एकनाथी भागवतात सांगितलेला सगुणातून निराकारात जाण्याचा ध्यानमार्ग विठ्ठल बुवा उलगडून सांगत होते. ते म्हणाले..

बुवा – सर्वागसुंदर, गंभीर, सुमुख आणि सुप्रसन्न अशा मूर्तीचं ध्यान करता करता पुढे त्या ध्यानात स्वत:ला परमानंदात कसं तल्लीन करावं, हे नाथ सांगतात. ते म्हणतात, ‘‘अंगप्रत्यंगीं ध्यानयुक्त। जडोनि ठेलें जें चित्त। तें आवरूनि समस्त। चिंतावें निश्चित हास्यवदन।।’’ त्या मूर्तीच्या सर्वागसुंदर अशा अंगप्रत्यंगाच्या ध्यानात चित्त जडलं की मग ते तिथून आवरून त्या मूर्तीच्या हास्यवदनात केंद्रित करावं.. कसं? ‘‘ सर्वही सांडोनियां जाण। सांगोपांग मूर्तिध्यान। चिंतावें गा हास्यवदन। स्वानंदघन हरीचें।।’’ अंगप्रत्यंगाचं ध्यान पूर्णपणे सांडून केवळ स्वानंदघन अशा हरीच्या हास्यवदनाचं चिंतन करावं.. त्या हास्यवदनात मन तल्लीन करावं.. मग? ‘‘ध्याना आलें जें हास्यवदन। त्यांतूनही सांडोनि वदन। केवळ हास्याचें करावें ध्यान। हास्यामाजीं मन घालूनी।।’’
अचलदादा – वा! कृष्णमूर्तीच्या चेहऱ्यावर जे हास्य आहे त्यात मन इतकं तल्लीन करावं की हळूहळू त्या मुखाचंही भान उरू नये आणि त्या हास्यात, त्या प्रसन्नतेतं मन घालून त्या प्रसन्नतेचंच ध्यान सुरू व्हावं! फार सुंदर!!
बुवा – एवढय़ावरच हे ध्यान पूर्ण होत नाही! नाथ पुढे सांगतात, ‘‘त्याही हास्याचें सांडूनि ध्यान। हास्यामाजीं जो आनंदघन। तेथ प्रवेशावे मन। अतिसावधान निजनिष्ठा।।’’ त्या प्रसन्नतेचंही ध्यान सांडून त्या प्रसन्नतेचं मूळ कारण जो परमानंद आहे त्यात मनाचा प्रवेश व्हावा.. अगदी दक्षतेनं.. निजनिष्ठेनं! एकदा त्या आनंदात चित्तही आनंदयुक्त झालं की अखंड आनंदाची साधकाला प्राप्ती होईल.. मग सर्वत्र चिदाकाश दिसू लागेल.. मग चिदाकाश, चित्त आणि चिंतन हे ध्यानातील तिन्ही भेदही मावळतील आणि परिपूर्ण, भेदशून्य आणि चित्स्वरूप अशा आत्मस्वरूपात वृत्ती निमग्न होईल.. मग ज्ञेय, ज्ञाता आणि ज्ञान यांचंही स्फुरण राहणार नाही..
कर्मेद्र – बुवा, मगापर्यंत बरचंसं कळल्यासारखं वाटत होतं आता सगळं डोक्यावरून जातंय..
बुवा – (हसत) बरं, पण सगुण रूपातून सूक्ष्म अशा आनंदरूपात निमग्न होण्याचा हा ध्यानमार्ग आहे, एवढं तरी लक्षात ठेवा.. म्हणजेच ध्यान हे सुरुवातीला कृष्णमुखाचं सुरू झालं तरी त्याची पूर्ती ही कृष्णमयतेत जो परमानंद आहे, त्या सूक्ष्म परमानंदात होते, एवढंच लक्षात ठेवा.. अगदी प्रपंचातलं उदाहरण घ्या.. आईला मुलाची सारखी आठवण येते म्हणजेच मुलाचं ध्यानच जणू सुरू असतं.. तेव्हा त्याचा चेहरा प्रथम नजरेसमोर असतोच, पण मग हळूहळू वात्सल्यभावना इतकी पराकोटीला जाते की त्या चेहऱ्याचंही ध्यान ओसरून मन त्या वात्सल्यप्रेमानं आकंठ भरून जातं.. अगदी तसंच कृष्णमुखाला नयनात साठवण्यापासून सुरू झालेल्या ध्यानाची अखेर ही कृष्णमयतेत आकंठ बुडून जाण्यात होते! मन गेलें ध्यानीं कृष्णचि नयनीं। नित्यता पर्वणी कृष्णसुख!!
हृदयेंद्र – ओहो!
बुवा – या ध्यानमग्नतेनं काय होतं? भागवतात एकनाथ महाराज सांगतात, ‘‘यापरी साधकांची निजवृत्ती। माझ्या स्वरूपीं मीनल्या स्वरूपस्थिती। तेव्हां मीपणाची स्फुरे जी स्फूर्ती। तेही अद्वैती विराली।। जेवीं ज्योतीसी मीनल्या ज्योती। दोहोंची होय एकचि दीप्ती। तेवीं जीव चैतन्याची स्फूर्ती। अद्वैतसुखप्राप्ती समरसें।।’’ अवघा दोनपणा संपला.. ज्योतीनं ज्योत प्रकाशित व्हावी आणि एकसमान प्रकाशच उजळावा तशी जीवशिवाच्या ऐकत्येतून अद्वैताचीच सुखप्राप्ती समरसून यावी! जणू नित्यता पर्वणी कृष्णसुख हीच स्थिती..
कर्मेद्र – पण फार कठीणच आहे हे सारं.. (बुवा काही बोलू पाहातात तोच) हो.. काहीजणांना अशक्य नसलं तरीही!
बुवा – हे कठीण वाटतं कारण इंद्रियांना कृष्णमयतेची नव्हे तर प्रपंचमयतेची सवय आहे.. परमतत्त्वाकडे ओढ नसल्यानं मनही क्षुद्र गोष्टींच्या ध्यानातच रमतं.. त्यामुळे परमध्यान कठीण वाटतं.. पण जे कठीण भासतं ते साध्य कसं होईल, याचा मार्गही या अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगितला आहे! हृदयपरिवारीं कृष्ण मनोमंदिरीं। आमुच्या माजघरीं कृष्ण बिंबे।।
– चैतन्य प्रेम