कांडोळां देखतिये क्षणीं। सुवर्ण सुवर्णी। नाटितां होय आटणी। अळंकाराचीही।। अचलानंद दादांनी ही ओवी पुन्हा म्हटली तेव्हा मधुसेवनात गुंग झालेल्या भृंगाप्रमाणे या रूपकाच्या आस्वादात सर्वाचीच मनं दंग झाली होती..
अचलदादा – खरंच आहे.. सामान्य माणसाच्या मनावर जगाचं दृश्यरूपच प्रभाव टाकतं.. त्या प्रभावानुसारच्या प्रतिक्रिया त्याच्या मनात उमटतात आणि त्या प्रतिक्रियांनुरूप क्रिया त्याच्याकडून होतात.. ज्याला या जगाच्या मूळ आधाराचं, त्या आत्मशक्तीचंच दर्शन होतं त्याची अवस्था कशी होते? चोखोबा सांगतात त्याप्रमाणे! डोळ्याचा देखणा पाहिला डोळा। आपोआप तेथें झांकला डोळा।। चोखा म्हणे नवलाव झाला। देखणा पाहतां डोळा विराला।। आधी डोळा झाकला जातो आणि मग डोळाच विरून जातो!!
हृदयेंद्र – अगदी वेगळं काहीतरी जाणवतंय, पण उमगत नाही.. शब्दांत सांगता येत नाही..
बुवा – माउलींच्याच त्या ओवीचा पुन्हा आधार घेऊ.. अलंकाराच्या दृश्यरूपापेक्षा त्याच्या अस्सलतेचा प्रभाव सुवर्णकाराच्या मनावर पडतो.. त्यामुळे नक्षीकाम कितीही अप्रतिम असलं, पण तो दागिना सोन्याचा नसला तर सुवर्णकाराच्या दृष्टीनं त्याला मोलच नसतं! ज्याला सोन्याची जाणीव नाही तो मात्र त्या नक्षीकामात अडकू शकतो.. बक्कळ रोकड देऊन तो दागिना खरिदतोही आणि मग तो काळा पडायला लागला की रडतो! तसे जगाच्या दृश्यरूपात जो अडकतो तो अपेक्षाभंगानं रडतोच!! ज्याला या ‘डोळियाचा देखणा’ पाहणं साधतं त्याच्या मनातली जग पाहण्याची ओढच खुंटते.. डोळ्याचा देखणा पाहिला डोळा। आपोआप तेथें झांकला डोळा।। जगाकडे लागलेले डोळे आपोआप मिटतात.. आत वळतात.. अंतर्दर्शनात मग्न होतात.. आणि मग जगाची ओढच विरून जाते.. चोखा म्हणे नवलाव झाला। देखणा पाहतां डोळा विराला।। इथे डोळा हे एक प्रतीक मात्र आहे.. प्रत्येक ज्ञानेंद्रियाची बाह्य़ातली जी ओढ आहे तीच संपते, हा याचा अर्थ आहे.. डोळे पाहण्यात गुंततात, कान ऐकण्यात गुंततात, मुख बोलण्यात गुंंततं, घ्राणेंद्रियं हुंगण्यात गुंततात, रसना रसास्वादात गुंतते.. डोळ्यांनी अशाश्वताचंच दर्शन, कानांनी अशाश्वताचंच श्रवण, मुखानं अशाश्वताचीच चर्चा, नाकानं अशाश्वत गंधाचाच मोह आणि अशाश्वत पदार्थाच्याच आहारात रसना गुंतलेली.. सदोदित सर्वच इंद्रियांद्वारे अशाश्वताचाच आहार सुरू असेल तर शाश्वताची ओढ लागणार कशी? तेव्हा सद्गुरूंच्या आज्ञेनुसार ज्याचं जीवन घडू लागतं त्यालाच जगाचं खरं रूप जाणवतं, त्या जगातलं अडकणं संपतं.. चोखा म्हणे नवलाव झाला। देखणा पाहतां डोळा विराला।।
अचलदादा – हृदय, गुरुजींनी मनाच्या श्लोकांचा अर्थ सांगितलेला आठवतो का?
हृदयेंद्र – (अत्यानंदानं) हो हो.. प्रभाते मनी राम चिंतीत जावा। पुढे वैखरी राम आधी वदावा। सदाचार हा थोर सांडू नये तो। जनी तोचि तो मानवी धन्य होतो।।
बुवा – (कुतूहलानं) काय बरं अर्थ सांगितला गुरुजींनी?
अचलदादा – (हृदयेंद्रच्या नजरेत अनुमती मागण्याचे भाव पाहून) सांगा.. तुम्हीच सांगा..
हृदयेंद्र – प्रभात म्हणजे आध्यात्मिक वाटचालीचा प्रारंभ. कामनांच्या चिंतनात सदोदित अडकलेला जीव ही वाटचाल सुरू करतो तेव्हाही चिंतन कामनांचंच चालतं. त्यासाठी रामचिंतनाकडे मन वळवायला सांगितलं आहे. जसजसं हे चिंतन वाढू लागेल तसतसा हा भाव रुजवायला सांगितलं आहे की, ‘पुढे वैखरी राम आधी वदावा’.. वैखरी म्हणजे व्यक्त तर हे जे माझ्या डोळ्यांपुढे व्यक्त जग आहे त्याचा आधी म्हणजे पाया रामच आहे, हे जाणावं.. हाच श्रेष्ठ सदाचार आहे.. तो जो कधीच सोडत नाही तोच जनी म्हणजे संतसज्जनांमध्ये आणि मानवी म्हणजे लोकांमध्ये धन्य होतो!
बुवा – वा.. फार छान..
अचलदादा – जसा या व्यक्त जगाचा पाया राम आहे, हे क्षणोक्षणी पाहायला सांगितलं आहे तसाच डोळियांचा देखणा पाहता डोळा.. काय होईल? तर आपोआप तेथें झांकला डोळा।। चोखा म्हणे नवलाव झाला। देखणा पाहतां डोळा विराला।। आधी बहिर्मुख वृत्तीचा डोळा झाकला जाईल आणि नंतर पाहण्याची ओढच विरून जाईल..
चैतन्य प्रेम