सगुण निर्गुण गुणाचे अगुण। हरीवीण मन व्यर्थ जाय।। ही ओवी म्हणत बुवा चर्चेचं सूत्र पुढे नेत म्हणाले..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुवा – सगुण म्हणजे गुणसहित साकार आणि निर्गुण म्हणजे गुणरहित निराकार! पण इथे माउली म्हणत आहेत की सगुण तेच निर्गुण आहे आणि निर्गुण तेच सगुण आहे! या दोहोंत आणि दोहोंपलीकडे जो हरी आहे, त्याच्याशी मन जर जोडलं गेलं नाही, तर ते व्यर्थ आहे! त्या मनाची शक्ती, क्षमता व्यर्थ आहे! हा हरी म्हणजेच सद्गुरू. त्यालाच माउलींनी ‘कृष्णमूर्ती’ म्हटलं आहे.. भगवद्गीता सांगणारा कृष्ण हा नुसता अर्जुनाचा सारथी नाही. अर्जुनाला अतुलनीय क्षमता लाभली होती.. शौर्य होतं. तरी स्वजनमायेनं तो भ्रमित झाला होता. याच मायेनं भ्रमित झालेल्या जिवांना जीवनाच्या लढाईला सामोरं जायला लावणारा सद्गुरू कृष्ण आहे! हा कृष्ण.. हा सद्गुरूच सगुण, निर्गुण आणि त्यापलीकडेही आहे..
अचलदादा – माउलींनीच आणखी एका अभंगात ही गोष्ट स्पष्ट सांगितली आहे.. सुधीर फडके यांच्या स्वरात तो अभंग आपण अनेकदा ऐकला आहे पहा.. तुज सगुण म्हणों की निर्गुण रे। सगुण निर्गुण एक गोविंदु रे।। तुला सगुण म्हणू की निर्गुण म्हणू? हे दोन्ही एक तूच आहेस! अनुमाने ना अनुमाने ना। श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे।। अनुमानानं तुला जाणता येणार नाही.. वेदांनाही जिथं तुझा पाड लागला नाही आणि ‘न इति’ ‘न इति’ सद्गुरू म्हणजे असा नाही, असा नाही.. असं ज्यांनी तुझं वर्णन केलं तोच तू गोविंद आहेस.. ‘‘तुज स्थूळ म्हणो की सूक्ष्म रे। स्थूळसूक्ष्म एक गोविंदु रे।। तुज आकार म्हणो की निराकार रे। आकार निराकार एक गोविंदु रे।। तुज दृश्य म्हणों की अदृश्य रे। दृश्यअदृश्य एक गोविंदु रे।। तुज व्यक्त म्हणों की अव्यक्तु रे। व्यक्तअव्यक्तु एक गोविंदु रे।।.. सारं काही.. सर्व काही तो सद्गुरू.. तो गोविंदच व्यापून आहे..
हृदयेंद्र – आणि गोविंद म्हणजे भवाच्या गुंत्यातून मला सोडवणारा..
बुवा – बरोबर.. माउली पुढे काय सांगतात? अव्यक्त निराकार नाही ज्या आकार। जेथोनी चराचर हरिसी भजे।। हा जो गोविंद आहे, कृष्ण आहे तो अव्यक्त आहे, निराकार आहे.. आणि हे अवघं चराचर तिथपासूनच त्या हरीला भजत आहे..
हृदयेंद्र – निवृत्तिनाथ महाराजही म्हणतात ना? जेथोनि उद्गार प्रसवे ॐकार। तोचि हा श्रीधरू गोकुळी नांदे।। जिथून ॐकाराचा ध्वनि निर्माण झाला तोच श्रीकृष्णाच्या रूपात गोकुळात नांदत आहे..
बुवा – छान! नमो ये वैकुंठी योगियांचे भेटी। पाहता ज्ञानदृष्टी नये हाता।। ज्ञानबळानं तो गवसणार नाही तर भावबळाच्या योगानं वैकुंठात त्याचं दर्शन होतं.. त्यासाठी साधन काय? निवृत्ति साधन कृष्णरूपे खूण। विश्व विश्वीपूर्ण हरि माझा।। कृष्णरूपात प्रकटून, सद्गुरू रूपात प्रकटून त्यानंच साधनाची खूण सांगितली आहे.. त्या साधनानंच हा माझा सद्गुरू या चराचरात कसा भरून आहे, ही जाणीव होईल.. ‘त्रिगुण असार निर्गुण हे सार’ या अभंगाच्या अखेरच्या चरणात माउलीही सांगतात, ‘‘ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी। अनंत जन्मोनी पुण्य होय।।’’ आता यात जो ‘अनंत’ शब्द आहे ना, तो फार सूचक आहे बरं का! आणि हे जे सारे शब्द आहेत ना.. अनंत काय, हरि काय, वैकुंठ काय.. सगळेच फार महत्त्वाचे आहेत.. आणि विष्णुसहस्त्रनामांत गोविंद, हरि, क्षर-अक्षर, कृष्ण ही सारी नामं आली आहेत पहा.. ‘अनन्तात्मा’ असं नाम आहे सहस्त्रनामांत.. अनंत म्हणजे ज्याला अंत नाही की मध्य नाही.. न अन्तम् न मध्यम्.. आणि हा ‘अनंत’ शब्दही हरिपाठातल्या एका अभंगात आला आहे..
अचलदादा – चहूं वेदीं जाण साहि शास्त्रीं कारण। अठराहि पुराणें हरिसी गाती।। मंथुनी नवनीता तैसें घे अनंता। वायां व्यर्थ कथा सांडी मार्गु।। एक हरी आत्मा जीवशिवसमा। वायां तूं दुर्गमा न घाली मन।। ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ। भरला घनदाट हरि दिसे।।
बुवा – वेदांपासून पुराणांपर्यंत ज्या हरीचं गुणगान आहे तो हरी सद्गुरूरूपानं समोर प्रकटला आहे! ताक घुसळून जसं लोणी काढतात ना.. तसं वेद, शास्त्र, पुराणं घुसळून त्याचं सार या सद्गुरूनं समोर ठेवलं आहे आता इतर सगळेच मार्ग व्यर्थ आहेत.. केवळ सद्गुरूमयता साधणं हाच सुगम मार्ग आहे!

मराठीतील सर्व अभंगधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhngdhara
First published on: 23-11-2015 at 03:57 IST