सत, रज आणि तम अशा त्रिगुणात्मक जगाच्या प्रभावातून मनाला सोडवतो, तो मंत्र! जर त्रिगुणापैकी कोणत्या ना कोणत्या गुणाची प्रधानता मनात असताना मी कितीही तीर्थयात्रा केल्या, कितीही दानधर्म केला, कितीही जपजाप्य केलं, कितीही पूजाअर्चा केल्या तरी काही उपयोग नाही! मन त्रिगुणाच्या विळख्यात अधिकाधिक रुततच जाणार.. बुवा आणि अचलानंद दादांच्या या विचारांनी हृदयेंद्र आणि योगेंद्रचं मन वेगळ्याच पातळीवर जणू पोहोचलं होतं.. चोखामेळा महाराज यांच्या अभंगाचे पहिले दोन चरण त्याच भावावस्थेत हृदयेंद्रनं पुन्हा एकवार म्हटले..
हृदयेंद्र – भेदाभेद कर्म न कळे त्याचें वर्म। वाउगाचि श्रम वाहतां जगीं।। नामापरता मंत्र नाहीं त्रिभुवनी। पाप ताप नयनीं न पडेचि।। हे त्रिभुवन म्हणजे तिन्ही गुण जिथे नांदत आहेत, असं घर म्हणजे अंत:करणच आहे! या अंत:करणात नाम जसजसं खोल जाईल तसतसं त्या मंत्राच्या प्रभावानं पाप आणि ताप नष्ट होत जाईल!
अचलदादा – पण त्यासाठी आधी नामाचं खरं व्यापकत्व जाणलं पाहिजे.. नाम खोलं जाणं म्हणजे काय? अजपाजप म्हणजे काय? सदोदित चालणारं नाम म्हणजे काय? काहीजण समजतात सदोदित मनात नाम घेत राहाणं म्हणजे नाम खोल जाणं.. काहीजण हातातली माळही सोडत नाहीत.. पण प्रसंग उद्भवताच मनात सुख-दु:खात्मक प्रतिक्रिया उमटत असेल तर हातातून माळ कधीच सुटत नाही, या म्हणण्याला काय अर्थ आहे? माउलींनी काय म्हटलंय? ‘जपमाळ अंतरी’! अंतरात, अंत:करणात खरी जपमाळ फिरली पाहिजे.. नुसती बोटांत फिरून काय उपयोग?
हृदयेंद्र – मग नाम खोल गेलं हे कसं ओळखावं?
अचलदादा – त्रिगुणांच्या प्रभावातून मनाला सोडवतं ते नाम ना? (हृदयेंद्र होकार भरतो) मग किती सोपं आहे? आपलं मन बाह्य़ परिस्थितीत, माणसांमध्ये, वस्तूंमध्ये का अडकतं? त्रिगुणांच्या प्रभावामुळेच ना? (हृदयेंद्र पुन्हा होकारार्थी मान हलवतो) मग नाम खोल जात असेल तर हा प्रभाव कमी झालाच पाहिजे! बाह्य़ परिस्थिती, व्यक्ती वा वस्तूंमध्ये भावनिकदृष्टय़ा, मानसिकदृष्टय़ा अवलंबणं संपलं पाहिजे.. जोवर दुसऱ्या कुणाचा आधार वाटतो, तोवर नामाचा खरा आधार पकडलेलाच नाही..
कर्मेद्र – पण आजारी पडलो तर डॉक्टरचाच आधार घ्यावा लागणार ना? कुणी खटला भरला तर वकिलाचाच आधार घ्यावा लागणार ना? घरात नुसतं नाम घेत बसलं तर ते लक्षात घेऊन न्यायाधीश काही माझ्या बाजूनं निकाल देणार नाही..
अचलदादा – (हसत) अगदी बरोबर! नाम खोल गेलं म्हणजे अवलंबणं संपलं पाहिजे, असं मी म्हटलं. व्यवहार सुटला पाहिजे किंवा सुटतो, असं म्हटलं का? हे शरीर आहे तोवर जगात वावरणं आलंच, या शरीराला जगवण्यासाठी उपजीविकेचं साधन शोधणं आलंच, या शरीराच्या निमित्तानं ज्यांच्या ज्यांच्याशी संबंध येतो, त्यांच्याबाबतची कर्तव्यं पार पाडणं आलंच.. व्यवहाराचे मार्ग ठरलेले आहेत आणि त्या मार्गानंच उपाय केले पाहिजेत, पण मुद्दा आहे तो मनानं अवलंबण्याचा.. व्यवहारातील समस्यांना तोंड देताना मन जर निर्भय राहील तर ते केवळ एका नामानंच राहील.. (ज्ञानेंद्र आणि योगेंद्रकडे पाहात) उपासनेनंच राहील, नित्य साधनाभ्यासानंच राहील.. आणि लक्षात ठेवा, निर्भय-निश्चल मनच व्यवहारालाही धीरानं तोंड देऊ शकतं! माउलींच्या शब्दांत सांगायचं तर देह ‘वरचीलिकडे’ म्हणजे व्यवहारात धावेलही, पण मनाची ‘बैसका’ म्हणजे बैठक मोडणार नाही!
हृदयेंद्र – गोंदवलेकर महाराजांनी जात्याची उपमा वापरली आहे. जात्याचा खालचा दगड स्थिर असतो आणि वरचा फिरत असतो म्हणूनच धान्य दळलं जातं. तो वरचा दगड फिरवणारा खुंटा नामाचाच पाहिजे!
अचलदादा – तर नाम मनाला ही स्थिरता शिकवतं.. माणूस हा भावनाशील प्राणी आहे, त्यामुळे सदोदित तो भावनिकदृष्टय़ा सुरक्षित राहण्याचीच धडपड करतो.. त्यासाठी तो इतर माणसांवर अवलंबून राहातो, परिस्थितीवर अवलंबून राहातो, सुखदायक भासणाऱ्या वस्तूंवर अवलंबून राहातो.. हे अवलंबणं मानसिकच अधिक असतं.. जर तो केवळ साधनाभ्यासावरच अवलंबून राहू लागला तर त्याला जाणवेल, जो खरा शाश्वत परम आधार आहे तो बाहेर कुठेच नाही! त्रिभुवनातही नाही!! तो आतच आहे!!
चैतन्य प्रेम