27 November 2020

News Flash

२३९. मन गेले ध्यानीं : ५

मुळात मन मावळणं, म्हणजे नेमकं काय, हे समजून घ्या! जन्मापासून हे मन देहबुद्धीनं व्यापलेलं आहे.

लोकेषणेच्या चिमटीत सापडल्यानं तयारीच्या साधकाचं मनही ध्यानात मावळणं कठीण असतं म्हणून साधकानं लोकेषणेच्या खोडय़ात अडकू नये, असं बुवा म्हणाले. हृदयेंद्रनं गंभीरपणे विचारलं..
हृदयेंद्र – मग यावर उपाय काय?
बुवा – विरक्ती! सद्गुरूंबाबत खरा अनुराग! ‘कृष्णचि नयनी’ नसेल आणि ‘जगचि नयनी’ असेल तर ‘मन गेले ध्यानी’ ही स्थिती लाभूच शकत नाही!! ‘कृष्णचि नयनी’ असेल तरच मन खऱ्या ध्यानात मावळतं..
कर्मेद्र – पण मन मावळण्याची इतकी गरजच काय?
बुवा – मुळात मन मावळणं, म्हणजे नेमकं काय, हे समजून घ्या! जन्मापासून हे मन देहबुद्धीनं व्यापलेलं आहे. ती देहबुद्धी मावळणं आणि आत्मबुद्धी व्यापणं, म्हणजे मन मावळणं आहे.. ‘जगचि नयनी’ असेल तोवर ही देहबुद्धी मावळणार नाही.. जगाचंच मनन, जगाचंच चिंतन सुरू असेल तर या जगाचंच महत्त्व वाटू लागेल.. मग या जगात वावरण्याचा माझा एकमेव आधार असलेला आणि या जगाशी मला जोडणारा देहही महत्त्वाचा होईल.. मग त्या देहाचंच मनन, त्या देहाचंच चिंतन, त्या देहाचीच जपणूक सुरू राहील.. त्या देहाच्या जपणुकीची चिंता असेल तर त्या देहाच्या जपणुकीसाठी म्हणून जी जी साधनं, जी जी परिस्थिती, ज्या ज्या व्यक्ती आणि ज्या ज्या वस्तू आत्यंतिक गरजेच्या वाटतात त्या त्या मिळवण्याची आणि टिकवण्याची चिंता आणि धडपड सुरू राहील.. त्या त्या गमावण्याची भीतीही मनात खोलवर मुरत राहील.. ही देहबुद्धी खरवडून काढण्यासाठीच तर साधनाभ्यास म्हणजेच साधना आणि अभ्यास आहे!
कर्मेद्र – तुम्ही म्हणता त्याप्रमाणे देहबुद्धी जर इतकी व्यापक आहे.. संपूर्ण जगण्याला व्यापून आहे.. तर ती एखाद्या लहानशा नामानं किंवा साधनेनं कशी काय दूर होईल? कारण ज्या देहबुद्धीनंच जीवन व्यापलं आहे त्याच देहबुद्धीच्या प्रभावाखाली असलेल्या जीवनात साधनेनं तरी कितीसा फरक पडेल?
योगेंद्र – कम्र्या उगाच विषयाला फाटे फोडू नकोस..
बुवा – (कौतुकानं) अहो तुमच्या मित्राचे प्रश्न ऐकून मला तर वाटू लागलंय की तो चर्चा फार बारकाईनं ऐकतोय आणि तिचा विचारही योग्य दिशेनं करतोय! कर्मेद्रजी देहबुद्धीनं जीवन व्यापलं आहे, हे तर उघडच आहे. पण या देहबुद्धीच्या ओझ्यातून क्षणभरही दुरावलं तरी किती विश्रांती लाभते हे गाढ झोपेच्या उदाहरणातून कळतंच ना? देहबुद्धीत अडकल्यानं किती त्रास आपण सोसतो आणि आत्मबुद्धीची जाणीव वाढत जाईल तसतसा किती मोकळेपणाचा आनंद आपल्याला लाभेल, हे आत्ता समजावता येत नाही. त्यासाठी साधना आणि अभ्यासच हवा.. साधना आंतरिक असते आणि जगताना तिची धारणा टिकवण्याचा आणि त्या धारणेनुरूप जगण्याचा अभ्यास हा दृश्यात जोखता येणारा असतो! जसजशी साधना करीत जाल तसतसं आत्मबुद्धीचं महत्त्व वाटू लागेल.. ‘जळत हृदय माझे जन्म कोटय़ानुकोटी’ असं आपण म्हणतो, पण खरंच आपलं हृदय कोटय़वधी जन्मांपासून जळत आहे, असं वाटत असतं का? साधनेची आंच लागली की ते कळतं.. साधना ही धगधगत्या अग्निकुंडासारखी असते.. अंतरंगातील जळमटं, क्षुद्रपणा, हीनपणा ती जाळू लागते तेव्हा कुठे जाणीव होते.. लोकेषणा, वित्तेषणा यांचे अडसर उमगू लागतात.. मनाला विरक्तीचं महत्त्व आणि निकड जाणवू लागते..
हृदयेंद्र – पण ही विरक्तीसुद्धा कठीणच आहे ना?
बुवा – (हसून) लोकेषणा सुटणं सोपं नाहीच.. त्यासाठी सद्गुरूंची कृपाच हवी. चिरंजीव पदातच एकनाथ महाराज सांगतात, ‘‘यापरी साधकाच्या चित्ता। मानगोडी न संडे सर्वथा। जरी कृपा उपजेल भगवंता। तरी होय मागुता विरक्त।।’’ मानाची गोडी सुटणं सोपं नाही.. सद्गुरूंच्या कृपेनंच ती सुटेल.. हा विरक्त असतो कसा? ‘‘तो विरक्त कैसा म्हणाल। जो मानलें सांडी स्थळ। सत्संगी राहे निश्चळ। न करी तळमळ मानाची।।’’ जिथं मान मिळतो तिथं जायला हा टाळतो. त्यापेक्षा अखंड सत्संगात तो निश्चळ राहातो!
हृदयेंद्र – पण दादांनी मगाशी सत्संगातही लोकेषणेचा शिरकाव होतो, असं म्हटलं होतं.. तिथं मान मिळाला तर?
बुवा – (हसून) हा सत्संग आंतरिक आहे.. सद्गुरूंचा ध्यास लागला असेल तर त्यांचंच मनन, चिंतन, ध्यान आणि धारणा हा खरा निश्चळ सत्संग आहे!
चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2015 1:37 am

Web Title: grace of god
टॅग God
Next Stories
1 २३८. मन गेले ध्यानीं : ४
2 २३७. मन गेले ध्यानीं : ३
3 २३६. मन गेले ध्यानीं : २
Just Now!
X