आधी उत्त्पत्ति पाळण संहाराचं निज ज्ञान होऊन मग नाम गवसलं की आधी नाम मिळाल्यानं ते निजज्ञान प्राप्त झालं, या हृदयेंद्रच्या बीजप्रश्नाचं बुवांना कौतुक वाटलंच. ते म्हणाले..
बुवा – आधी बीज की आधी वृक्ष सांगा बरं! बीशिवाय वृक्ष निर्माण होऊ शकतो का? (हृदयेंद्र नकारार्थी मान डोलावतो) आणि वृक्षाशिवाय बी उत्पन्न होऊ शकते का? (हृदयेंद्र हसून ‘नाही’ म्हणतो) मग या सृष्टीत प्रथम बीज उत्पन्न झालं ते कसं काय? जर प्रथम वृक्ष उत्पन्न झाला असेल, तर तोदेखील कसा काय?
हृदयेंद्र – (हसून) नाही बुवा.. काही नाही सांगता येत..
बुवा – आता ‘‘उत्त्पत्ति पाळण संहाराचे निज। जेणें नेलें बीज त्याचे हातीं।। तुका म्हणे आम्हां सांपडलें मूळ। आपणचि फळ आलें हातां।।’’ या तुकोबांच्या चरणांचा अर्थ तुमच्या बीजप्रश्नाच्या प्रकाशात अधिक स्पष्ट दिसतो पहा! साधकाच्या मनात प्राथमिक टप्प्यावर एकच प्रश्न मुख्य असतो.. तो म्हणजे, या सृष्टीची मुळात उत्त्पत्तिच का झाली, हा!!
योगेंद्र – हो खरं आहे हे! ही सगळी भगवतशक्तीची लीला आहे, तर मुळात अशा लीलेची त्या शक्तीला गरजच का वाटली?
ज्ञानेंद्र – सर्व जगच जर आभास आहे तर त्याचा सत्याभास तरी का व्हावा?
बुवा – मुळात हे सारं निर्माणच का झालं? ते कोण सांभाळतो? या सगळ्याचा नाश तरी का व्हावा? तो कसा होतो? तो कसा व्हावा हे कोण ठरवतो? अनंत प्रश्न साधकाच्या मनात येतात, मग तो कोणत्याही मार्गानं वाटचाल का करीत असेना? ही सर्व सृष्टी परमात्म्यानं उत्पन्न केली, त्या परमात्म्याशी ऐक्य साधलं, तरच जीवन परमानंदानं भरून जाईल, या भावनेनं भक्त भक्ती करतो.. या चराचराच्या मुळाशी जी शक्ती आहे तीच आपल्यातही आहे, ती जागी झाली तरच परमतत्त्वाशी योग पावला जाईल, या धारणेनं योगी योगाचरण करतो.. या चराचराचं खरं ज्ञान झालं तरच अज्ञान दूर होऊन अखंड ज्ञानानंद गवसेल, या विचारानं ज्ञानी ज्ञानयोग साधू पाहातो.. त्यासाठी जो-तो आपापल्या आकलनानुसार साधना करू लागतो.. पण सद्गुरू जेव्हा साधना देतात तेव्हा त्यात त्यांची शक्ती असते! अर्थात ती साधना करण्यासाठी जी चिकाटी लागते, त्यासाठी आवश्यक ती शक्तीही त्या सद्गुरूप्रदत्त साधनेतच असते. म्हणूनच ही साधनाच बीजरूप असते.. सद्गुरू बीजमंत्र देतात, साधना सांगतात, महावाक्याच्या जाणिवेत स्थिर व्हायला सांगतात.. ही बीजरूप साधना जसजशी रुजेल तसतसं या चराचराचंच नव्हे अंतरंगातील चराचराचं रहस्यही उमगू लागेल!
अचलदादा – व्वा! आणि मग, ‘‘तुका म्हणे आम्हां सांपडलें मूळ। आपणचि फळ आलें हातां।।’’ साकाराचं आणि निराकाराचं, चर आणि अचराचं, व्यक्त आणि अव्यक्ताचं जे मूळ आहे तेच सापडलं आणि फळही हाती आलं! अर्थात साधना फळाला आली.. साधनेचं फळ म्हणजे दृश्याचं खरं मायास्वरूप उमगून अंत:करण त्यातून सुटून सत्यस्वरूपात स्थिर होणं!
बुवा – तर, तुकाराम महाराज जसं सांगतात की ‘वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा’ त्याचप्रमाणे चोखामेळा महाराजही सांगतात की, ‘‘वेदाचा अनुभव शास्त्राचा अनुवाद। नामचि गोविंद एक पुरे।। ’’ अवघ्या एका सद्गुरूप्रदत्त नामानं वेदांचा अनुभव गवसला.. शास्त्रांचा खरा अर्थ उमगला.. पुढे ते काय म्हणतात? ‘‘चोखा म्हणे मज कांहींच न कळे। विठ्ठलाचे बळें नाम घेतो।।’’ याचा अर्थ काय?
हृदयेंद्र – चोखामेळा महाराज म्हणतात, मला काहीच कळत नाही, बळे का होईना, मी विठ्ठलाचं नाम घेतो..
बुवा – (हसतात) हृदय तुम्हीही फसलात बरं का!
हृदयेंद्र – (आश्चर्यानं) म्हणजे?
अचलदादा – ज्यांना वेदांचा अनुभव, शास्त्रांचा अनुवाद गवसला, ज्यांच्यावर सद्गुरुंची असीम कृपा आहे, त्यांना बळे-बळे नाम घ्यावं लागेल का? चोखामेळा महाराज काय सांगताहेत? की, मी नाम घेतोय, हे सुद्धा मला कळत नाही! ‘मी नाम घेतो,’ एवढाही कर्तेपणाचा भाव नाही पहा! अत्यंत शरणागत भावानं चोखामेळा महाराज सांगतात, मला काहीच कळत नाही हो! मी कोण हो नाम घेणारा? त्या विठ्ठलाच्या, त्या सद्गुरुच्या बळावरच माझ्याकडून नाम घेतलं जात आहे!
चैतन्य प्रेम