टाळी वाजवावी गुढी उभारावी। वाट हे चालावी पंढरीची।। हा चरण म्हणताना, ‘टाळ्या वाजवत भगवंताचं संकीर्तन हा साधनेचा पायाच आहे,’ असं अचलानंद दादा म्हणाले पण ज्ञानेंद्रच्या चेहऱ्यावरील भाव पाहून लगेच हसत उद्गारले..

अचलदादा – कुणाकुणाला टाळकुटय़ा भक्तीनं काय होणार, असं वाटतं खरं.. पण गंमत सांगू का? निसर्गदत्त महाराजांचं बोलणं म्हणजे ज्ञानाचा अखंड प्रवाह.. पण ठरावीक वेळ झाली की बोलणं बंद करून तात्काळ उठत आणि सद्गुरुंच्या तसबिरीसमोर उभं राहून भजनात दंग होत! साधनेच्या सुरुवातीला जे टाळ्या वाजवणं आहे ना ते कोरडय़ा मनाचंही असू शकतं, पण भाव निर्माण झाल्यानंतर केवळ हातच नाही, हृदयातूनच टाळी वाजत असते.. ब्रह्मानंदी लागते तीसुद्धा टाळीच बरं का!
बुवा – (हसत) पण चोखामेळा महाराज नुसतं ‘टाळी वाजवावी’ एवढंच सांगून थांबले नाहीत.. पुढं काय म्हणाले? ‘गुढी उभारावी’! या गुढी उभारण्यालाही अनेक अर्थ आहेत बरं का! एक म्हणजे विजयाची गुढी असते.. हा विजय कसला हो? मघाशी अचलानंदांनी गीतेतला श्लोक सांगितला ना? त्याच्या पुढच्याच श्लोकात भगवंतांनी सांगितलंय.. बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जित: म्हणजे ज्यानं स्वत:ला जिंकलं तो स्वत: स्वत:चा मित्र.. तेव्हा स्वत:वरचा विजय हाच खरा विजय आहे.. तेव्हा टाळ्या वाजवून साधनेची सुरुवात तर झाली पण साधनेचा मध्य आहे स्वत:वर विजय मिळवणं!
योगेंद्र – वा! फार सुरेख!!
बुवा – तुम्ही गुढी पाहिल्येत ना? काठीवर उपडी घातलेला गडू.. माणसाचा देह ही काठी आहे आणि त्याच्या डोक्यात सारं काही आहे! जगाकडे धावणारं हे डोकं उलटं झालं म्हणजे आत्मचिंतनात गढलं तर तो गढू खरा! ही गुढी उभारता आली पाहिजे..
हृदयेंद्र – आणि हा साधनेचा मध्य आहे म्हणता!
अचलदादा – (डोळ्यात अश्रू दाटले आहेत) अगदी खरं.. भजन साधलं, स्वत:वरचा विजय साधला पण साधनेची इतिश्री पंढरीची वाट चालण्यातच आहे! सद्गुरुंच्या सांगण्यानुसार वाटचाल करण्यातच आहे.. ते साधत नसेल तर त्या टाळ्या वाजवणं, त्या गुढय़ा उभारणं हे नुसतं अवडंबर आहे.. देखावा आहे..
बुवा – आणि हा मार्ग कुणालाही अप्राप्य नाही बरं! याच अभंगात चोखामेळा महाराज अखेरच्या चरणात काय सांगतात? खटनट यावें शुद्ध होऊनी जावें। दवंडी पिटी भावें चोखामेळा।। भक्तीची खोट असलेल्या खटानं आणि भक्तीचं अवडंबर माजवणाऱ्या नटानंही यावं हो.. त्याचं अंत:करण शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही.. चोखामेळा भावपूर्वक ही दवंडी पिटत आहेत.. जोवर ही स्थिती होणार नाही ना, तोवर डोळियाचा देखणा दिठीला दिसूच शकत नाही!! चामडय़ातल्या या डोळ्यांना तर तो दिसूच शकत नाही.. जे दिठीही न पविजे.. तो दिसेल तो या डोळ्यांशिवायच, नव्हे या चर्मचक्षूंनी जग पाहण्याची ओढ जोवर तुटत नाही तोवर तो दिसणारच नाही..
हृदयेंद्र – समर्थानीही म्हटलंय ना? ‘जगीं पाहतां चर्मचक्षीं न लक्षे।’
अचलदादा – जगीं पाहतां चर्मचक्षीं न लक्षे। जगीं पाहतां ज्ञानचक्षीं न रक्षे।
हृदयेंद्र – बरं झालं दादा.. या श्लोकाचा अर्थ लावताना थोडा गोंधळ होतो, तुमच्याकडून उलगडा होईल.. (‘कसला गोंधळ?,’ असं अचलानंद दादा विचारतात) गोंधळ एवढाच की चर्मचक्षूंनी तो दिसत नाही, मग ‘ज्ञानचक्षीं न रक्षे’ म्हणजे ज्ञानचक्षूंनीही तो दिसत नाही, असं म्हणायचंय की आणखी काही?
अचलदादा – बघा, परमात्मा कुठे आहे सांगतात? तर जगात सर्वत्र भरून आहे.. पण ‘जगी पाहतां’ या जगाकडे पाहताना तो दिसतो का? (हृदयेंद्र हसून म्हणतो, ‘नाही’) तेव्हा जगात सर्वत्र भरून असलेला परमात्मा या चर्मचक्षूंना दिसत नाही आणि ज्ञानचक्षू जर उघडले गेले तर काय होईल? ‘जगीं पाहतां ज्ञानचक्षीं न रक्षे।’ मग अंतरंगात ठाण मांडून बसलेल्या जगाचंच रक्षण होणार नाही! ते जगच उरणार नाही.. मग काय? ‘जगीं पाहतां पाहणें जात आहे।’ जगच ओसरू लागेल आणि जगाकडे पाहण्याची ओढही त्यापाठोपाठ ओसरू लागेल.. त्यासाठी ‘मना संत आनंत शोधूनि पाहे।’ वाट हे चालावी पंढरीची!!
ल्ल चैतन्य प्रेम