X

२३३. इंद्रिय-वळण : २

इंद्रियांचा उपयोग ईश्वराच्या सेवेत करावयाचा. ही झाली सगुणोपासकाची दृष्टी.

इंद्रियांचा उपयोग ईश्वराच्या सेवेत करावयाचा. ही झाली सगुणोपासकाची दृष्टी. निर्गुणोपासकाला मात्र इंद्रियं विघ्नरूप वाटतात, असं विनोबांच्या ‘गीता प्रवचने’तलं मत अचलानंद दादांनी उद्धृत केलं, त्यावर अस्वस्थ चित्तानं योगेंद्र म्हणाला..

योगेंद्र – असं का म्हणावं? कोणत्या निर्गुणोपासकानं असं सांगितलंय? इंद्रियांचं आव्हान प्रत्येक साधकासमोर असतं. मग तो कोणत्याही मार्गाचा असो..

अचलदादा – त्याच अनुषंगानं विनोबा पुढे सांगताहेत ते ऐका.. ते म्हणतात, ‘‘निर्गुणोपासकाला इंद्रियं विघ्नरूप वाटतात. तो त्यांना संयमात ठेवतो, कोंडतो. इंद्रियांचा आहार तोडतो. इंद्रियांवर पहारा ठेवतो. सगुणोपासकाला असे करावे लागत नाही. तो सर्व इंद्रियं हरिचरणीं अर्पण करतो. दोन्ही तऱ्हा इंद्रियनिग्रहाच्याच. इंद्रियदमनाचे हे दोन्ही प्रकार आहेत. काहीही माना, परंतु इंद्रियांना ताब्यात ठेवा. ध्येय एकच. त्यांना विषयात भटकू द्यायचे नाही. एक तऱ्हा सुलभ तर दुसरी कठीण.’’

योगेंद्र – एकदा सगुणोपासना सोपी आणि निर्गुणोपासना कठीण, असा पवित्रा घेतला तर सर्व मांडणी त्याच अनुषंगानं होणार.. माझ्या मते साधनेत काहीच सोपं वा कठीण नाही.. जे सोपं वाटतं त्यात आव्हानं भरपूर येऊ शकतात आणि जे कठीण वाटतं ते सोपंही होऊ शकतं.. तळमळ आणि प्रयत्नांची चिकाटी यावरच सारं काही अवलंबून आहे..

बुवा – बरोबर.. पण मी काय म्हणतो.. साधना मार्गावर मन, बुद्धीनुसार माणसाला सगुण किंवा निर्गुणभक्ती जवळची वाटते.. त्यातली एक रीत तो निवडतो.. तरी दोघं इंद्रियांच्या कक्षेत असतातच ना? इंद्रिय प्रभाव रोखायचा प्रयत्न ते आपापल्या परीनं करतातच ना? आणि तो प्रभाव ओसरल्याशिवाय खरी भक्ती, मग ती सगुण असो वा निर्गुण, ती साधू शकते का?

हृदयेंद्र – भक्तीच कशाला? संशोधकालाही जी चिकाटी लागते त्यासाठी त्यालाही देहतादात्म्य विसरावंच लागतं. थोडक्यात इंद्रियांच्या प्रभावाच्या पकडीतून सुटावंच लागतं..

बुवा – आणि त्यासाठीचाच बोध ‘‘सगुणाची शेज निर्गुणाची बाज। सांवळी विराजे कृष्णमूर्ति।।’’ यापुढच्या ओवीत आहे.. ‘‘मन गेलें ध्यानीं कृष्णचि नयनीं। नित्यता पर्वणी कृष्णसुख।।’’ या इंद्रियप्रभावांवर कसा ताबा मिळवायचा आणि या इंद्रियांना ध्येयानुकूल कसं वळवायचं, याचा हा बोधच आहे..

कर्मेद्र – पण यात मन आणि डोळे या दोनच गोष्टींचा उल्लेख आहे.. सर्वच इंद्रियांचा कुठाय?

बुवा – अगदी छान! दृश्याचा अमीट प्रभाव असलेल्या माणसाच्या जीवनात ‘डोळ्यां’ना फार महत्त्व आहे.. हे डोळे म्हणजे नुसती ही काचेची बुबुळं नव्हेत! मनाचेही डोळे असतात, भावनेचेही डोळे असतात, बुद्धीचेही डोळे असतात.. या ‘डोळ्यां’नी माणूस जे पाहतो ना, त्यानुसार तो विचार करतो, कल्पना करतो, भावना करतो.. आणि मन? ते तर सर्वच स्थूल आणि सूक्ष्म इंद्रियांना व्यापून आहे.. या मनाला ‘‘मन गेलें ध्यानीं’’ म्हणजे ध्यानाचं वळण लावायचं आहे आणि या ‘डोळ्यां’ना ‘‘कृष्णचि नयनीं’’ कृष्णमयतेचं वळण लावायचं आहे.. बरं मन सदोदित ध्यानमग्न असतंच बरं का! अगदी माणूस सहज बोलतो.. ‘‘माझ्या ध्यानीमनीही नव्हतं हो!’’

हृदयेंद्र – (हसत) खरंच..

बुवा – आणि मनाचं जे ध्यान सदोदित सुरू आहे ना? ते प्रपंचाचं ध्यान आहे.. भौतिकाचं ध्यान आहे.. आध्यात्मिक ध्यानानं अवधान येतं तर देहबुद्धीनं सुरू असलेल्या या ध्यानानं अनवधानानं जगणं अधिक घट्ट होत जातं.. ‘एकनाथी भागवता’त भगवंत तर सांगतात, ‘‘मजवेगळें जें जें ध्यान। तेंचि जीवासी दृढबंधन। यालागीं सांडोनि विषयाचें ध्यान। माझें चिंतन करावें।।’’ भगवंतावाचून ज्या ज्या गोष्टींची आवड आहे, ओढ आहे त्या त्या गोष्टींचं ध्यान मनात सतत सुरू असतं.. मग ते वाहनाचं असेल, बंगल्याचं असेल, भौतिक यशाचं असेल, मानमरातबाचं असेल.. पण हे जे भगवंतावाचूनचं ध्यान आहे ना तेच जिवासाठी दृढ बंधन होतं.. कारण ज्या गोष्टीची ओढ आहे ती प्रत्यक्षात यावीशी वाटते.. मग ती योग्य की अयोग्य, याचा विचार केला जात नाही.. त्याच्या पूर्तीसाठी माणूस अनंत अज्ञानजन्य कर्माच्या पसाऱ्यात गुंतून जातो आणि बंधनानं कायमचा बांधला जातो.. अर्थात भगवंताचं ध्यान एकदम साधणं काही सोपं नाही!

चैतन्य प्रेम

  • Tags: god, sense,