19 September 2018

News Flash

२५२. मागणं..

ब्रह्मभावात स्थिर व्हायचं असेल, तर श्रीसद्गुरूंशिवाय तरणोपाय नाही, असं अचलानंद दादा म्हणाले.

ब्रह्मभावात स्थिर व्हायचं असेल, तर श्रीसद्गुरूंशिवाय तरणोपाय नाही, असं अचलानंद दादा म्हणाले. मग सर्वाकडे नजर टाकत आणि हृदयेंद्रवर दृष्टी स्थिरावून ते उद्गारले..
अचलदादा – या चराचरात अनंत रूपांत अनंत स्थानी श्रीसद्गुरू प्रकटले आहेत. ‘लोपले ज्ञान जगी। हित नेणती कोणी।।’ ही स्थिती जेव्हा जेव्हा उत्पन्न होते, तेव्हा तेव्हा या जगाला खऱ्या आत्महिताचं भान यावं, खरं आत्मज्ञान व्हावं म्हणून श्रीसद्गुरू प्रकटतात.. समग्र ईश्वरी शक्ती त्यांच्या ठायी वास करीत असूनही ते स्वत:ला त्या परमेश्वराचा दासच म्हणवतात..
कर्मेद्र – मग प्रत्येक धर्मातही असे श्रीसद्गुरू प्रकटले असतील..
अचलदादा – निश्चितच! कष्टाची, अवमानाची पर्वा न करता जिवाला शुद्ध ज्ञान देण्यासाठीची तळमळ आणि करूणा, हा त्यांचा प्रमुख विशेष आहे. प्रभू येशूच्या अवतारकाळातील शेवटचे दोन दिवस पहा.. धर्मद्रोहाच्या आरोपावरून आपल्याला अटक व्हावी, यासाठी आपलाच एक शिष्य उद्या आपला घात करणार आहे आणि एक शिष्य स्वत:च्या जिवाच्या भीतीनं आपल्याशी संबंध तोडणार आहे, हे जाणूनही येशूंनी त्यांचा त्याग केला नाही. उलट त्या रात्रीच्या अखेरच्या प्रवचनात मनुष्य जन्माला येऊन काय साधलं पाहिजे, याचा कळकळीनं उपदेश केला.. श्रीसद्गुरू स्वरूपाच्या कारूण्यभावाचं हे परमोच्च दर्शन आहे! श्रीसद्गुरूंचं अवघं जीवनच भगवंताचं स्मरण पुनस्र्थापित करण्यासाठी असतं.. (काही क्षण शांतता पसरली. मग थोडय़ा हळव्या स्वरांत दादा पुढे म्हणाले) बुवा, आता उद्या आपण घरोघरी परतणार.. पुन्हा सर्वजण एकत्र येऊ की नाही, अशा गप्पा रंगतील की नाही, माहीत नाही.. निदान आपल्यापुरती तरी या मधुर चर्चेची ही सांगता आहे.. ती तितक्याच अर्थमाधुर्यानं आपणच परिपूर्ण करू शकता.. (सर्वाच्या नजरा बुवांकडे वळल्या. बुवा भरल्या स्वरात म्हणाले..)
बुवा – श्रीसद्गुरूंच्या अवताराचा जो उद्देश अचलानंद तुम्ही शेवटी सांगितलात, तेच सूत्र पकडून मी तुकाराम महाराजांच्या शब्दांत श्रीसद्गुरूचरणी एक मागणं तेवढं मागतो.. (क्षणभर शांतता. बुवांचे डोळे मिटले आहेत. त्यातून अश्रू पाझरत आहेत तर मुखावाटे खडय़ा मधुर स्वरांत कळवळ्याचे शब्द.. बुवा गात आहेत..)
हेंचि दान देगा देवा। तुझा विसर न व्हावा।।
गुण गाईन आवडी। हेचि माझी सर्व जोडी।।
नलगे मुक्ति धन संपदा। संतसंग देई सदा।।
तुका म्हणे गर्भवासीं। सुखें घालावें आम्हांसी।।
त्या मधुर स्वरानं वातावरण कसं भारलं आहे.. हृदयेंद्रचं मन सद्गुरूप्रेमानं उचंबळत आहे.. अचलानंद दादांचे डोळेही पाझरत आहेत.. योगेंद्र मुग्ध झाला आहे, तर ज्ञानेंद्र स्तब्ध आहे.. बुवांचे डोळे अजून मिटलेलेच आहेत.. तशाच भावावस्थेत ते बोलू लागतात..
बुवा – हे सद्गुरो! तुझ्या अखंड स्मरणाचं दान मला दे.. ते लाभलं की तुझी आवड या तुच्छ जिवाच्या अंत:करणात उत्पन्न होईल.. मग तुझ्या गुणगानात मी रमू लागेन.. जन्माला येऊन खरं आत्मधन जोडू लागेन.. मला भौतिकाची धन संपदा नको.. ती मुक्तीही नको.. उलट तुझ्यापासून क्षणमात्रही विभक्त न होणाऱ्या भक्तांची संगत मला दे.. असा संतसंग लाभणार असेल तर खुशाल मला गर्भवास घडू दे.. अनंत जन्मं मृतवत् जगण्यात सरले, आता खरंखुरं चैतन्यमयतेनं जगता येत असेल तर अनंत जन्म जगायला मी आनंदानं तयार आहे..
आदिवासींच्या आरोग्य तपासण्या अखेर संपल्या आणि नर्मदेच्या तीराचं नयनरम्य दृश्य पहात डॉक्टर नरेंद्र राहुटीकडे परतू लागले.. त्या तृप्त शांततेनं ते सुखावले होते.. राहुटीत आले तेव्हा शहरातून आलेल्या आपल्या सेवकाला पाहून त्यांना आश्चर्य वाटलं.. ‘‘काय सहदेव? अचानक कसा आलास?’’ सहदेव अदबीनं म्हणाला, ‘‘मॅडमना काही गोष्टी पाठवायच्या होत्या.. त्या या बॅगेत आहेत.. आणि हो, सर तुम्हाला कुरिअरनं काही पत्रं आल्येत, तीही आणल्येत..’’ पत्रं? डॉक्टरसाहेबांना थोडं आश्चर्यच वाटलं.. मेलच्या जमान्यात पत्रं? सहदेव ती पत्रं ठेवून गेला.. डॉक्टरसाहेबांनी पहिलं पत्र उचललं.. आणि त्यांच्या चेहऱ्यावर सुखदाश्चर्याचे भाव पसरले.. मथुरेच्या प्रवासात भेटलेल्या मित्रांची ही अक्षरभेट होती!

HOT DEALS
  • Honor 7X 64 GB Blue
    ₹ 15399 MRP ₹ 16999 -9%
  • Apple iPhone 6 32 GB Space Grey
    ₹ 25799 MRP ₹ 30700 -16%
    ₹3750 Cashback

– चैतन्य प्रेम

First Published on December 25, 2015 1:29 am

Web Title: loksatta carol series 4
टॅग Carol Series