हृदयेंद्रनं धीरगंभीर स्वरात म्हटलेल्या अभंगानं वातावरण भारावलं होतं. मग योगेंद्रकडे पहात हृदयेंद्र म्हणाला..

हृदयेंद्र – सद्गुरू सद्शिष्याला कसं सांभाळतात, याचे जे उदाहरण गोसाईजींच्या चरित्रातून तू सांगितलंस ना, त्याला या अभंगातला ‘कासवीची दृष्टी सदा बाळावरी। तैसी दया करी पांडुरंगे।। ’ हा चरण अगदी जुळतो..
प्रज्ञा – पण पुन्हा प्रश्न असा की सद्गुरुंना मानणाऱ्या व्यक्तिची ही स्थिती व्हायला किती काळ लागेल आणि ही स्थिती सोपी आहे का? माझ्या मनात हा प्रश्न का आला, तेही सांगते.. सद्गुरू वगैरे मला माहीत नाहीत.. शेगावला जायला लागल्यापासून मनात गजाननमहाराजांविषयी प्रेम वाटतं.. पण तिथे काही अनुग्रहाची पद्धत नाही.. आणि महाराजही देहात नाहीत.. त्यामुळे साधना कोणती करावी, कशी करावी हे सांगणारं कोणी नाही.. साधनेतल्या अडचणी, खाचाखोचा याबद्दल थेट त्यांचं मार्गदर्शनही नाही.. मग माझी मी जमेल तशी, समजेल तशी साधना करून माझ्या अंतरंगात सद्गुरूंचं प्रेम, म्हणजे तू म्हणतोस तसं, ‘गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा’सारखं प्रेम निर्माण होऊ शकेल का?
हृदयेंद्र – प्रज्ञा योगेंद्रनं गोसाईजींच्या चरित्रातला जो प्रसंग सांगितला तो फार गूढ आहे! त्यांचे जे शिष्य होते..
योगेंद्र – कुलदानंद ब्रह्मचारी..
हृदयेंद्र – हं तर ते काही दिवसांसाठी परगावी जाणार होते.. त्यांना वाटत होतं की सद्गुरूंचं सान्निध्य नसताना तिथे मी माझ्या बळावर साधना करू शकेन का, नीट राहू शकेन का.. तेव्हा गोसाईजींनी जे उत्तर दिलंय ना, ते देहात नसलेल्या सद्गुरूंचंही उत्तर आहे! देह, काळ या अडचणी आपल्याला आहेत, त्यांना नाहीत! आपण कुठेही असलो तरी आपली मानसिक, भावनिक जडणघडण तेच करीत राहातात.. श्रीगोंदवलेकर महाराजांनी म्हटलंय ना? अनुग्रह दिल्यापासून तुमची मूर्ती घडविण्याचं काम मी सुरू केलंय! तेव्हा भावसंस्कार तेच करणार.. जागही तेच आणणार.. मी फक्त एकच करायचं, त्यांच्यावर मला प्रेम करता यावं, यासाठी प्रेमाचा जो अंकुर ते माझ्या मनात उत्पन्न करतात तो जगाकडे वळणार नाही, एवढंच पहायचं! पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती.. घरात माणसं भरपूर, कामंही भरपूर.. आजच्याप्रमाणे नवरा-बायकोला मनमोकळं बोलता येईल, इतकं स्वातंत्र्य नव्हतं.. तरी दोघं एकमेकांवर मनातून प्रेमच करीत असत.. अगदी तसं मूक प्रेम सद्गुरूंवर सुरू तर कर.. मग बघ त्या प्रेमाचा विकास तेच साधतील..
योगेंद्र – वा! प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगामाजी। हाचि सुबोध गुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची..
हृदयेंद्र – अगदी बरोबर.. सर्वच संतांनी प्रेमाचे गोडवे गायले आहेत, पण हे प्रेम केवळ भगवंतावरचं बरं का! माणूस कुणावरच खरं प्रेम करू शकत नाही.. स्वार्थ असतो तिथेच त्याचं प्रेम असतं किंवा माणसाच्या प्रेमामागे काही ना काही सुप्त स्वार्थही असतोच..
सिद्धी – असं कसं? माझी एक अगदी आवडती मैत्रीण आहे.. तिच्याशी बोलायला, तिच्याबरोबर फिरायला मला फार आवडतं.. आमच्यात कोणता स्वार्थ आहे?
हृदयेंद्र – (हसून) तुला आवडतं म्हणून तू बोलतेस, हा काय कमी स्वार्थ आहे? आणि एखाद्याकडून स्वार्थ साधला जात नसेल, तरी एकवेळ चालतं, पण जो माणूस स्वार्थाच्या आड येतो ना त्याच्याशी आपण प्रेमानं वागूच शकत नाही, हेसुद्धा लक्षात घ्या! तेव्हा भगवंतावरचं प्रेम, हेच खरं प्रेम आहे.. भक्तीपंथावर खरी वाटचाल सुरू असेल तर ती भक्तीच खरी निरपेक्षता शिकवते आणि निरपेक्षतेशिवाय प्रेमच नाही! जेव्हा भगवंतावर असं प्रेम जडतं तेव्हा त्या प्रेमाला जगात मोल नसतं! याचे दोन अर्थ आहेत बरं का! भगवंतावरचं जे प्रेम आहे ना, त्याची जगाला किंमत कळत नाही, हा एक अर्थ आहे आणि भगवंतावरील प्रेम हेच जगातलं सर्वात अनमोल प्रेम आहे, हा दुसरा अर्थ आहे! अशा प्रेमातच राम रमतो.. शिष्याला असं प्रेम लागावं, ही सदगुरुमायची तहान असते!!
योगेंद्र – मेहेरबाबा होते ना? त्यांना काही शिष्यांनी विचारलं, आपल्यानंतर आपलं काम आम्ही पुढे कसं न्यावं? मेहेरबाबा म्हणाले, तुम्ही काही करू नका! केवळ असं प्रेम करा की लोकांना वाटावं, हा कुणाचा माणूस आहे म्हणून इतकं प्रेम करतोय? हे साधलं तरच माझं काम पुढे न्याल! खरंच.. भगवंतावरचं प्रेम हाच सद्गुरुचा खरा वारसा आहे!!