X

२३७. मन गेले ध्यानीं : ३

बुवा -खरंच सगळा जन्म असा धावण्यातच सरत आहे

सर्वाच्याच डोळ्यांपुढे रेल्वे स्थानकातील ती धावती गर्दी उभी होती.. जो तो त्या गर्दीत स्वत:लाही पहात होताच! विठ्ठल बुवा हसून म्हणाले..

बुवा -खरंच सगळा जन्म असा धावण्यातच सरत आहे.. आणि हळुहळू तर आपण नेमकं कशासाठी, काय मिळवायला धावतो आहोत, याची आठवणसुद्धा उरलेली नाही! नामदेव महाराज या धावणाऱ्यांना जागं करत म्हणतात, ‘‘नामा म्हणे येथे काही नसे बरे। क्षणाचे हे सर्व खरे आहे।।’’ सारा क्षणांचा खेळ आणि तो कोणत्या क्षणी संपेल, याचा काहीच भरवसा नाही! अहो.. दादा सांगतात त्याप्रमाणे, आपलं सगळं जगणं साठ-सत्तर वर्षांचं.. त्यात अनंत जन्मांच्या वासना संस्कारानं मनाचा जगाकडे ओढा.. आता कुठे थोडं थोडं कळू लागलंय तर उरलेल्या आयुष्यात हा अभ्यास केलाच पाहिजे.. त्यात यश येईल किंवा नाही, पण चिकाटीनं अभ्यास करायला तर लागू! त्यासाठी दादांनी सांगितलेला तुकोबांचा ‘‘घेई घेई माझे वाचे। गोड नाम विठोबाचे।।’’ हा अभंग साधकानं मनात बिंबवून घ्यायला हवा.. किती स्पष्ट सांगितलंय तुकोबांनी परनिंदा आणि आत्मस्तुती खरंच घातक असते आणि अनेक साधक असे आहेत, जे परनिंदा करणार नाहीत, पण आत्मस्तुतीच्या विळख्यात सापडल्यावाचून राहणार नाहीत.. मोठमोठे साधक इथे घसरतात.. पाच विषय साधकाला कशी गोडी लावतात आणि गुंगवून, गुंतवून रसातळाला नेतात हे ‘चिरंजीव पदा’त फार स्पष्ट सांगितलं आहे.. हे पदही साधकानं नित्य पठणात ठेवलं पाहिजे..

कर्मेद्र – पाच विषय म्हणजे?

हृदयेंद्र – शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध..

बुवा – बरोबर! आणि त्यानुसार शब्दगोडी, स्पर्शगोडी, रूपगोडी, रसगोडी आणि गंधगोडी साधकाला कशी गुंतवते हे नाथांनी मार्मीकपणे सांगितलंय.. ते म्हणतात, ‘‘जनस्तुति लागे मधुर। म्हणती उद्धरावया हा हरीचा अवतार। आम्हांलागी जाहला स्थिर। तेणें तो धरी फार ‘शब्दगोडी’।।’’ पाच विषयांतला हा पहिला विषय आहे आणि नाथ म्हणतात त्याप्रमाणे तो संभ्रमात पाडणारा अर्थात साधकाच्या मनात स्वत:विषयी भ्रम निर्माण करणारा आहे! आपण साधक आहोत आणि हा अख्खा जन्म साधनेसाठीच आहे, हेच खऱ्या साधकानं अखेरच्या श्वासापर्यंत लक्षात ठेवलं पाहिजे.. लोकांच्या स्तुतीला भुलून त्यालाही जर असं वाटलं की खरंच तो कुणीतरी झाला आहे, तर तो मोठा आत्मघात आहे! एकदा स्तुती सुरू झाली की मग ‘स्पर्शगोडी’ कशी येते, ते नाथ सांगतात.. ‘‘नाना मृदु आसने घालिती। विचित्र र्पयक निद्रेप्रति। नरनारी शुश्रुषा करिती। तेणें धरी प्रीति स्पर्शगोडी।।’’ स्तुती करून माणसाला राहवत नाही.. ज्याची स्तुती केली त्याची सेवाही केली पाहिजे, असं त्याला वाटतं आणि मग या साधकाला उत्तम उत्तम आसनं दिली जातात आणि त्याच्या सेवेत नरनारी रममाण होतात.. यातून स्पर्शगोडी उत्पन्न होते.. मग लोकांच्या सेवातत्परतेचीच मनाला सवय होते.. मग येतो ती रूपगोडी! ‘‘..वस्त्रे भूषणे देती बरवीं। तेणें सौंदर्य करी जीवीं। देहभावीं श्लाघ्यता।।’’ उत्तम उत्तम वस्त्र, आभूषणं देऊन या साधकाचा गौरव केला जातो.. दृश्यरूपातच मग हा साधक अडकू लागतो.. साध्या वस्त्रांऐवजी उत्तमोत्तम वस्त्रांची त्याला सवय लागते.. जीवनातला साधेपणा, सहजपणा जणू आटून जातो.. मग येते ती रसगोडी.. नाथ सांगतात, ‘‘जें जें आवडे तें तें याला। गोड गोड अर्पिती।।’’ या साधकाला जे खायला आवडतं ते त्याला मोठय़ा प्रेमानं खाऊ घालतात.. प्रेमाचा इतका भडिमार करतात की त्यात हा साधक पुरता अडकून जातो.. मग उत्तम सुगंधित अत्तरे, फुले, हार, उदबत्त्या त्याला अर्पण करतात आणि गंधगोडीतही तो अडकतो.. एकदा या पाच विषयांत साधक अडकला की त्याची घसरण सुरू झालीच समजा.. मग नाथ सांगतात त्याप्रमाणे, ‘‘मग जे जे जन वंदिती। तेचि त्याची निंदा करिती। परि अनुताप नुपजे चित्ती। ममता निश्चिती पूजकांची।।’’ ज्या ज्या लोकांनी त्याला स्तुतीत आणि सेवेत अडकवलं होतं तेच त्याची निंदा करू लागतात आणि त्याला आपल्या तालावर नाचवू पाहतात.. असं होऊनही या लोकांच्या ममतेत अडकलेला हा साधक त्यांनाच शरणागत होतो.. ही स्तुतीशरणताच असते! खरंच साधकानं फार फार सांभाळलं पाहिजे..

चैतन्य प्रेम