साधकानं अपमानाकडे कसं पहावं, हे सांगताना श्रीगोंदवलेकर महाराज म्हणाले होते की, गुलाबाच्या रोपांना शेणखतच घालावं लागतं. तसं कुणी आपला अपमान केला तर त्याला शेणखतच मानावं. थोडक्यात अपमान सहन करावा. त्यावर कर्मेद्र म्हणाला की मी जर त्या जागी असेन तर अपमान करणाऱ्याचाही आणखी अपमान करीन आणि त्याच्याही साधनेला सहाय्यभूत होईन. त्यावर सगळेच हसले..

हृदयेंद्र – यासाठीच तर सद्गुरू अनिवार्य आहे! आपल्यात आणि त्यांच्यात हाच तर फरक आहे. प्रत्येक प्रसंगात आपण ‘मी’पणानं वाहावत जाऊन वागतो. अरे ला कारे, हीच आपली रक्तात भिनलेली सवय असते. या मार्गावर पाऊल टाकल्यानंतर आपले स्वभावगत दोष, विकार यांच्याशीच युद्ध सुरू होतं..
योगेंद्र – आणि ते कुणालाही चुकत नाही बरं का! शिवोम् तीर्थ म्हणून एक साक्षात्कारी महापुरुष होऊन गेले. त्यांचं मूळ नाव ओमप्रकाश. गुरुदेव विष्णुतीर्थजी महाराज हे त्यांचे सद्गुरू. देवासला त्यांचा आश्रम होता. तर तिथे अनेक साधकांसह शिवोम् तीर्थ साधकावस्थेत राहात होते. तिथे एक आश्रमवासी होते जे महाराजांची अतिशय मन लावून सेवा करीत. शिवोम् तीर्थ यांच्यावरही त्यांचं प्रेम होतं. एकदा या दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून खटका उडाला. शिवोम् तीर्थ सांगतात : मी रागानं बेभान झालो. शरीर जणू क्रोधाग्नीनं धगधगत होतं. बुद्धि कुंठित झाली. विवेक-अविवेकाचं भान उरलं नाही. आपण कुठे आहोत, कुणासाठी आहोत, याचीही जाणीव लोपली. एकच विचार मनात उसळून आला की आश्रम सोडून निघून जावं! देवासमध्ये राहू नये.. मी तडक महाराजांकडे गेलो आणि सांगितलं की, मी आश्रमात राहू शकत नाही. त्यांनी खूप समजवायचा प्रयत्न केला, पण मी काहीही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हतो. गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजताची होती. मी तसाच माझ्या खोलीत जाऊन पडलो. जेवायलाही गेलो नाही की महाराजांच्या दर्शनालाही गेलो नाही. रात्री झोपायचा प्रयत्न केला, पण झोप कुठून येणार? आता हळूहळू राग शांत होऊ लागला होता. मनात विचारमंथन सुरू झालं होतं. मग मी माझ्याच वागण्याकडे अलिप्तपणे पाहू लागलो. माझी सवय अशी आहे की, अलिप्तपणे स्वत:च्या वागणुकीचा विचार करताना मला प्रथम माझ्या चुकाच दिसतात. त्याप्रमाणे या प्रसंगातही घडलं. मला त्या माणसाच्या चुका दिसल्याच नाहीत, माझ्याच चुका दिसू लागल्या. वाटू लागलं की त्या साधकावर महाराजही प्रेम करतात. तोही महाराजांची किती सेवा करतो. माझीही किती काळजी घेतो. तो मला काही बोलला जरी असला तरी तो त्यांचा अधिकार आहे! मी मात्र त्यांचा आदर करण्यात कमी पडलोच, पण सद्गुरूंच्या आज्ञेचाही अव्हेर केला.. माझ्यासारखा घमंडी आणि पापी कोणी नाही.. मग मात्र मी बेचैन झालो. वाटलं, आत्ताच जावं आणि क्षमा मागावी. पण रात्र खूप झाली होती. पहाटेच त्या साधकाची क्षमा मागायचं मी ठरवलं. पहाटेची वाट पहात मी तळमळत होतो. अखेर पहाट झाली, पण तोवर उशीर झाला होता! तो साधकही रात्रभर झोपू शकला नसावा. पहाट फुटण्याआधीच तो आश्रमातून निघून गेला होता! मी त्यांची क्षमाही मागू शकलो नाही, या विचारानं मी अधिकच अस्वस्थ झालो. महाराजांसमोर जायचं धाडसही होईना. अखेर दुपारी त्यांच्यासमोर गेलो आणि माझ्या चुकीबद्दल क्षमा मागितली. पण ते काहीच बोलले नाहीत. त्यांचं ते मौन बरंच काही सांगून गेलं.. शिवोम् तीर्थ म्हणतात की, या एका घटनेनं त्यांच्या मानसिक घडणीलाच धक्का लागला. चार महिन्यांनी ते साधक परतले आणि यांनी त्यांची क्षमाही मागितली. तरी त्यांच्या मनाला त्यांनी क्षमा केल्याची नि:शंक जाणीव काही झाली नाही. पण यामुळे अंत:प्रेरणांकडे ते अधिक सजगतेनं पाहू लागले..
हृदयेंद्र – प्रत्येक साधकाच्या जीवनात असे प्रसंग येतात जेव्हा त्याला आपल्या स्वभाव दोषांची जाणीव होते. ते दूर व्हावेत, असंही प्रामाणिकपणे वाटतं. कळतं पण वळत नाही, अशी ही स्थिती असते. जोवर हे युद्ध संपत नाही तोवर गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा। तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे।। काय सांगों झालें कांहीचिंया बाहीं। पुढें चाली नाहीं आवडीनें।। ही स्थिती शक्य नाही. ती स्थिती यावी, म्हणूनच तर साधना आहे!
> चैतन्य प्रेम