X

२५३. अक्षरभेट – १

डॉक्टर नरेंद्र यांनी उत्सुकतेनं लिफाफा फोडला आणि पत्र वाचायला सुरुवात केली.

डॉक्टर नरेंद्र यांनी उत्सुकतेनं लिफाफा फोडला आणि पत्र वाचायला सुरुवात केली. चौघा मित्रांनी एकत्रच पत्र लिहिलं होतं. सुरुवात ज्ञानेंद्रनं केली होती..

आदरणीय डॉक्टर नरेंद्र यांस,

सप्रेम नमस्कार.

खरं तर ई-मेलद्वारे संपर्क साधण्याची सवय इतकी झाल्ये की कधीकाळी आपण पत्र लिहित होतो, हे मी विसरूनही गेलो होतो. पण आपल्याला असं पत्र आम्हा सगळ्या मित्रांनी लिहावं, अशी हृदयेंद्रनं कल्पना मांडली आणि सगळेजण हो-ना करत राजीही झाले. असो. गेले वर्षभर आम्ही चौघेजण वेळ मिळेल तेव्हा भेटत होतो आणि एखादी मोहीम असल्याप्रमाणे बहुतांश वेळ अभंगांवरच बोलत होतो. मी अगदी बारकाईनं ही चर्चा ऐकत असे. त्याची कारणं दोन. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही सगळ्या मित्रांनी ठरवून पूर्वी कितीदा सहली काढल्या आहेत, चित्रपट पाहिले आहेत, अगदी पाटर्य़ाही केल्या आहेत. मग जर सगळ्यांनी मिळून त्या गोष्टी केल्या तर ही गोष्ट करायला काय हरकत आहे? फार तर काय होईल, वर्ष वाया जाईल! तर पहिलं कारण मित्रप्रेम. दुसरं कारण असं की, हृदयेंद्र किंवा त्याचे अचलानंद दादा किंवा बुवा जसे सद्गुरूप्रेमानं भारावून जाऊन विचार करतात किंवा विचार करणं सोडून देतात, तसं मी करू शकत नाही. त्यामुळे संतांच्या साहित्यातील भावप्रधानतेनं मी का कोण जाणे हेलावत नाही. मग मला वाटू लागलं की मराठी साहित्याच्या जडणघडणीत मोठं योगदान असलेल्या एका साहित्यप्रवाहापासून मी पूर्वग्रहामुळे दुरावलो आहे का? त्या साहित्याचं यथायोग्य आकलन होत नसल्यामुळे त्या साहित्याचा आस्वाद घेता येत नाही, असं तर होत नसेल? त्यामुळे आधी संतांना काय म्हणायचंय, हे त्यांच्यावर प्रेम असलेल्यांकडून जाणून घ्यावं, या हेतूनं मी या चर्चेत सहभागी झालो, हे दुसरं कारण. मला असं वाटतं की संतांना काय म्हणायचंय, हे सांगताना माझ्या मित्रांनी त्यात त्यांचं स्वत:चं म्हणणंही जरा जास्तच मिसळून टाकलं. तरी बरेचदा चर्चेच्या अनेक छटांतून माझ्या मनात अनेक विचारतरंग उमटले. त्यातून माझ्या तर्कप्रक्रियेलाही वेग आला. भगवंत आहेच, सद्गुरूंशिवाय तरणोपाय नाही, खरा परमानंद त्यांच्या शरणागतीत आहे; या गोष्टींची कणमात्र शंका असेल तर हे साहित्य वाचायचा तुम्हाला जणू अधिकारच नसतो. एक गोष्ट खरी की अशा शंका असतील तर ‘सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज’ हे कसं पटू शकेल? आणि ही गोष्ट ‘ज्ञानयोग’ सांगणाऱ्या गीतेतच आहे बरं का! पण तरीही अनेक गोष्टी न पटूनही मी अनेकदा विरोधी सूर जाणीवपूर्वक उमटू दिला नाही. कारण ही चर्चा सौहार्दानं आणि अनाग्रही भावानं व्हावी, असा एक अलिखित करार आमच्यात झाला होता. तरी माझ्या मनात जे विरोधी सूर उमटले ते मी त्या त्या दिवसाच्या माझ्या रोजनिशीत लिहून ठेवले आहेतच. माझ्या लिखाणाला त्याचाही उपयोग होईलसे वाटते. एक मात्र झालं. या गप्पांच्या निमित्तानं तुम्ही, बुवा आणि अचलानंद दादांसारख्यांशी मैत्र जुळलं. आमच्या दादासाहेबांचं, कुशाभाऊंचं, नानांचं एक वेगळं आनंददायी रूप दिसलं.. मुख्य म्हणजे अनेकदा माझ्या घरी या गप्पांच्या मैफली रंगल्या आणि त्यामुळे घर गजबजल्यानं प्रज्ञाही आनंदात होती. असो. शेवटी तर्क आणि शुद्ध विचारावर नात्यागोत्यांचं आणि भावुकतेचं पांघरूण पडतं, ते असं. असो! हृदयेंद्रनं बऱ्याच गप्पा ध्वनिमुद्रित करून ठेवल्या आहेत. तुम्हाला त्या पाठवताही येतील. तुम्ही इकडे याल तेव्हा जरूर घरी या. आम्हा सगळ्यांना तुम्हाला भेटायला आवडेल.. आणि हो, अभंगांपेक्षा दुसऱ्या गोष्टींवर गप्पाही होतील.

आपला,

ज्ञानेंद्र.

पत्रात पुढचा मजकूर योगेंद्रनं लिहिला होता. वर्षभराच्या चर्चेचा त्याच्या साधनेला झालेला उपयोग त्यानं मांडला होता. अर्थात या चर्चेनं आपल्यावर भावसंस्कार झाल्याचं त्यानं आवर्जून नमूद केलं होतं. या निमित्तानं अचलानंद दादा आणि बुवांसारख्यांची ओळख झाली, याचा आनंदही त्यानं मांडला होता आणि एकदा हृदयेंद्रबरोबर त्याच्या गुरुजींच्या गावी जाऊन यायची इच्छाही नोंदवली होती. पुढचं वर्ष योगसाधना अधिक नेमानं आणि नेटानं करण्याचा संकल्पही त्यानं पत्रात सोडला होता..

– चैतन्य प्रेम