साधकानं किती सावध राहिलं पाहिजे, याचं संत एकनाथ महाराजांनी ‘चिरंजीव पदा’त केलेलं मार्गदर्शन सांगताना विठ्ठल बुवांची वाणी जणू निर्धारयुक्त झाली होती. त्यांचं बोलणं क्षणभर थांबल्याची संधी साधत कर्मेद्र उद्गारला..
कर्मेद्र – एक विचारू का? ‘मन गेले ध्यानी’बद्दल बोलता बोलता एकनाथ महाराजांचा हा अभंग का आला?
हृदयेंद्र – कम्र्या, अभंग नाही हा, ४२ ओव्यांचं स्तोत्र आहे ते..
कर्मेद्र – ठीक आहे, स्तोत्र असेल, पण त्याचा आणि ‘मन गेले ध्यानी’चा संबंध काय?
बुवा – ‘मन गेले ध्यानी’ ही स्थिती साधणं किती कठीण आहे, हे समजावं यासाठी या स्तोत्राचा दाखला आला..
कर्मेद्र – पण साधकालाही जर ही स्थिती कठीण असेल तर मग तिचा विचार तरी कशाला करावा?
बुवा – मी कठीण म्हणालो, अशक्य म्हणालो नाही! ध्यानाच्या महाद्वारातून गेल्याशिवाय आत्मस्वरूपाचं खरं दर्शनच अशक्य आहे..
कर्मेद्र – पण हे आत्मस्वरूप असं खरंच काही असतं का हो? (कर्मेद्रच्या प्रश्नानं बुवा जणू स्तब्ध झाले आहेत. त्यांच्याकडे पाहत हृदयेंद्र उसळून म्हणतो..)
हृदयेंद्र – कम्र्या तुला काय कळणार या गोष्टी?
बुवा – (स्वत:शीच पुटपुटल्यागत) तुम्हालाच कळतील या गोष्टी! (मग थोडं मोठय़ानं) कर्मेद्रजी तुमचा प्रश्न हा एका विलक्षण अशा आध्यात्मिक सत्याकडेच नेणारा आहे.. पण त्याची चर्चा करू गेलो तर ‘सगुणाची शेज’ची चर्चा बाजूला राहील! पण तुमचा आधीचा जो प्रश्न होता की ‘मन गेले ध्यानी’च्या चर्चेत ‘चिरंजीव पदा’ची चर्चा का आली, तर त्याचं उत्तर प्रथम देतो.. लोकस्तुतीचं आमिष दाखवत चांगल्या चांगल्या साधकालाही मन कसं नाचवतं आणि गुंतवतं, हे कळावं यासाठी हे पद प्रत्येक साधकानं कायम लक्षात ठेवलं पाहिजे.. ध्यानाच्या महाद्वारात शिरण्याआधीच साधकाचं मन जर लोकस्तुतीला भुललं तर पुन्हा ते प्रपंचाच्याच खेळात कसं घसरतं, हे या पदातून उमगेल..
हृदयेंद्र – समजा लोकस्तुतीचा प्रभाव पडू दिला नाही आणि लोकांबरोबर सद्गुरूंच्या बोधाचीच चर्चा केली तर त्या सत्संगानं काही धोका आहे का?
अचलदादा – (उसळून) अहो ती वाटसुद्धा शेवटी प्रपंचाकडेच खेचणारी.. तुमच्या आमच्या गप्पांनी का कुणाला आत्मज्ञान होणार आहे? जगाचं आपल्यावाचून काहीही अडलेलं नाही, हे पक्कं लक्षात ठेवा! आणि प्रत्येक जिवाला आत्मज्ञान व्हावं, यासाठी परमात्मशक्ती अखंड कार्यरत आहेच.. पण ठेच लागूनही लोक जागं व्हायला तयार नाहीत.. त्यांना का तुमच्या बोलण्यानं जाग येणार आहे? इथं कुणाला हवंय आत्मज्ञान? ज्याला त्याला जगण्यातल्या अडचणींच निवारण हवं आहे.. त्या अडचणींचं निवारण करण्याच्या हमीवरच तर बुवाबाजीचा बाजार तेजीत आहे.. सत्संग म्हणून बोलणं सुरू होतं आणि अखेर ते प्रपंचाच्याच गटारगंगेला जाऊन मिळतं.. नाथ स्पष्ट सांगतात ना? ‘जनस्तुति लागे मधुर। म्हणती उद्धरावया हा हरीचा अवतार। आम्हांलागी जाहला स्थिर!’ हरी म्हणजे सद्गुरूच ना? तर हा तर सद्गुरूंचीच सावली आहे जणू, अशी भलामण लोक करू लागले की आपली साधना रसातळाला चाललीच समजा! जनस्तुति हा फार मोठा अदृश्य सापळा असतो.. म्हणून बुवा म्हणाले त्याप्रमाणे साधकानं फार फार सांभाळलं पाहिजे..
अचलानंद दादा यांचं बोलणं असंच कठोर असे. जणू हृदयेंद्रला जपण्यासाठीच ते इतकं स्पष्टपणे असं बोलत जणू एखाद्याला वाटावं, ते हृदयेंद्रलाच काही तरी सुनावत आहेत. त्यांचा हा पवित्रा हृदयेंद्रच्या मित्रांना तितकासा परिचित नव्हता. त्यामुळे एक विचित्र ताण आला. तो निवळावा यासाठी बुवा म्हणाले..
बुवा – असं पाहा, साधकांनी परस्परांत चर्चा करण्यात तेवढंस गैर नाही, पण त्यात ‘मला जास्त कळतं’, हे ठसविण्याची जी धडपड असते ना, ती नसली पाहिजे. ज्ञानाच्या प्रदर्शनाचा भाव शिरला ना की चर्चा शाब्दिक चोथ्यासारख्या नीरस होतात.. म्हणून चिरंजीव पदाचा दाखला दिला. का? तर लोकेषणेच्या चिमटीत सापडल्यानं तयारीच्या साधकाचं मनही ध्यानात मावळणं किती कठीण, ते उमजावं!
चैतन्य प्रेम