डोळियाचा देखणा पाहतां दिठी। म्हणजे डोळ्यांनी पाहणारा दृष्टीला दिसताच, हा अर्थ बुवांनी सांगितला तेव्हा योगेंद्रच्या मुखातून उत्स्फूर्त ‘वा!’ निघाला होताच, हृदयेंद्रचा चेहराही उजळला होता.

कर्मेद्र – डोळ्यांनी पाहणारा दृष्टीला दिसताच, म्हणजे नेमकं काय?
हृदयेंद्र – मागे आपली चर्चा झाली होतीच ना? डोळे पाहात नाहीत, डोळ्यांनी पाहिलं जातं! तेव्हा डोळा हे उपकरण मात्र आहे आणि त्या डोळ्यांनी काय पाहायचं, हे जो ठरवत असतो तो ‘डोळियाचा देखणा’ आहे!
योगेंद्र – बरोबर.. आपली चर्चा झाली होतीच.. कान, नाक, डोळे ही सर्व स्थूल इंद्रियं आहेत.. कान ऐकत नाहीत, कानांद्वारे ऐकलं जातं.. मुख बोलत नाही, मुखाद्वारे बोललं जातं.. तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखलाही आपल्या चर्चेत आलाच होता की कानांद्वारे ऐकलं जातं, पण उत्तर दिलं जात नाही! उत्तर ज्या मुखावाटे दिलं जातं ते बहिरं असतं! डोळे पाहातात, पण काय पाहिलं, हे त्यांना सांगता येत नाही. डोळ्यांद्वारे काय पाहिलं गेलं, हे सांगणारं मुख आंधळंच असतं! तेव्हा या सर्व कर्मेद्रियं आणि ज्ञानेंद्रियांत समन्वय साधणारा जो आहे त्याला आत्मा म्हणतात.. त्या आत्मस्वरूपाचं दर्शन म्हणजेच ‘डोळियांचा देखणा पाहतां दिठी’!
बुवा – अगदी सुरेख! पण मला सांगा, डोळ्यांनी पाहाणारा जो आहे, त्याचं दर्शन होतं का हो कधी? नव्हे, डोळ्यांनी पाहणारा, कानांनी ऐकणारा, मुखानं बोलणारा ‘मी’च आहे, असंच वाटतं ना आपल्याला? जर मी बघतो तर डोळ्यांची शक्ती जाताच मला दिसेनासं का होतं? माझे डोळे आहेत तर त्यांची शक्ती मला न विचारताच किंवा माझी पर्वा न करताच कमी कशी होते? याचाच अर्थ ‘मी’ पाहत नाही, ‘मी’ बोलत नाही, ‘मी’ ऐकत नाही.. माझ्यात चैतन्यशक्ती आहे म्हणून मला पाहणं साधतं, मला ऐकणं साधतं, मला बोलणं साधतं.. त्या आत्मशक्तीची जाणीव आपल्याला असते कुठे?
हृदयेंद्र – जी इंद्रियं मला भगवंताच्या प्राप्तीसाठी लाभली आहेत त्याच इंद्रियांचा वापर मी जगाच्या प्राप्तीसाठी करीत राहातो आणि जगाच्याच आसक्तीत अखेपर्यंत गुंतून राहतो..
अचलदादा – भगवंतांनी गीतेत म्हटलंच आहे ना? ‘‘आत्मैव ह्य़ात्मनो बन्धु: आत्मैव रिपुरात्मन:!’’ आपणच आपले मित्र आहोत आणि आपणच आपले शत्रु आहोत.. या इंद्रियांच्या जोरावर हित साधायचं की अहित साधायचं, हे आपल्याच हातात आहे!
बुवा – अहो माणसासारखा जन्म लाभला.. इतकी सक्षम इंद्रियं लाभली.. या जन्मात भगवतप्राप्तीची इतकी मोठी संधी लाभली तरी काय होतं? अचलानंदजी तुम्ही जो श्लोक सांगितलात ना, त्याच्याच विवरणात माउली फार सुरेख उपमा वापरून सांगतात की, ‘‘कैसे प्राप्तीचिये वेळे। निदैवा अंधळेपणाचे डोहळे। कीं असते आपुले डोळे। आपण झांकी।।’’ प्राप्तीची वेळ आली आणि या निर्दैवी माणसाला आंधळेपणाचे डोहाळे लागतात! म्हणजे काय होतं? तर परमात्मप्राप्तीसाठी सक्षम अशी इंद्रियं लाभूनही त्याला अक्षमतेचे डोहाळे लागतात! कान असूनही परमेश्वराबद्दल काही ऐकू नये, असे डोहाळे.. डोळे असूनही वास्तव न पाहण्याचे डोहाळे, मुख असूनही शाश्वताची चर्चा न करण्याचे डोहाळे.. असा माणूस मग डोळे असूनही पाहत नाही.. कान असूनही ऐकत नाही.. तेव्हा परमात्मप्राप्तीसाठी प्रयत्न, हाच मानवी जन्माचा उद्देश आहे, हे लक्षात घेऊन आपापल्या परीनं पंढरीची ही वाट चाललीच पाहिजे..
अचलदादा – बुवा चोखामेळा महाराजांचाच एक अभंग आहे.. टाळी वाजवावी गुढी उभारावी। वाट हे चालावी पंढरीची।। या एका चरणात किती बोध भरलाय! व्यवहारातल्या फायद्याच्या वेळी किंवा दुसऱ्याची जिरवली तर एकमेकांना टाळी देण्यात माणसाचा जन्म जातो त्यानं परमात्म्याच्या भजनासाठी टाळी वाजवली पाहिजे.. साधनेचा अगदी पायाच आहे.. टाळी वाजवत त्या परमात्म्याचं संकीर्तन..
हृदयेंद्र – रामकृष्ण परमहंस म्हणत की टाळी वाजवली की पाखरं जशी उडून जातात तसं संकीर्तनात टाळ्या वाजवल्या की विकारांची पाखरं उडून जातील..
बुवा – आणि साधनेच्या ‘पिका’चं रक्षण होईल!