X

२३४. ध्यानमूलं!

भगवंताचं ध्यान साधणं काही सोपं नाही, असं बुवा म्हणाले तेव्हा हृदयेंद्रच्या मनात गुरूगीतेतले श्लोक आले

भगवंताचं ध्यान साधणं काही सोपं नाही, असं बुवा म्हणाले तेव्हा हृदयेंद्रच्या मनात गुरूगीतेतले श्लोक आले.. तो म्हणाला..

हृदयेंद्र – गुरूगीतेत म्हटलं आहे.. ध्यानमूलं गुरोर्मूति: पूजामूलं गुरो: पदम् । मंत्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरो: कृपा।। सद्गुरूचं ध्यान हेच सर्व ध्यानाचं मूळ आहे.. सद्गुरूंची पूजा हीच समस्त पूजेचं मूळ आहे.. गुरुवाक्य हेच सर्व मंत्रांचं मूळ आहे.. गुरूकृपा हेच मोक्षाचं मूळ आहे!

अचलदादा – इथं मूळ हा शब्दही किती सूचक आहे पहा! झाड टवटवीत व्हावं असं वाटत असेल तर पाना-पानाला पाणी घालून काही उपयोग नाही.. मुळाशीच पाणी घातलं पाहिजे! तसं संसारवृक्षाचं मूळ असलेला जो परमात्मा.. तोच सद्गुरूरूपानं प्रकटला आहे.. भावाचं सिंचन या मुळाशीच झालं पाहिजे.. जगात तो भाव वाया जाता कामा नये..

हृदयेंद्र – तेव्हा परमात्म्याचं ध्यान एकदम साधणार नाही.. त्यासाठीच तर सद्गुरू प्रकटले आहेत.. त्यांचं ध्यान हेच सर्व ध्यानाचं मूळ आहे..

बुवा – बरोबर.. पण त्या सद्गुरूंचं ध्यान तरी का एवढं सोपं आहे?

अचलदादा – नाही तेदेखील सोपं नाहीच! कारण गुरुजींकडे लोक दर्शनाला म्हणून येत ते येतानाच त्यानंतरचा कार्यक्रम ठरवून येत! मग दर्शन घेऊन झालं आणि गुरुजी काही हिताचं सांगत आहेत तरी सारं चित्त त्यांच्या दर्शनानंतर जिथं जायचं आहे तिथंच पोहोचलं आहे! मग जिथे ‘दर्शन’ही असं वरवरचं आहे तिथं ध्यान तरी खोलवर कसं जाईल?

बुवा – म्हणून मी मघाशी काय म्हटलं? आध्यात्मिक ध्यानानं अवधान आलं पाहिजे! किंवा मन, चित्त, बुद्धीची सावधानता हीच ध्यानाची सुरुवात आहे म्हणा ना! एकनाथ महाराज भागवतात सांगतात, ‘‘श्रवणें श्रवणार्थी सावधान। तोचि अर्थ करी मनन। संपल्या कथा व्याख्यान। मनीं मनन संपेना।। ऐसें ठसावल्या मनन। सहजेचि लागे माझें ध्यान।’’ तेव्हा सद्गुरूंच्या सहवासात असताना मनानं सदोदित ‘सावधान’ स्थितीत असलं पाहिजे! श्रीगोंदवलेकर महाराजही म्हणत ना? जो सावधान असतो तोच साधक.. तर साधकानं क्षणोक्षणी सावधान राहीलं पाहिजे.. कारण क्षणोक्षणी मन त्याला अनवधानानं भटकवण्याचाच प्रयत्न करीत राहणार.. मग सद्गुरू काय सांगतात, ते ऐकताना तरी मनानं प्रथम सावध झालं पाहिजे.. मग नीट ऐकलं गेलं तर जे ऐकलं त्याचा अर्थही समजेल.. अर्थ समजला तर मग त्या अर्थाचं नीट मनन होईल.. मग सद्गुरूंचं सांगणं संपलं की मन जे अन्य विषयांत लगेच वाहावत जातं, ते होणार नाही.. मनन सुरूच राहील.. आणि असं मनन ठसलं की सद्गुरूंचं ध्यान होत जाईल! भागवतातच म्हटलं आहे.. ‘‘काया वाचा आणि मन। पुरुषें एकाग्र करून। जें जें वस्तूचें करी ध्यान। तद्रूप जाण तो तो होय।।’’ कायेनं, वाचेनं आणि मनानं एकाग्रता आली ना तर मग तद्रूपता येते.. चित्तात ज्या गोष्टीचं ध्यान अखंड सुरू आहे त्याच्याशी माणूस तद्रूप होतो.. मग जर काया, वाचा, मनानं सद्गुरू बोधाचं ध्यान सुरू झालं तर सद्गुरू बोधाशी तद्रूपताही येणार नाही का?

हृदयेंद्र – श्रीगोंदवलेकर महाराज तर म्हणत नामात इतकं तन्मय व्हा की माझं मन तुमच्या मनाची जागा घेईल! नव्हे तुमची अंगकाठीही माझ्यासारखीच होईल..

अचलदादा – मी तुमची मूर्ती घडविण्याचं काम हाती घेतलंय, असंही म्हणाले ते.. तर जेव्हा साधक सद्गुरूमय होऊ लागतो तेव्हाच ना ते त्याची जडणघडण सुरू करतील?

हृदयेंद्र – भिंगुरडीनं कीटकाला धरलं आणि त्या कीटकानं मरणभयानं भिंगुरडीचं ध्यान सुरू केलं.. तेवढय़ा तीव्र ध्यानानं त्या साध्याशा कीटकाची भिंगुरडीच झाली, असा दाखला आहेच..

बुवा – पण परमात्मा किंवा सद्गुरूंचं ध्यान त्यापेक्षा कितीतरी वेगळं आहे! एकनाथ महाराजच सांगतात, ‘‘भगवद्ध्यान नव्हे तैसें। ध्याता भगवद्रूपचि असे। ध्यानें भ्रममात्र नासे। अनायासे तद्रूप।।’’ इथं ध्यान करणारा जो जीव आहे तो शिवच आहे.. त्याच्यावर देहबुद्धीचा पडदा मात्र पडला आहे.. शाश्वताच्या ध्यानानं अशाश्वताचा हा भ्रम नष्ट होत जातो आणि मग ज्याचं ध्यान करीत आहोत त्यानंच माझ्यासकट सर्व चराचर भरून आहे, ही जाणीव उमलते!

चैतन्य प्रेम

  • Tags: attention, awareness, creation, god,