साधना जसजशी खोलवर जाऊ लागते तसतसा पालट साधनेत होत नाही, तर ‘मी’मध्ये होऊ लागतो.. मग साधनेचा मार्ग कोणताही असो, असं हृदयेंद्र म्हणाला. त्यावर कर्मेद्रनं विचारलं..
कर्मेद्र – पण हा ‘मी’पणा जर एकसारखाच आहे तर मग साधना तरी वेगवेगळ्या मार्गानं का असावी?
हृदयेंद्र – अगदी साधी गोष्ट आहे.. ‘मी’पणा जरी एक असला तरी प्रत्येक ‘मी’मध्ये स्थितीगत, परिस्थितीगत, संस्कारगत, आकलनगत अनंत प्रकार आहेत.. त्याचबरोबर प्रत्येकाची आवडनिवडही वेगवेगळी आहे.. त्यामुळे सुरुवातीला साधनेचे हे मार्ग वेगवेगळे भासतात.. जसं पंढरपूरला जायला अनेक रस्ते आहेत, पण शेवटी एकाच दारातून मंदिरात जायचं असतं ना? तसंच आहे हे.. सर्व मार्ग शेवटी एकाच ठिकाणी येतात.. निजस्वरूप.. आत्मस्वरूप..
ज्ञानेंद्र – पण हे सारं पुन्हा पुन्हा शाब्दिक होत नाही का? निजस्वरूप, आत्मस्वरूप म्हणजे नेमकं काय? की ते तसं आहे, असं गृहित धरून साधना करायची?
हृदयेंद्र – जोवर शब्दांच्या आधाराशिवाय आपण विचारही करू शकत नाही, तोवर सारं शाब्दिकही भासणार नाही का? शब्द केवळ संकेत करतात.. पूर्ण बंधनरहित मुक्त परमानंद स्थितीचा अनुभव शब्दांत मांडताच येत नाही.. निजस्वरूप, आत्मस्वरूप अशा शब्दांत त्या अनुभवाचं वर्णन करायचा केवळ प्रयत्न असतो.. पण ज्ञान्या.. अखेर ज्ञान म्हणजे तरी काय? अज्ञानाचं निवारणच ना? आणि ‘अज्ञान’ हे अज्ञान असल्याचं जोवर उमगत नाही तोवर तेच ‘ज्ञान’ भासत असतं ना? तसं मार्ग ज्ञानाचा असो, भक्तीचा असो की योगाचा.. सुरुवातीला उपासनेच्या आकलनातही अज्ञानाचाच तर प्रभाव असतो.. सद्गुरूंच्या बोधानंच ते अज्ञान दूर होऊ लागतं.. सुरुवातीला काही ‘अहं ब्रह्मास्मि’ हा अनुभव नसतो, केवळ ते मानणं असतं आणि ते त्या पातळीवर शाब्दिकच तर असतं! जो ब्रह्मस्थितीत आहे त्याच्यात ‘अहं ब्रह्मास्मि’ म्हणण्याइतका तरी ‘अहं’ उरेल का? तर शब्दांचंच बोट पकडून अनुभवाच्या प्रांतात पाऊल टाकावं लागतं आणि अनुभव आला की शब्द मावळतात.. एखादी बंदिश गायला लागावं आणि मग शब्दांची जागा सुरांनी काबीज करावी.. मग त्या सुरांच्या प्रवाहात गायकानं स्वत:लाच हरवून बसावं आणि केवळ त्या अनुभवानं अंत:करणापासून रोमांचित व्हावं तसंच काहीसं असावं हे!
कर्मेद्र – हा तुझा अनुभव नाही.. त्यामुळे हेसुद्धा शाब्दिकच.. फक्त चांगल्या शब्दांत मांडलंस एवढंच.. (सगळे हसतात)
योगेंद्र – पण आपली चर्चा सुरू आहे ती त्या अनुभवाआधीची! ‘‘गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा। तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे।। काय सांगों झालें कांहीचिंया बाहीं। पुढें चाली नाहीं आवडीनें।।’’ ही त्या अनुभवाची सुरुवात आहे आणि ‘‘तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा। अनुभव सरिसा मुखा आला।। आनंदाचे डोहीं आनंद तरंग। आनंदचि अंग आनंदाचें।।’’ हा तो अनुभव आहे!!
हृदयेंद्र – अगदी बरोबर..
योगेंद्र – तेव्हा त्या परमानंद मुक्त स्थितीची चर्चा करण्याआधी त्या अनुभवापर्यंत पोहोचायचं कसं, ही चर्चाच महत्त्वाची नाही का? आज आपण साधनेत आहोत.. सद्गुरूंचा अनुग्रह लाभलेलेही हजारो साधक असतील तरी प्रत्येकाच्या जीवनात ‘‘गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा। तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे।। काय सांगों झालें कांहीचिंया बाहीं। पुढें चाली नाहीं आवडीनें।।’’ हा अनुभव का नाही? तो कसा यावा? त्यासाठीची साधना कोणती, ही आपली चर्चा खूप महत्त्वाची आहे.. या चर्चेत खोलवर शिरायला हवं..
कर्मेद्र – म्हणजे आधी साधना खोल गेली पाहिजे.. आणि आता ती करण्याची चर्चाही खोलवर गेली पाहिजे?
हृदयेंद्र – (हसत) इमारत उंच बांधायची म्हणून ती लगेच जमिनीवर उभारायला सुरुवात करता येत नाही! आधी पाया खणावा लागतो.. इमारत जितकी उंच तितका तो खोल खणावा लागतो! तसं ‘मी’पणाच्या ढासळत्या घराच्या जागी परमानंदमय भव्य इमारत बांधायची तर ते ‘मी’पणाचं ढासळतं घर पाडावं लागतं.. तेवढं पाडून काही होत नाही, मग पाया खोलवर खणावा लागतो.. तसं अध्यात्माचं उच्च शिखर ज्याला गाठायचं आहे त्याला ‘मी’मध्ये पालट साधावाच लागेल आणि त्यापुढे पायाही पक्का करावा लागेल!