23 April 2018

News Flash

२५६. अक्षर संगम..

या चार मित्रांची वाटचाल अद्याप सुरूच आहे. या अभंगधारेचा प्रवाह मात्र भावसागराला जाऊन मिळाला आहे..

या चार मित्रांची वाटचाल अद्याप सुरूच आहे. या अभंगधारेचा प्रवाह मात्र भावसागराला जाऊन मिळाला आहे.. या अक्षर संगमावर आपला निरोप घेताना अनेक गोष्टी मनात उमटत आहेत.. एकतर सदराचं हे व्यक्तरूप अगदी उत्स्फूर्त आणि मलाही चकीत करणारं होतं. ‘हृदयेंद्र’, ‘कर्मेद्र’, ‘योगेंद्र’ आणि ‘ज्ञानेंद्र’ ही नावंही अचानक समोर आली. त्यामागे एक विचार मात्र होता. या प्रत्येकाच्या नावात ‘इंद’्र आहे आणि तो इंद्रिय आधीनतेचं सूचन करतो. म्हणजेच हृदयेंद्र भक्तीमार्गावर असला तरी तो पूर्णत्वाला पोहोचलेला नाही. तोही इंद्रियांच्या आधीन आहे. योगेंद्र योगमार्गावर असला तरी तोही पूर्णत्वाला पोहोचलेला नाही. तोदेखील इंद्रियांच्या आधीन आहे. ज्ञानेंद्र हा ज्ञानमार्गानं जाणारा असला तरी तो पूर्णत्वाला पोहोचलेला नाही, इंद्रियांच्या आधीनच आहे. कर्मेद्र हा कर्ममार्गी असला तरी तो पूर्णत्वाला पोहोचलेला नाही. तोही इंद्रियांच्या आधीन आहे. थोडक्यात हे चौघंही एकेका मार्गाचं पूर्णत्वानं प्रतिनिधित्व करीत नाहीत. थोडा विचार केला तर जाणवेल, आपल्या प्रत्येकात हे चौघंजण आहेतच! आपण अध्यात्माच्या मार्गावर आल्यापासूनची वाटचाल आठवून पहा. कधी भाव जागा झाल्यासारखं वाटून आपण हळवं होतो, कधी योगाचं आकर्षण वाटतं, कधी ज्ञानाची ओढ असते तर कधी स्वकर्तृत्वावर विश्वास वाटून कर्तेपण नकळत आपल्याकडे घेतलं जातं. तरीही प्रत्येकात या चारपैकी एकाची प्रधानता असते आणि त्यानुसार तो अध्यात्माच्या मार्गावर वाटचाल करण्याचा प्रयत्न करीत असतो. या चारही मार्गानं जाताना एकच गोष्ट घडते. कुठच्याच मार्गानं परम सत्य काय ते गवसत नाही, हे उघड होतं! ‘पुढे पाहाता सर्वही कोंदलेसे’ अशी स्थिती उत्पन्न होते. मग मी इतका जप केला, मी इतका योगाभ्यास केला, इतका ज्ञानाभ्यास केला, इतकं कर्माचरण केलं तरीही सत्याचा साक्षात्कार का नाही, या विचारानं तळमळ निर्माण होते. या तळमळीनंच खरी वाट सापडते! खरी आंतरिक वाटचाल सुरू होते!! या मार्गाचा उपयोग आणि महत्त्व त्यामुळेच फार आहे.. या मार्गानं जाऊनच सद्गुरूंचं महत्त्व मनात बिंबू लागतं. मग आजवर भक्तीपंथावर असल्याचा आभास होता, तो ओसरतो आणि खरी भक्ती काय, ते उमगू लागतं. खरा योग कोणता, ते उमगू लागतं. खरं ज्ञान कोणतं ते उमगू लागतं. खरं कर्म कोणतं ते उमगू लागतं. आणि जोवर खरी साधना कोणती, हेच उमगत नाही तोवर आपल्या मनाजोगत्या साधनेनं खरा साक्षात्कारही घडत नाही. त्यामुळे खऱ्या साधनेबाबत ओढ प्रत्येकाच्या मनात उत्पन्न व्हावी, सद्गुरू महात्म्याचा संस्कार मनावर पुन्हा पुन्हा घडावा, या हेतूनं ‘अभंगधारा’ प्रवाहित झाली. प्रत्येक अभंगाचा अर्थ माझ्यासाठीही अगदी नव्यानं समोर आला. अनेकदा अर्थ उकलण्याच्या प्रक्रियेत अनेक तज्ज्ञांनीही आत्मीय मदत केली. डॉक्टर नरेंद्र यांचे सर्व संवाद एका अत्यंत प्रथितयश अशा वैद्यकीय तज्ज्ञानं बारकाईनं तपासले. दादासाहेबांच्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून आलेला ‘देवा तुझा मी सोनार’चा अर्थही सुवर्णकाराच्या कामात ऐन बालवयापासून वाकबगार असलेल्या आणि आता वेगळ्या क्षेत्रातही स्वत:चं स्थान निर्माण केलेल्या तज्ज्ञानं उलगडून दाखवला. सुवर्णकाराच्या हत्यारांची पेटीही त्यांनीच माझ्यासमोर उघडून प्रत्येक हत्याराचा नाजूक वापर समजावला. प्रत्येक अभंगाचा अर्थ हा माझ्यासाठीही भावसंस्कार करणारा होता. नामदेवांच्या मुलांच्या अभंगांनी तो खोलवर केलाच. ‘सगुणाची शेज निर्गुणाची बाज’ हा पू. बाबा बेलसरे यांचा अत्यंत आवडीचा अभंग. त्याच्या इतक्या अर्थछटा असतील, हे तो प्रथम वाचला तेव्हाही जाणवलं नव्हतं. मी जणू अचलानंद दादा, बुवा यांच्याकडे त्रयस्थाप्रमाणे पहात होतो आणि ते हा अर्थ सांगत गेले! एक सुहृद म्हणाला की, हे चार मित्र, हे अचलानंद आणि बुवा खरोखर कुठे असले तर मी त्यांना आनंदानं मिठी मारीन.. माझीही भावना वेगळी नाही! वर्षभर या वेगळ्या धाटणीच्या अक्षरसत्संगात आपण सहभागी झालात. मी आपला ऋणी आहे. हा अक्षरप्रवाह आता भावसागरात विलीन होत असताना त्यांचं अध्र्य ओंजळीत घेत ते याच भावसागराला अर्पण करीत आहे.. हा प्रवाहच असा विलक्षण आहे, ज्यात भलं-बुरं सारं काही मिसळून जातं आणि अखेरीस त्याचं एकच एक रूप उरतं.. अथांग.. अनंत.. (समाप्त)

– चैतन्य प्रेम

First Published on December 31, 2015 2:37 am

Web Title: loksatta carol series 6
टॅग Carol Series
 1. K
  kamalini
  Dec 31, 2015 at 10:34 am
  ह्या सुंदर सदराकरीता लोकसत्ता व श्री. चैतन्य प्रेम यांना खूप खूप धन्यवाद. मागील सर्व लेख पुस्तक रूपात प्रकाशित केल्यास आभारी होऊ. ह्या सदरातील पुढील लेखांची प्रतीक्षा करीत आहे.
  Reply
  1. M
   Mahesh
   Dec 31, 2015 at 4:35 am
   तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. हा असा प्रवास अखंड चालू राहुद्या. अश्या लेखामुळे अध्यात्मा च्या वाटेतील सर्व प्रकारच्या साधकांना निश्चितच फायदा होईल. आधी हरपले श्रेय आणि आता अभंरा हे दोन्ही लेख अति उत्कृष्ट होते. आता वाट पहात आहे पुढच्या विषयाची. पुनाश्च्य तुम्हाला धन्यवाद.
   Reply
   1. नागनाथ विठल
    Dec 31, 2015 at 12:51 pm
    अभंरा ह्या सदरातून अभंग म्हणजे कधीही न भंगणार . खरंच हा लेखन मालिकेतून ' सगुण आणि निर्गुण ' म्हणजे काय ? ह्याचे प्रत्यंतर आले . २५६ सदरातील भक्तिरस चाखून भक्तीचे चिंतन / मनन घडले हाच सगुण आणि आता सद्गुरुकृपेने आचरण घडावे, हाच निर्गुण नव्हे काय ? ‘हृदयेंद्र’, ‘कर्मेद्र’, ‘योगेंद्र’ आणि ‘ज्ञानेंद्र’ ही नावंही अचानक समोर आली. या प्रत्येकाच्या नावात ‘ इंद्र ' आहे आणि तो इंद्रिय आधीनतेचं सूचन करतो. विलक्षण सत्संग घडविलात. वारंवार धन्यवाद !!
    Reply
    1. N
     Ninad
     Jan 1, 2016 at 6:58 am
     समाप्त म्हणू नका ......... देत राहा ... !
     Reply
     1. S
      Suhas S.
      Jan 4, 2016 at 5:51 pm
      I am reading his articles for last 4 years. Articles are marvelous & presented with extreme clarity of thoughts. चैतन्य प्रेम यांचा परिचय दिल्यास आनंद होईल. असेच आपले लिखाण वाचत राहो .
      Reply
      1. S
       Suhas S.
       Jan 4, 2016 at 5:47 pm
       चैतन्य प्रेम यांचे लेख मी गेले ५ वर्ष वाचतो आहे. अत्यंत सुंदर व सोपे विवेचन. सर्वात महत्वाचे विचारांचा स्पष्टपणा मनाला भावतो. आपला परिचय दिल्यास आनंद होइल.
       Reply
       1. V
        Vinayak
        Jan 6, 2016 at 11:58 am
        अतिशय सोप्या शैलीतील,स्पष्ट आणि विषयाच्या मुळाशी जाऊन केलेले विवेचन वाचताना मोहून टाकत असे! विशेषतः गुरुकृपा आणि ईश्वरकृपा यांचे वर्णन वाचताना मन भरून येत असे! चैतन्य प्रेम यांचे आम्हा सारख्या भौतिक आणि परमार्थ मार्गावर चाचपडणार्या लोकांवर अनंत उपकार आहेत. हे सदर वेगवेगळ्या अंगांनी अध्यात्माचा वेध घेत सदैव सुरु ठेवावे हि प्रार्थना.
        Reply
        1. V
         Vinayak
         Jan 6, 2016 at 12:02 pm
         तसेच या सदरातील दरवर्षी प्रसिद्ध झालेले सर्व लेख पुस्तक रुपात प्रसिद्द करावे या इतर वाचकांनी सुचवलेल्या कल्पनेचाहि विचार व्हावा हि प्रार्थना. ||श्रीराम जयराम जय जय राम||
         Reply
         1. Load More Comments