साधना करीत असतानाच अंतरंगातील विचारप्रवाहाचं तसंच बाहेरच्या जगातील कृतीप्रवाहाचं अवधान हवं. आपल्या सर्व कृती या विचारातून किंवा बहुतेकवेळा अविचारातूनच घडतात, हे लक्षात आलं की विचारांकडे अधिक लक्ष देणं सुरू होईल, असं ज्ञानेंद्र म्हणाला. त्यावर कर्मेद्र म्हणाला..
कर्मेद्र – पण माझ्या मनात विचार काय चालतो आणि माझ्याकडून कृती काय घडते, याकडे लक्ष द्यावं, ही सूचना ठीक आहे. पण माणूस असा सारखा अंतर्मुख राहू शकतो का? कारण जगण्यात इतक्या घडामोडी घडत असतात.. घरातल्या कटकटी असतातच, पण कारखान्यातही काही कमी प्रश्न नसतात.. काम करून घेण्याचे, कामगारांचे, त्यांच्यातील तणातणीचे आणि त्यांच्या व्यक्तिगत जीवनाचेही प्रश्न आपल्या मध्ये उभे राहू शकतात.. बरेचदा त्यांच्याशी वागताना आपणही अनेक प्रश्नांनी गांजलो असतो.. मग अशा वेळी माझ्या मनात विचार काय सुरू आहे आणि मी कृती काय करीत आहे, हे पहायची उसंत तरी मिळेल का?
हृदयेंद्र – तुझा मुद्दा बरोबर आहे. पण तरीही प्रयत्नपूर्वक अवधानाची सवय लावण्याचा अभ्यास करावाच लागेल ना? तुझं काय, माझं काय, योगाचं काय किंवा ज्ञान्याचं काय.. प्रत्येकाचं जीवन वेगवेगळं आहे.. प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे आहेतच, पण आपापल्या स्वभावाच्या घडणीप्रमाणे त्यांना सामोरं जाण्याची आपली रीतही वेगवेगळी आहे.. तरी अखेर आपलं ध्येयशिखर एकच आहे.. या सृष्टीतल्या यच्चयावत जिवांचं ध्येय मुक्ती हेच आहे आणि प्रत्येकाचीच त्या दिशेनं वाटचाल सुरू आहे, अशा आशयाचं विधान स्वामी विवेकानंद यांनीही केलं होतं..
कर्मेद्र – हृदू तू असं एकदम अनाकलनीय टोक गाठतोस.. माणसाचं ध्येय ठरू शकतं, पण यच्चयावत जिवांनी मुक्ती हेच ध्येय ठरवलंय, हे काय ते तुला सांगायला आले होते? आणि प्रत्येक माणसाचं ध्येय मुक्ती आहे, पण असं प्रत्येकजण मानतो आणि म्हणतो का?
हृदयेंद्र – (हसत) शब्दांत कुणी सांगत नसो की कुणाला ते जाणवलंही नसो, पण प्रत्येक जीवमात्राची प्रत्येक कृती ही मुक्त राहण्याचीच असते..
कर्मेद्र – मुक्त राहण्याची का? आनंद भोगण्याचीच असते, असं का नये म्हणू?
हृदयेंद्र – दोन्हीचा अर्थ एकच आहे! जो आनंद आपल्याला हवा आहे तो अखंड आहे ना? जो बंधनात आहे, तो अखंड आनंद भोगू शकतो का?
योगेंद्र – वा! छान.. आणि ही बंधनंही अनंत आहेत बरं का.. मायेची बंधनं, अज्ञानाची बंधनं, भ्रमाची बंधनं..
हृदयेंद्र – आणि गंमत अशी की, आपली बंधनं कधी संपतच नाहीत.. मायेचं एक बंधन सुटलं तर दुसरं आपण उत्पन्न करतो किंवा त्यात गुरफटून घेतो! अज्ञानाचं एक बंधन कमी झाल्यानं ज्ञानावस्था येत नाही.. अज्ञानाचं एक वर्तुळ तोडलं तरी त्यापेक्षा मोठय़ा वर्तुळात आपण असतोच! भ्रमाचं एक बंधन सुटलं तरी दुसरं बंधन हजर असतंच.. बरं ही सगळी बंधनं मनाचीच आहेत बरं का! बरेचदा मनानंच ती उत्पन्न केली आहेत आणि मनच ती जोपासत आहे.. त्या बंधनात मनाला सुरक्षित वाटतंय..
कर्मेद्र – पण बंधनाशिवाय समाज राहील का? अर्निबध समाज तुला हवायं का?
हृदयेंद्र – मी सामाजिक बंधनांबाबत म्हणत नाही.. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी ती अटळ असतात.. इथे मी सांगतोय ती मायेची बंधनं आहेत.. त्या बंधनांतून सुटल्याशिवाय खरा निरतिशय अखंड आनंद नाही.. आणि प्रत्येक जीवमात्र त्या आनंदासाठीच अर्थात बंधनरहित होण्यासाठी, मुक्तीसाठीच धडपडतोय.. त्यासाठी आंतरिक पालटाची साधना आहे..
योगेंद्र – म्हणूनच अंत:करण आणि देहाचं उपकरण यांना वळण लावण्यासाठीच तर योगसाधना आली..
हृदयेंद्र – मार्ग कोणताही असो.. मला आठवतं बाबा बेलसरे यांनी कुठेतरी लिहिलंय.. त्यांना वाटे जे नाम महाराजांनी मला दिलंय ते तात्पुरतं आहे.. साधनेत जसजशी प्रगती होत जाईल तसतसं ते नाम बदलेल.. ज्या नामानं अनेकांना साक्षात्कार झाला ते नाम वेगळंच असलं पाहिजे.. पण ते म्हणतात की, कालांतरानं त्यांना जाणवलं पालट नामात होत नाही, ते घेणाऱ्या ‘मी’मध्ये होतो! तेव्हा मार्ग कोणताही असो, योगाचा असो, ज्ञानाचा असो की भक्तीचा असो.. प्रत्येकाचा हेतू एकच, आंतरिक पालट घडवणं!
ल्ल चैतन्य प्रेम