या गोष्टी विसरल्या जातात.. गाढ झोपेत तर आपलीही आठवण उरत नाही..
कर्मेद्र – पण स्वप्नही माझ्या नजरेतूनच पाहतो ना? म्हणजे तेव्हाही माझी स्वत:बद्दलची जाणीव जागीच असते!
अचलदादा – म्हणून तर गाढ झोपेत म्हणालो मी! आणि जी गाढ झोप असते ना? ज्यात आपल्याला स्वत:चा विसर पडला असतो.. तीच खरी झोप असते.. तशी झोप लागली नाही, तर झोपूनही आपल्याला विश्रांती मिळाली नसते.. गाढ झोपेत स्वत:लाच विसरलं जातं तेव्हा आपल्या सर्व चिंतांचं ओझंही तर सुटलं असतं! म्हणून मनाला खरा विश्राम लाभतो.. तर त्या झोपेप्रमाणेच सगुणातही जागं असलेलं मन निर्गुणात मावळलेलंच असतं!
चैतन्य प्रेम