28 May 2020

News Flash

२३१. पंचायतन

क्षर आणि अक्षर हे दोन्ही या सृष्टीच्या कक्षेतही आहेत..

क्षर आणि अक्षर हे दोन्ही या सृष्टीच्या कक्षेतही आहेत.. त्याच्या अतीत असल्यानं परमात्मा उत्तम पुरुष आहे, हे खरं.. पण सगुणाप्रमाणेच निर्गुणही या सृष्टीच्या कक्षेत कसं? निर्गुण अर्थात निराकार हे सृष्टीपलीकडे नाही का, हा हृदयेंद्रचा प्रश्न महत्त्वाचा होता. अचलानंद दादा त्यावर म्हणाले..
अचलदादा – बुवांनीही ही सांगड फार नाजूक आहे, हे म्हटलंच होतं.. आता असा विचार करा.. सगुण भक्तीचा उगम कशात आहे? तर ‘दृश्या’वर माणसाचा विश्वास आहे, ‘दृश्या’चा माणसाला आधार वाटतो.. ज्याला आकार आहे तेच दिसतं ना? तर वस्तु म्हणा, व्यक्ती म्हणा.. यांना आकार आहे.. त्या आकारात आपण आसक्त किंवा अनासक्त आहोत. त्या आकाराचं आपल्याला प्रेम किंवा घृणा आहे. त्या आकाराची आवड वा नावड आहे. श्रीगुरुजी काय सांगतात? आपण शरीरावरच प्रेम करतो आणि शरीराचाच द्वेष करतो.. शरीराला बघूनच आपण आनंदी किंवा दु:खी होतो.. शरीराला शरीराचीच ओढ असते.. तसं आपल्याला आकाराचंच प्रेम आहे.. हे सर्व आकार नष्ट होणारे आहेत.. पण त्यात गुंतणारं जे मन आहे त्या मनाचं वासनाबीज नष्ट होणारं नाही.. म्हणून या मनालाच आकारासक्तीच्या पकडीतून सोडविलं पाहिजे.. आकारांच्या या गुंत्यातून या जिवाला सोडवायचं कसं? यासाठी परमेश्वराचा म्हणून एक दिव्य आकार आला.. त्यातूनच सगुणोपासना आली..
बुवा – श्रीगुरूगीतेच्या काही पाठांत श्लोक आहेत.. त्यात सगुणोपासना आणि निर्गुणोपासना हे उपासनेचे दोन भेद सांगितले आहेत. केवळ मोक्षप्राप्तीसाठी तळमळणाऱ्या मुमुक्षूंच्या मते मात्र हे भेद तीन आहेत, असं भगवान शंकर पार्वतीमातेला सांगत आहेत. हे भेद कोणते? शिवजी सांगतात, ‘‘पंचानामपि देवानां ब्रह्मणो निर्गुणस्य च। लीलाविग्रह रूपाणाम्!’’ सगुण पंचोपासना, निर्गुण उपासना आणि लीलाविग्रहाची उपासना हे ते तीन भेद आहेत!
हृदयेंद्र – विषय निघाला म्हणून विचारतो.. बुवा सगुणोपासनेत पंचायतनच का असावं? त्यामागे काही हेतू आहे का?
अचलदादा – पंचायतनं पण वेगवेगळी आहेत बघा.. रामपंचायतन, शिवपंचायतन, गणेशपंचायतन.. देवतांच्या श्रेष्ठत्वावरून लोकांमध्ये पूर्वी मोठे झगडे चालत..
ज्ञानेंद्र – म्हणजे आकारासक्तीतून सोडविण्यासाठी म्हणून हे दिव्य आकार आले आणि त्यांच्यामुळे आकारासक्तीबरोबरच द्वेष, हिंसाचारही वाढला! ज्ञानाची खरी कास नसली की असंच व्हायचं..
अचलदादा – पण ज्ञान्यांमध्येही झगडे कधी झाले नाहीत का? असूया, मत्सरातून संघर्षरत होणं ही माणसाची प्रवृत्तीच आहे.. पण त्यावर उपाय तर शोधला पाहिजे.. त्यासाठी ही पंचायतनाची कल्पना आली.. शंकराचार्यानी तिचा हिरिरीनं प्रसार केला.. यामुळे काय झालं की ज्या देवतेला माणूस श्रेष्ठ मानत होता, तिला अग्रक्रम देऊन तिच्यासोबत अन्य चार देवतांनाही तो पुजू लागला..
ज्ञानेंद्र – म्हणजे परत एका आकारातून अनेक आकारांत जाणं झालंच.. त्या दिव्य आकारांतही श्रेष्ठता, कनिष्ठता आलीच..
अचलदादा – पण त्यामुळे भ्रामक संघर्षही तर आटोक्यात आला!
बुवा – या सगुण उपासनेसाठी पंचायतनच का, हेसुद्धा लक्षात घ्या! पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियं याद्वारे माणूस प्रपंचात अडकला आहे ना? त्यातून त्याला सोडविण्यासाठीच ही पंचायतन पूजा आली! प्राचीन काळापासून प्रमुख पाच देवतांचं पंचायतन आहे.. विष्णु, सूर्य, अंबा, गणेश आणि शंकर हे ते पंचायतन आहे.. विष्णु हा भौतिक विकासाचं प्रतीक आहे, गणेश हा सद्बुद्धीचं, अंबा ही शक्तीचं, सूर्य हा तेजाचं तर शिव हा आत्मज्ञानमयतेचं प्रतीक आहे. भौतिक प्रभावात अडकलेल्या साधकाला आत्मज्ञानापर्यंत नेणारं असं पंचायतन आहे.. भौतिक विकास तर करावा, पण त्याला सद्बुद्धीचा पाया असावा. त्यातून निव्वळ ऐहिक आणि देहाची शक्ती वाढू नये तर आत्मशक्तीही वाढावी. त्यासाठी ज्ञानसूर्य हृदयात प्रकटावा. त्या तेजानं अज्ञान जळून जावं आणि आत्मज्ञानमयतेनं जीवन भरून जावं.. ही खरी पंचायतन पूजा आहे!
चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2015 1:21 am

Web Title: panchayatan true worship
टॅग God
Next Stories
1 २३०. क्षर-अक्षर-उत्तम
2 २२९. वैकुंठ सावळा..
3 २२८. हरी अनंत..
Just Now!
X