सद्गुरूंचं अखंड मनन, चिंतन, ध्यान आणि धारणा हा खरा निश्चळ सत्संग आहे, असं बुवा म्हणाले. मग उत्साहानं ते पुढे उद्गारले..
बुवा – सद्गुरूंशिवाय काहीच नाही.. त्यांच्या बोधानुरूप चालूनच अध्यात्माची ही वाट चालता येते.. तुम्ही तुमच्या बळावर काहीही करा.. अष्टांगयोग करा, नित्यानित्य विचार करा, यम-नियम पाळा.. अगदी कर्मकांडी व्हा किंवा संन्यासी व्हा.. त्यांच्या आधाराशिवाय सारं व्यर्थ! एकनाथ महाराजांनी ‘एकनाथी भागवता’त बाराव्या अध्यायात सांगितलंय.. ‘‘धरिल्या सत्संगती। भक्त माझी पदवी पावती। शेखीं मजही पूज्य होती। सांगो किती महिमान।। संतसंगतीवेगळे जाण। तत्काळ पावावया माझें स्थान। आणिक नाहींच साधन। सत्य जाण उद्धवा।।’’ भगवंत उद्धवांना सांगत आहेत की, सद्गुरूंच्या संगतीनंच भक्त माझ्या निजपदाची प्राप्ती करून घेऊ शकतात, नव्हे मलाही ते पूज्य होतात!
योगेंद्र – सद्गुरूंची संगतही का सोपी आहे?
हृदयेंद्र – नाहीच! आग आणि लोण्याचं एकत्र येणंच आहे ते! देहबुद्धीचं, प्रपंचासक्तीचं लोणी आणि आत्मबुद्धीचं अग्निकुंड यांची संगत आहे ती..
अचलदादा – पण तिच्याशिवाय दुसरा उपायच नाही..
बुवा – सद्गुरुंच्या आधाराशिवाय मी हजारो र्वष तप केलं तरी काही उपयोग नाही.. कारण ते तपही माझ्या मनाच्या आवडीनुसार, सवडीनुसारच होणार.. त्यातून अहंकारच पोसला जाणार.. अगदी ‘अहंब्रह्मास्मि’चा घोष केला तरी त्यातही अहंच प्रधान असणार! नाथच म्हणतात, ‘‘लोखंडाची बेडी तोडी। मा आवडीं सोनियाची जडी। चालतां तेही तैशीच आडी। बाधा रोकडी जैशी तैशी।।’’ लोखंडाच्या बेडय़ा तोडून सोन्याच्या बेडय़ा केल्या, त्यानं काही फरक पडला का? चालताना लोखंडाच्या बेडय़ा जशा आड येत, तशाच सोन्याच्या बेडय़ाही चालण्याची गती मंदावणारच ना? बेडी लोखंडाची असो की सोन्याची बंधन तेच, बाधाही तीच.. म्हणून भगवंताचाच हवाला देत नाथ अगदी ठामपणे सांगतात, ‘‘सकळां साधनां श्रेष्ठ साधन। शिष्यासी सद्गुरूचे भजन। तेणे पाविजे ब्रह्मसमाधान। सत्य जाण उद्धवा।। जो भावें भजे गुरुचरणीं। तो नांदे सच्चिदानंदभुवनीं। हे सत्य सत्य माझी वाणी। विकल्प कोणीं न धरावा।।’’ सद्गुरूचं भजन, हेच श्रेष्ठ साधन आहे..
ज्ञानेंद्र – आज बाहेरच्या जगात तर हेच चालू आहे! डोळे मिटून जो तो कुणा बुवाबाबाच्या नादी लागलाच तर आहे! त्या भजनानं का ज्ञान होणार आहे?
हृदयेंद्र – इथे खऱ्या सद्गुरूंचं भजन अभिप्रेत आहे.. बाजारू नव्हे..
बुवा – सद्गुरूंच भजन, म्हणजे निव्वळ सद्गुरूंच्या बाह्य़रूपाचं भजन नव्हे बरं का! सद्गुरूंच्या अंतरंगात परमात्म्याचं जे अखंड भजन सुरू आहे, तसं माझंही सुरू होणं, हे खरं सद्गुरू भजन आहे! ते जसे एकरस, एकलय, एकमय आहेत तशी माझी स्थिती झाली पाहिजे..
योगेंद्र – पण बुवा ‘एकनाथी भागवता’त ध्यानयोगही सांगितला आहे ना?
बुवा – हो! सगुणातून निराकारात जाण्याचा मार्गच त्या ध्यानात जणू उलगडून दाखवला आहे.. ‘कृष्णचि नयनी’ कसा साठवावा आणि त्या त्या ध्यानात मग मन कसं मावळतं, हेच जणू चौदाव्या अध्यायात नाथांनी फार ओघवत्या भाषेत मांडलं आहे.. ‘‘सर्वागसुंदर श्यामवर्ण। ज्येष्ठ वरिष्ठ गंभीर गहन। सुमुख आणि सुप्रसन्न। मूर्तीचें ध्यान करावें।।’’ काय वर्णन आहे पहा! ज्येष्ठ वरिष्ठ गंभीर गहन सुमुख आणि सुप्रसन्न!! काय डौल आहे आणि किती चित्रात्मकता आहे.. हे ध्यान कोणत्या भावनेनं करावं, तेही नाथ सांगतात बरं का.. ‘‘विषयीं आवरोनि मन। अखंड करितां माझें ध्यान। मद्रूपचि होय जाण। ऐसें चिंतन करावें।।’’ दहाही इंद्रियांचे विषय मनाला भरकटवण्याचा प्रयत्न करीत असतात, पण त्यातून मन आवरावं आणि माझं अखंड ध्यान साधलं तर आपण तद्रूपच होऊ, हे मनात ठसवावं.. मग? ‘‘धारणा जरी तुटोनि जाये। ध्यानठसा न तुटत राहे। मन मूर्तीच्या ठायीं पाहें। जडलें ठाये सर्वागीं।।’’ जगताना ही धारणा सुटेलही, पण ध्यानाचा ठसा काही पुसला जाणार नाही!
योगेंद्र – वा! किती छान आहे.. धारणा सुटेलही पण तो ठसा पुन्हा पुन्हा त्या धारणेकडेच वळवत राहील!
चैतन्य प्रेम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onदेवGod
मराठीतील सर्व अभंगधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Impression of meditation
First published on: 09-12-2015 at 00:17 IST