पंचायतन पूजेमागचा विराट विचार बुवांनी मांडला आणि मग ते म्हणाले..
बुवा – पण पंचायतन पूजा ही साधनेची इतिश्री नव्हे! ती साधनेची सुरुवात आहे.. सर्व साधनेचा लय सद्गुरूमयतेतच झाला पाहिजे.. गुरुगीताही सांगते की, या पाच उपास्य देवताही निर्गुण ब्रह्माचेच भेद आहेत.. मग शिवजी सांगतात, ‘‘निर्गुणोऽपि निराकारो व्यापक: स परात्पर:। साधकानांहि कल्याणं विधातु वसुधातले।।’’ शिवजी म्हणताहेत, हा परमात्मा निर्गुण, निराकार, व्यापक आहे.. तो साधकांच्या कल्याणासाठी हे आदिमाये तुझ्या सहाय्यानं सृष्टीत सगुणरूपानं अवतरतो.. मग म्हणतात, ‘‘यत्शरीरम् आश्रित्य भगवान् सर्वशक्तिमान्। वतीर्णो विविधा लीला विधाय वसुधातले।।’’ तो सर्वशक्तिमान भगवंत ज्या ज्या दिव्य शरारींच्या आधारे अवतरित होतो आणि अनंत लीला करतो त्या रूपांना लीलाविग्रह म्हणतात! हा लीलाविग्रह म्हणजे सद्गुरूच आहे! त्या लीलाविग्रहांच्या उपासनेलाही सगुणोपासनाच म्हणतात, असं शिवजी सांगतात..
योगेंद्र – सद्गुरूंची उपासना ही सगुणोपासना कशी?
हृदयेंद्र – कारण दिव्य असला तरी सद्गुरू हा आकारातच प्रकटला आहे.. तो सगुणातच आला आहे.. पण तरीही तो सगुणातीत आणि निर्गुणातीतही आहे.. सगुणाची शेज निर्गुणाची बाज। सांवळी विराजे कृष्णमूर्ति।। या ओवीत हेच तात्पर्य सांगितलं आहे..
अचलदादा – गंमत अशी की सगुण मूर्तीपूजा असो की सगुण सद्गुरू असो.. मुख्य आव्हान असतं ते मनाची घडी मोडण्याचं! मनाला वळण लावण्याचं.. मन हे अकरावं इंद्रिय म्हणतात ना? कारण सर्वच ज्ञानेंद्रियं आणि कर्मेद्रियांना मन आपल्या तालावर नाचवत असतं.. या इंद्रियांच्या प्रभावातून कसं सुटायचं, हा कूट प्रश्न साधकासमोर असतो.. विनोबा तर म्हणतात की सगुणोपासक असो की निर्गुणोपासक असो, दोघांसमोर इंद्रियप्रभावाचं आव्हान असतं आणि त्यावर मात करण्याचा दोघं प्रयत्न करीत असतात.. ज्ञानेंद्रजी तुमच्याकडे विनोबांची ‘गीता प्रवचने’ आहेत का?
ज्ञानेंद्र – हो असतील ना.. थांबा हं.. (तोच खोलीत आलेल्या प्रज्ञाकडे पाहात) प्रज्ञा ‘गीता प्रवचनं’ आहेत ना? जरा आणशील? (प्रज्ञा होकार भरत जाते.)
अचलदादा – विनोबांची भाषा आणि विषयमांडणी अगदी सोपी आणि थेट भिडणारी.. सगुण आणि निर्गुण या गोष्टींचा त्यांनी बराच ऊहापोह केला आहे.. (तोच चहाही येतो आणि पाठोपाठ पुस्तकही! पुस्तक चाळत दादा एका पानावर थांबतात..) खूप तपशिलात मागोवा घेतलाय विनोबांनी.. काही भाग वाचू.. ऐका.. विनोबा म्हणतात, ‘‘सगुण भक्तियोगात प्रत्यक्ष इंद्रियांना राबवता येतं. इंद्रियं साधनं आहेत, विघ्नं आहेत किंवा उभयरूप आहेत’’ म्हणजे दोन्हीही बरं का, तर.. ‘‘ती मारणारी आहेत वा तारणारी आहेत, हे पाहणाऱ्याच्या दृष्टीवर अवलंबून आहे.’’ पुढे विनोबा एक उदाहरण देतात. आईच्या भेटीसाठी तळमळत असलेला मुलगा तिला भेटायला म्हणून निघाला आहे. वाटेत पंधरा मैलांची खडबडीत पायवाट आहे. एखाद्या मुलाला तो रस्ता शत्रुवत वाटेल! पण शत्रू मानून तो बसून राहील तर रस्ता त्याला जिंकेल! तो झरझर चालेल तरच या ‘दुष्मन’ रस्त्याला जिंकेल! दुसरा मनुष्य म्हणेल, बरं झालं निदान हा रस्ता तरी आहे, नाहीतर या जंगलातून कसा गेलो असतो? तो रस्त्याला मित्र मानेल.. तेव्हा परमात्मरूपी आईकडे जाणाऱ्या साधकाला इंद्रियं ही शत्रुवत किंवा मित्रवत वाटू शकतात, पण तरी त्याला साधनपथावर चालावंच लागतं! ही इंद्रियं सगुण भक्त कशी उपयोगात आणतो हे स्पष्ट करताना ते सांगतात, ‘‘सगुण उपासकाला इंद्रियं साधनरूप आहेत. इंद्रियं ही फुलं आहेत. ती परमात्म्याला वाहावयाची आहेत..’’
हृदयेंद्र – वा! फार सुरेख!!
अचलदादा – इंद्रियांची ही फुलं परमात्म्याला भक्त कशी वाहातो? विनोबा म्हणतात.. ‘‘डोळ्यांनी हरिरूप पहावे. कानांनी हरिकथा ऐकावी. जिभेनं नाम उच्चारावं. पायांनी तीर्थयात्रा कराव्यात. हातांनी सेवा करावी. अशा तऱ्हेनं तो सर्व इंद्रियं परमेश्वराला वाहतो. ती इंद्रियं भोगासाठी राहत नाहीत. फुले देवाला वाहावयाची असतात. फुलांच्या माळा स्वत:च्या गळ्यात घालावयाच्या नसतात. त्याचप्रमाणे इंद्रियांचा उपयोग ईश्वराच्या सेवेत करावयाचा. ही झाली सगुणोपासकाची दृष्टी. निर्गुणोपासकाला मात्र इंद्रियं विघ्नरूप वाटतात.’’
चैतन्य प्रेम