जोवर साधना खोलवर जात नाही, तोवर पालटही खोलवर होत नाही, यावर हृदयेंद्र आणि योगेंद्रचं एकमत होतं. तर साधना खोलवर जाणं म्हणजे नेमकं काय, असा कर्मेद्रचा प्रश्न होता. त्याच्या बोलण्याला पुस्ती जोडत ज्ञानेंद्र म्हणाला..
ज्ञानेंद्र – दुसरी गोष्ट अशी की साधना जर खोलवर गेली तर साधनावस्था ही सहजावस्थाच होणार नाही का? मग साधना खोलवर जाऊनही उरेल कशी? मला एक प्रसंग आठवतो. स्वामी विवेकानंद यांनी ‘रामकृष्ण मिशन’ची स्थापना करायची ठरवलं तेव्हा त्याची नियमावली करण्यासाठी एकदा त्यांनी सर्व सहसाधकांना गोळा केलं. ही नियमावली तयार करण्याआधी त्यांनी एक फार महत्त्वाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले, आपण हे नियम करतो आहोत ते कशासाठी? तर त्या नियमांपलीकडे जाण्यासाठी!
योगेंद्र – वा!
ज्ञानेंद्र – म्हणजेच माणूस नियम का करतो? तर तो तसं वागत असतोच, असं नाही, म्हणून. एकदा नियम अंगवळणी पडले, नियम हीच सवय झाली, की मग ते वेगळे लिहून ठेवण्याची गरजही संपेल. तसं साधना जर खोलवर गेली, तर साधना हीच सहजस्थिती होईल. मग साधना करणार कोण आणि साधनेचा विचार तरी करणार कोण?
हृदयेंद्र – तू म्हणतोस ती सहजस्थिती आज आपल्या विचारातही नसते. तिची आपण कल्पनाही करू शकत नाही. बालवाडीत शिकणाऱ्या मुलाला एकदम दहावीचं रसग्रहणाचं पुस्तक देऊन काय उपयोग? फार तर तो त्या पुस्तकातली चित्रं बघून हरखून जाईल! तेव्हा साधनेच्या अत्युच्च अवस्थेत काय होतं, याची चर्चा तरी कशाला हवी? एकवेळ खाण्याची मारामार असताना, मी श्रीमंत झालो तर रोज काय-काय खाईन, याचा विचार कशाला करीत बसावं? तेव्हा आत्ता मी काय केलं पाहिजे? याचा विचार महत्त्वाचा.
कर्मेद्र – पण मग साधना खोलवर जाणं म्हणजे काय?
योगेंद्र – साधना खोलवर जाण्यासाठी पहिली आवश्यक गोष्ट म्हणजे मी साधना का करीत आहे, याची पक्की जाणीव असणं! या साधनेतून जे साधायचं आहे, त्या साध्याचे ध्येय डोळ्यापुढे ठेवून त्या ध्येयाला अनुकूल मार्गक्रमण करीत राहणं. आणि ही अंतर्यात्रा आहे बरं का! जर अशी खरी वाटचाल सुरू झाली तरच साधनेच्या आड मीच कसा येत आहे, हे स्पष्टपणे उमगू लागतं.. आसक्ती, मोह आणि भ्रमामुळे माझ्यात उद्भवत असलेले स्वभावदोष मग जाणवू लागतील..
हृदयेंद्र – सतराव्या शतकात फ्रान्समध्ये ब्रदर लॉरेन्स म्हणून एक थोर साक्षात्कारी सत्पुरुष होऊन गेले. त्यांनी ईश्वराशी पूर्ण समर्पित व्हायचं असेल तर काय करायला हवं, याबाबत खूप काही सांगितलं आहे. त्यांचं एक वाक्य मला फार महत्त्वाचं वाटतं. ते म्हणाले होते की, ‘‘स्वत:ला सर्वस्वी ईश्वराच्या सेवेत वाहून घ्यायचं असेल तर आत्मिक व शारीरिक क्रियांना चालना देणाऱ्या अंत:प्रवृत्तीकडे सावधपणे लक्ष ठेवायला हवं!’’ विविध प्रकारच्या मार्गानं विविध प्रकारची साधना साधक करीत असतात, पण जोवर या तऱ्हेनं आपल्या अंत:प्रवृत्तींबाबत सजगता येत नाही, तोवर खरी साधना तरी सुरू होते काय? सद्गुरूंची सेवा करायची आहे त्यानं आपल्या अंत:प्रवृत्तींकडे सजगपणे पाहण्याचा अभ्यास केलाच पाहिजे.. आणि सेवेचा खरा अर्थही लक्षात घेतला पाहिजे.. त्यांच्या बोधानुरूप माझं जीवन घडवण्याच्या आड मी न येणं, हीच त्यांची खरी सेवा आहे! त्यांना चांगलंचुंगलं खाऊ घालणं, त्यांचे पाय चेपणं, त्यांना वस्त्रप्रावरणं देणं, भौतिक वस्तू देणं ही त्यांची सेवा नव्हे.. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर पाऊलं टाकत जाणं, हीच त्यांची खरी चरणसेवा आहे.. तेव्हा हे सर्व ज्याला साधायचं आहे, त्यानं आधी अंत:प्रवृत्तींकडे लक्ष दिलंच पाहिजे. या अभ्यासातही सद्गुरूच मदत करतात. गोंदवल्याला एक जोडपं सेवेसाठी राहिलं. तिथं एक माणूस त्यांना वेडंवाकडं बोलला. त्या अपमानानं दोघांना फार वाईट वाटलं. आपल्या गावी परतायचा त्यांनी निर्णय घेतला. हे सांगायला म्हणून ते महाराजांकडे गेले. तेव्हा महाराज त्यांना म्हणाले, अहो गुलाबाच्या रोपांना शेणखत घालावंच लागतं ना? तसं अपमानाकडे पाहावं!
कर्मेद्र – अरे! उलट मी त्यांच्या जागी असतो ना, तर अपमानरूपी शेणखताची सव्याज परतफेड करून त्या माणसाच्या साधनेलाही मदतच केली असती!!