साध्याचा योग घडावा यासाठीच्या साधनेवर चर्चा रंगत आली होती. आहे त्या परिस्थितीत, आहे त्या क्षमतांसह साधकाला साधनपथावर वाटचाल सुरू करावीच लागते.. योग्य काळ, योग्य परिस्थितीची वाट पाहात तो थांबू शकत नाही, असं सांगून हृदयेंद्रनं एकवार मित्रांकडे नजर टाकली. मग मंदस्मित करीत आपली टिपणवही चाळत तो म्हणाला..

हृदयेंद्र : मन एकाग्र करण्यासाठी योग्य जागा, योग्य परिस्थिती, योग्य माणसं मी शोधू लागलो तर अख्ख्या जन्मात तो योग येणार नाही! आहे त्यातच मला वाटचाल सुरू करावी लागेल.. मला तुकाराम महाराजांचा एक अभंग या चर्चेच्या दृष्टीनं मार्गदर्शक वाटतो.. ते म्हणतात.. ‘‘जेथे आठवती स्वामीचे ते पाय। उत्तम तो ठाय रम्य स्थळ।।’’ ज्या ठिकाणी स्वामींच्या म्हणजे श्रीसद्गुरूंच्या चरणाचं स्मरण होतं ते स्थानच उत्तम आहे, रम्य आहे..जणू ते तीर्थक्षेत्रच आहे! श्रीसद्गुरूचे स्मरण हृदयात होतं, असं भक्त मानतो ना? तर साधकाचं हृदय हेच ते रम्य स्थान आहे. मग म्हणतात, ‘‘रान अथवा घर एकांत लोकांत। समाधान चित्त ते ते घडी।।’’ मग असा हा साधक जंगलात असो की घरात असो, एकांतात असो की लोकांतात असो.. स्मरणाच्या प्रत्येक क्षणी त्याचं चित्त समाधानानं भरून जात असतं.. ‘‘धन्य तो हा काळ सरे आनंदरूप। वाहाता संकल्प गोविंदाचे।।’’ गोविंद या शब्दाचे दोन अर्थ आहेत.. एक म्हणजे गोवणारा आणि दुसरा म्हणजे भवाच्या गुंत्यातून सोडवणारा! इथे दुसरा अर्थ लागू आहे.. भवाच्या गुंत्यातून मला सोडविणारा सद्गुरू हाच तो गोविंदा आहे..
योगेंद्र : ‘भज गोविन्दम्’च्या वेळी तू सांगितलं होतंस..
हृदयेंद्र : हो! गोविंद हे आद्य शंकराचार्याच्या सद्गुरूंचं नाव! सद्गुरू स्मरण हाच त्या स्तोत्राचा मुख्य विषय आहे.. तर भवाच्या गुंत्यातून मला सोडविणाऱ्या श्रीसद्गुरूंचाच संकल्प जेव्हा या हृदयात उमटतो.. म्हणजे त्यांची इच्छा तीच माझी इच्छा होते.. त्यांचा विचार तोच माझा विचार होतो.. अशी स्थिती येते तेव्हा ‘धन्य तो हा काळ सरे आनंदरूप!’ तो काळ आनंदाचा होतो!! ‘‘तुका म्हणे लाभकाळ तेंचि जिणे। भाग्य नारायण उत्तम ते।।’’ श्रीतुकाराम महाराज म्हणतात, या परम लाभकाळाचा योग ज्याच्या जीवनात येतो त्याचं जीवन सर्वोत्तम आहे! हे उत्तम भाग्यही ‘नारायणा’च्याच योगानं येतं! ‘नारायण’ या शब्दाचा अर्थ आहे-नरदेहरूपी घरात प्रकटलेला सद्गुरू!!
योगेंद्र : श्रीशंकरमहाराज होते ना?
हृदयेंद्र : धनकवडीचे?
योगेंद्र : हो.. तर ते एकदा एका मुस्लीम भक्ताशी इस्लामी परंपरांबद्दल काहीतरी बोलत होते.. नमाजाचा विषय निघाला तेव्हा खरा नमाजी कोण ते महाराजांनी सांगितलं.. जीवनात जो कुठल्याही कृतीला माजत नाही, ज्याचा अहंकार अल्लाशी एकरूप झाला आहे तो खरा नमाजी म्हणाले!
हृदयेंद्र : ज्यानं आपला मान बोधाच्या मुसळानं नष्ट केला आहे तो खरा मुसलमान असा अर्थ ‘योगसंग्राम’मध्येही आहे बरं का..
योगेंद्र : वा! तर एका भक्तानं मग शंकर महाराजांना विचारलं की, महाराज आपल्याही धर्मात असे नमाजी आहेत का? त्यावर शंकर महाराज उद्गारले, ‘‘हो आहेत! आपल्या सर्व वृत्तींचा ऱ्हास करून जो शिष्य आपल्या सद्गुरूंना समर्पित होतो, तो आपला नमाजी!’’ मग ‘ज्ञानेश्वरी’चा दाखला देत म्हणाले.. ‘‘मग समाधि अव्यत्थया। भोगावी वासना थया। ते मुद्रा श्रीगोरक्षराया। दिधली मीनीं।।’’ ही अव्यत्यय समाधिस्थिती मी नव्हे, श्रीगोरक्षांनी दाखवली आहे!
हृदयेंद्र : वा! अशी सद्गुरू शरणता हीच साधनेची परिपूर्ती आहे..
ज्ञानेंद्र : ‘मुसलमान’ शब्दाचा अर्थ आत्ता हृदून सांगितला.. ‘हिंदु’ म्हणजे ‘हीन’ अधिक ‘दु’ अर्थात द्वैताला जो हीन लेखतो तो ‘हिंदू’ असाही एक अर्थ मी वाचला होता.. मला हसू एवढय़ापुरतं येतं की, शब्दांचा जो अर्थ तुम्ही सांगता तो जगण्यात का दिसत नाही?
हृदयेंद्र : या विसंगतीमुळेच तर धर्मग्रंथांपासून ते संतांच्या रचनांपर्यंत.. सगळ्यांत आपल्याला शब्दच भेटतात! शब्दांचीच पारायणं करतो.. शब्दांनी टरफलं निघाली आणि अर्थाचे खरे दाणे हाती आले की तो अर्थ खाल्ला जाईल.. पचवला जाईल.. रक्तात मिसळेल! आपली अभंगांवरची चर्चा याच तर हेतूनं सुरू झाली!