सगुणाची शेज निर्गुणाची बाज। सांवळी विराजे कृष्णमूर्ति।। मन गेलें ध्यानीं कृष्णचि नयनीं। नित्यता पर्वणी कृष्णसुख।। या ओव्या बुवांनी परत म्हटल्या. मग ते उद्गारले..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुवा – ‘‘मन गेलें ध्यानीं’’ या शब्दांकडे नीट लक्ष द्या.. मन ध्यानात गेलं पाहिजे.. मावळलं पाहिजे!
अचलदादा – समर्थ रामदासांचं भजन आहे.. ‘‘ध्यान करूं जातां मन हरपलें। सगुण जाहलें गुणातीत।। जेथें पाहों तेथें राघोबाचें ठाण। करीं चापबाण शोभतसे।। राम माझे मनीं राम माझे ध्यानीं। शोभे सिंहासनीं राम माझा।। रामदास म्हणे विश्रांति मागणें। जीवींचें सांगणें हितगुज।।’’
बुवा – प्रभू रामचंद्रच त्यांचे सद्गुरू होते आणि रामाशिवाय त्यांच्या अंत:करणाला दुसरा काहीच विषय नव्हता.. म्हणून तर पंढरपूरच्या विठ्ठलाला पाहून म्हणाले ना? ‘‘येथे का उभा श्रीरामा?’’ आणि दादा तुम्ही जे भजन म्हणालात ना, त्याचे अखेरचे चरण काही ठिकाणी वेगळे आहेत.. ते भजन असं.. ‘‘‘‘ध्यान करूं जातां मन हरपलें। सगुण जाहलें गुणातीत।। जेथें पाहों तेथें राघोबाचें ठाण। करीं चापबाण शोभतसे।। रामरूपीं दृष्टि जाऊनी बैसली। सुखें सुखावली न्याहाळीतां।। रामदास म्हणे लांचावलें मन। जेथें तेथें ध्यान दिसतसे।।’’
हृदयेंद्र – खरंच आमची ही स्थिती का होत नाही?
बुवा – कारण खरं ध्यान नाही! ध्यान कुठे दिलं पाहिजे, याची उमज नाही..
ज्ञानेंद्र – निसर्गदत्त महाराज म्हणत, ‘ध्यान म्हणजे ध्यास.’
बुवा – वा! फार सुंदर!! ज्या गोष्टीचा ध्यास असतो त्याच गोष्टीचं ध्यान होतं.. सगळं ध्यान तिकडेच केंद्रित होतं ना? या दृश्य जगाकडे अहोरात्र लागलेलं ध्यान उतरावं आणि सद्गुरूंचं ध्यान सुरू व्हावं म्हणूनच सर्व साधनेचा आटापिटा आहे.. रामदास म्हणतात त्याप्रमाणे सद्गुरूंच्या ध्यानानं अंत:करण व्यापून गेलं ना, तर मन हरपेल.. सगुण जाहले गुणातीत.. सगुण म्हणजेच आकारमय सृष्टीत वावरताना मी आणि माझ्या भोवतालचे सारेच जण सगुण अर्थात त्रिगुणांच्या पकडीत म्हणजेच विकारांसहित होते, त्या विकारांचीच वजाबाकी होईल! मग अन्य कुणाच्याही क्रियेची अहंप्रेरित प्रतिक्रियाच उमटणार नाही.. जिथे दृष्टी जाईल तिथे सद्गुरूच दिसतील.. एकदा जगावरची दृष्टी अशी रामरूपावर जडली तर परमसुख का दूर आहे? मग जिथे तिथे ध्यानच घडू लागल्यानं मनही त्याला लाचावेल..
हृदयेंद्र – पण ‘मन गेले ध्यानीं’ ही स्थिती लाभावी कशी?
बुवा – त्यासाठी ‘‘कृष्णची नयनीं’’ आवश्यक आहे! समस्त इंद्रियांना सद्गुरूमयतेचं वळण लागलं पाहिजे..
अचलदादा – तुकाराम महाराजांचा अभंगच आहे.. ‘‘घेई घेई माझें वाचे। गोड नाम विठोबाचें।।’’ या मुखावाटे जगाची स्तुती-निंदा सतत सुरू आहे. आत्मस्तुती आणि परनिंदेनं सगळं बोलणं व्यापलं आहे. तर तुकाराम महाराज या मुखाला सांगतात की या बडबडीत शक्ती आणि वेळ वाया घालवू नकोस.. त्या विठोबाच्या नामात रंगून जा..
बुवा – तुकोबा तर एका अभंगात सांगतात, ज्या तोंडानं आपण खातो त्याच तोंडावाटे शौचही व्हायला लागलं तर कसं वाटेल? मग ज्या मुखानं नाम घेतो त्याच मुखानं परनिंदा, आत्मस्तुती का कराविशी वाटते? खरंच अध्यात्म ऐकणं, बोलणं खूप सोपं आहे.. ते आचरणात येणं फार कठीण! घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, ही जाणीव वाचेला सतत करून द्यायला हवी..
अचलदादा – पुढे तुकोबा सांगतात, ‘‘तुम्ही घ्या रे डोळे सुख। पाहा विठोबाचें मुख।।’’ या डोळ्यांवाटे अशाश्वत जगाला अशाश्वत म्हणूनच पहा! त्यात शाश्वत सुख, शाश्वत शांती, शाश्वत आधार मिळेल, या विचारानं अशाश्वतात शाश्वताचा शोध घेत राहू नका! जो शाश्वत आहे त्याच्याच वाटेवर चालतोय ना, इखडे लक्ष ठेवा.. मगच खरं सुख मिळेल.. नेत्रसुख! उत्तम पदार्थ पाहिला की डोळे सुखावतात ना? (कर्मेद्र सूचक हसतो त्याच्याकडे पहात) पण डोळ्यांना काय हो सुख? सौंदर्य पाहून ‘डोळ्यां’ना सुख होत नाही की सडकं प्रेत पाहून ‘डोळ्यां’ना दु:ख होत नाही.. सर्व मनाचाच खेळ..
कर्मेद्र – मग काय डोळ्यांवर पट्टीच बांधून जगावं का?
अचलदादा – अज्ञानाची पट्टी बांधूनच तर जगतोय आपण! उलट ती काढून खऱ्या दृष्टीनं पाहू लागा!!

मराठीतील सर्व अभंगधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhangdhara
First published on: 02-12-2015 at 00:43 IST