News Flash

१९९. भाव-गर्भ

खोलीत इतकी नीरव शांतता पसरली की इतक्या गंभीरपणे आनंद या विषयावर चर्चा होणार आहे

खोलीत इतकी नीरव शांतता पसरली की इतक्या गंभीरपणे आनंद या विषयावर चर्चा होणार आहे, या कल्पनेनंच कर्मेद्रला पुन्हा हसू आलं. मग आपलं हसू ओठातच दाबून तो हृदयेंद्रकडे पाहू लागला. हृदयेंद्र म्हणाला..

हृदयेंद्र – तेव्हा माणसाच्या आनंदाच्या म्हणून जेवढय़ा कल्पना असतात त्यातली सर्वात मोठी कल्पना ही वंशवृद्धीशी अर्थात मूल होण्याशी निगडित असते.. आपल्या जीवनातल्या या सर्वपरिचित गोष्टीचा मोठय़ा खुबीनं वापर करीत तुकाराम महाराज एका वेगळ्याच गर्भावस्थेचा संकेत करीत आहेत.. ते म्हणतात, ‘‘गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा। तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे।।’’ पोटातल्या बाळाची जी आवड असते, त्याप्रमाणे आईला डोहाळे लागतात, असं म्हणतात ना? आणि कर्मू, तू कितीही टोमणे मार.. अनेकदा जो पदार्थ खायला आवडत नसतो, तो खाण्याचेही डोहाळे लागतात बरं का! म्हणजे आईला तिखट आवडत नसतं, पण तिला तिखटच खावंसं वाटतं.. थोडक्यात काय? तर पोटातल्या बाळाच्या आवडीनुसार डोहाळे लागतात..
कर्मेद्र – पण याचा अभंगाशी काय संबंध आहे?
हृदयेंद्र – तेच तर मी सांगतोय! अभंगाचा मुख्य मुद्दा काय? तर आनंद.. त्या आनंदाची प्राप्ती कशी करायची, हा.. त्या आनंदाच्या प्राप्तीचा मार्गच तुकाराम महाराज दाखवताहेत.. हा मार्ग म्हणजे सद्गुरूशी अनन्य भक्ती!
सिद्धी – पण अभंगातल्या कुठल्याच ओळीत सद्गुरू हा शब्दही नाही!
कर्मेद्र – हृदू त्या बाबतीत पक्का आहे.. मायकल जॅक्सनचं एखादं गाणं त्याला ऐकवं.. त्यातही सद्गुरू तत्त्वाचीच महती कशी गायली आहे, हेच तो सांगेल!
हृदयेंद्र – (सगळ्यांच्या हसण्यात सामील होत..) अभंगाचे दोन अर्थ असतात.. एक सर्वसामान्य अर्थ आणि दुसरा गूढार्थ.. दोन्ही आपापल्या पातळीवर तितकेच योग्य आणि उपयुक्त असतात.. आपला शोध हा गूढार्थाचा आहे.. तर नीट ऐका.. सद्गुरूशी अनन्य भक्ती जडली की त्या सद्गुरूप्रेमाचा अंकुर जन्मू लागतो.. हाच तो गर्भ! हीच ती खरी गर्भावस्था!!
योगेंद्र – वा!
हृदयेंद्र – मग काय होतं? गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा! गर्भाच्या आवडीप्रमाणे मातेला डोहाळे लागतात, तसे सद्गुरू प्रेमाचा अंकुर निर्माण झाला की त्या सद्गुरूप्रेमानुसारचे डोहाळे लागतात! जे त्यांना आवडतं, ते मला आवडू लागतं!! पोटातल्या बाळाची हालचाल आईला कशी लगेच समजते? त्या पोटातल्या बाळाला ती किती जिव्हाळ्यानं जपते? कोणतीही कृती करताना, हालचाल करताना पोटातल्या बाळाची जाणीव तिच्या मनातून कणभरही जात नाही.. त्याला जपतच ती प्रत्येक गोष्ट करते.. तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे!! अगदी त्याचप्रमाणे सद्गुरू प्रेमात बुडालेला साधक कोणतीही गोष्ट करताना, कोणतीही कृती करताना आपल्यातील सद्गुरू प्रेमाला कणमात्रही धक्का लागणार नाही, याची पूर्ण काळजी घेतो.. जे सद्गुरूंना आवडेल तेच आपल्या कृतीत उतरावं, अशी तळमळ त्याला लागते.. बाह्य़ जगात वावरताना अंतरंगातील सद्गुरू प्रेमाचा तंतू तो सदोदित जपत असतो.. थोडक्यात जगण्यात सद्गुरू प्रेमाला, सद्गुरू इच्छेला प्राधान्य येतं.. क्षणोक्षणी मातेचं भावविश्व जसं पोटातल्या बाळानं व्यापलेलं असतं तसं सद्गुरू प्रेमात बुडालेल्या साधकाचं भावविश्वही सद्गुरू स्मरणानंच व्यापलेलं असतं..
प्रज्ञा – पण खरंच असं घडल्याचे दाखले आहेत की हे सारं नुसतं शाब्दिक आहे?
हृदयेंद्र – निश्चितच याचे दाखले अनेक चरित्रांत आहेत.. गुळाला जसा मुंगळा चिकटावा तसे जे आपल्या सद्गुरू चरणांशी दृढ चिकटले, अशा अनेकांच्या जीवनात त्याचा प्रत्यय येतो.. मग ते समर्थ रामदासमय झालेले कल्याणस्वामी असोत, श्रीगोंदवलेकर महाराजमय जीवन जगणारे ब्रह्मानंद महाराज, आनंदसागर महाराज, भाऊसाहेब केतकर, तात्यासाहेब केतकर असोत की भाऊसाहेब महाराज उमदीकर यांची पूर्ण शरणागती साधलेले अंबुराव महाराज असोत..
हृदयेंद्र असं म्हणाला आणि क्षणभर मूक झाला.. त्याच्या डोळ्यासमोर सद्गुरूमय झालेल्या अनेकानेक सद्शिष्यांची भावचरित्रं साकारत होती.. त्या प्रसंगांनीही त्याचं मन अन् डोळे ओथंबले..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2015 1:52 am

Web Title: abhangdhara 13
टॅग : Emotions
Next Stories
1 १९८. अर्थ-गर्भ..
2 १९७. आनंद-आधार
3 १९६. प्रश्न तरंग
Just Now!
X