सगुणाची शेज निर्गुणाची बाज। सांवळी विराजे कृष्णमूर्ति।। मन गेलें ध्यानीं कृष्णचि नयनीं। नित्यता पर्वणी कृष्णसुख।। हृदयपरिवारीं कृष्ण मनोमंदिरीं। आमुच्या माजघरीं कृष्ण बिंबे।। अभंगाचे हे तीन चरण विठ्ठल बुवांनी पुन्हा म्हटले. या अभंगाचा या चर्चेत उलगडलेला अर्थ आपल्या प्रयत्नांनी आपल्याला कधीच लागला नसता, असं हृदयेंद्रला तीव्रतेनं वाटलं.. आता अभंगाचा अखेरचा चरण उरला होता.. निवृत्ति निघोट ज्ञानदेवा वाट। नित्यता वैकुंठ कृष्णसुखें!! बुवा आता त्याच चरणाकडे वळतील, या अपेक्षेनं हृदयेंद्र हृदयाचे कान करून ऐकू लागला.. तोच चहा आल्यानं सर्वचजण भानावर आले.. खरंच चर्चा इतकी रंगली होती की आपण कुठे आहोत, वेळ किती झाली आहे, पोटात भूक आहे की नाही.. कुणालाच काही भान उरलं नव्हतं.. गोंदवल्यात आणि आता गुरुजींच्या गावी गेल्यावर असं होतं, या विचारानं हृदयेंद्रला हसू आलं.. ज्ञानेंद्रच्या प्रशस्त दिवाणखान्याला आज जणू एखाद्या आश्रमाचंच रूप आलं होतं! चहाचा घोट घेता घेता बुवा म्हणाले..
बुवा – माउलींनी ‘‘मन गेलें ध्यानीं कृष्णचि नयनीं। नित्यता पर्वणी कृष्णसुख।। हृदयपरिवारीं कृष्ण मनोमंदिरीं। आमुच्या माजघरीं कृष्ण बिंबे।।’’ ही जी स्थिती वर्णिली आहे ना, तशीच स्थिती सोपानदेव महाराजांनीही एका अभंगात वर्णिली आहे बरं का..
हृदयेंद्र – (उत्सुकतेनं) कोणत्या हो?
बुवा – काय आहे.. माउलींचे अभंग, निवृत्तीनाथांचे, मुक्ताबाईंचे अभंगही अनेकांना माहीत आहेत.. पण सोपानदेवांचे अभंग आणि साहित्य फारसे परिचित नाही.. माउलींनी गीतेचा भावानुवाद केला, तसाच सोपानदेवांनीही गीतेचा समश्लोकी अनुवाद केला आहे.. ‘सोपानदेवी’ या नावानं तो प्रसिद्ध आहे.. त्यांचेही हरिपाठाचे अभंग आहेत.. सर्व भावंडात मुक्ताबाई सर्वात लहान, पण भावांमध्ये सोपानदेव सर्वात लहान.. माउलींनंतर तीन वर्षांनी ते जन्मले.. माउलींनी समाधी घेतल्यानंतर सर्वच भावंडांनी समाधी घेतली, त्यात पहिली समाधी सोपानदेवांनी घेतली, वयाच्या एकोणिसाव्या वर्षी.. इसवी सन १२९३ मध्ये! ही समाधी सासवडला आहे.. या जागी प्राचीन काळी ब्रह्मदेवानं तपश्चर्या केली होती, असं म्हणतात आणि माझ्या तर मनात निवृत्तीनाथ हे शंकररूप, माउली या विष्णुरूप आणि सोपानदेव हे ब्रह्मदेवरूप असल्यानं या जागेची निवड मला फार सूचक वाटते!
हृदयेंद्र – ओहो.. निवृत्तीनाथांची समाधी त्र्यंबकेश्वरला आहेच की..
बुवा – तर सोपानदेवही ‘‘मन गेलें ध्यानीं कृष्णचि नयनीं। नित्यता पर्वणी कृष्णसुख।। हृदयपरिवारीं कृष्ण मनोमंदिरीं। आमुच्या माजघरीं कृष्ण बिंबे।।’’ हीच स्थिती हरिपाठाच्या एका अभंगात मांडतात.. ते म्हणतात.. ‘‘सर्वकाळ ध्यान हरिरूपी ज्याचे। तया सर्व रूपाचे जवळी असे।। हरि हरि जाला प्रपंच अबोल। हरि मुखीं निवा तोचि धन्य।। हरि हरि मन संपन्न अखंड। नित्यता ब्रह्मांड त्याचे देहीं।। सोपान विदेही सर्वरूपी बिंबतु। हरिरूपीं रतु जीव शिव।।’’
अचलदादा – वा! काय स्थिती आहे..
बुवा – ‘‘सर्वकाळ ध्यान हरिरूपी ज्याचे। तया सर्व रूपाचे जवळी असे।।’’ हरि म्हणजे सद्गुरूच्या स्वरूपाचं ध्यान ज्याला अखंड आहे त्याला सर्वच रूपांआधी सद्गुरूचंच रूप दिसतं!
हृदयेंद्र – हे थोडं वेगळं वाटतं.. सर्व रूपांमध्ये सद्गुरू दिसतो, असं का नसावं?
बुवा – तुमची शंका रास्तच आहे, पण इथे ‘सर्व रूपाचे जवळी’ ही शब्दयोजना आहे ‘सर्व रूपामध्ये’ ही नव्हे! आणि थोडा विचार केला तर साधकासाठी हीच शब्दयोजना किती चपखल आहे, ते जाणवेल.. जीवनात प्रारब्धवशात प्रतिकूल विचारांच्या व्यक्तिंचा संग घडतोच.. कित्येकदा कुणी कुणी वाईट वागतो, बोलतो आणि त्यामागचं कारण काही कळत नाही. अशा वेळी साधनेनं आधीच हळव्या झालेल्या साधकाला अधिकच त्रास होतो.. पण सद्गुरूचं ध्यान जर सर्वकाळ होऊ लागलं तर दुसऱ्या व्यक्तिशी व्यवहार करतानाही सद्गुरूचं दर्शन कधीच दुरावणार नाही.. मग दुसऱ्याच्या प्रतिकूल वागण्या-बोलण्याची प्रतिक्रिया अंत:करणात उमटणार नाही.. हे ध्यान सर्वकाळ साधण्यासाठीचा मार्ग म्हणजे, ‘‘हरि हरि जाला प्रपंच अबोल। हरि मुखीं निवा तोचि धन्य।।’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अभंगधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta carol series
First published on: 18-12-2015 at 01:54 IST