X

२५४. अक्षरभेट – २

ज्ञानेंद्र आणि योगेंद्र या दोघांचा मजकूर वाचून झाल्यावर डॉक्टर नरेंद्र अंमळ थांबले.

ज्ञानेंद्र आणि योगेंद्र या दोघांचा मजकूर वाचून झाल्यावर डॉक्टर नरेंद्र अंमळ थांबले. आता राहुटीच्या बाहेर येऊन एका विशाल वृक्षाखाली वेताच्या खुर्चीत ते विसावले. तोच सेवारामनं त्यांच्या आवडीचा लेमन टी आणला. त्याचा घुटका घेत आणि चष्मा नीटनेटका करीत डॉक्टरांनी पत्राचा पुढचा भाग वाचायला सुरुवात केली. हृदयेंद्र लिहित होता..

आदरणीय डॉक्टर नरेंद्र यांस,

सप्रेम नमस्कार.

कदाचित आम्ही असं पत्रं तुम्हाला का लिहीत आहोत, या विचारानं तुम्ही त्रासलेही असाल. तुमच्या अनंत कामांच्या व्यापातून हे पत्र वाचायला तुम्हाला वेळ मिळेल, असंही नाही. तरीही हे पत्र तुमच्या आणि आमच्या प्रारब्धाचा भागच असावा! पण खरंच, मथुरेत तुमची भेट होईल, असं कल्पनेतही नव्हतं. तुमच्या ओळखीमुळे ‘पैल तो गे काऊ’ची विलक्षण वेगळी अर्थछटा उकलायला मदत झाली. अगदी खरं सांगायचं तर जसजसा मी अध्यात्माच्या मार्गात खोलवर जात होतो तसतसा मी माझ्या मित्रांपासून दुरावतही होतो. या गप्पांच्या निमित्तानं आम्ही परत एकदा पूर्वीसारखे एकत्र आलो. एकमेकांशी नव्यानं नातं जुळलं. तसं पाहाता माझे तिन्ही मित्र त्यांच्या व्यापात कायमच गुंतले असतात. मीच काय तो सर्वाकडे जात असतो आणि माझ्यामुळे ते परस्परांशी जोडले असतात, असं ते म्हणतातही. मला ते अगदी घरातल्याप्रमाणे मानतात. त्यामुळे कधीतरी त्यांनीही या प्राचीन वैभवाकडे वळावं, संतांच्या शब्दांनी प्रेरित व्हावं, असं मला मनापासून वाटत होतं. अचलानंद दादांनी मात्र अगदी स्पष्ट बजावलं. माणसं येतात आणि जातात. येणाऱ्याच्या आनंदानं आणि जाणाऱ्याच्या दु:खानंही वाहावत जायचं नाही. शेवटी जगात मी आणि सद्गुरू या दोनच गोष्टी खऱ्या आहेत. नव्हे! सद्गुरूप्राप्ती हीच सत्यता आहे. बाकी सगळं मिथ्याच.. त्यामुळे माझ्या मित्रांची संगतही कायमची नाही, ही जाणीव आहे. तरीही या संगतीत जे विचारतरंग उमटले.. त्यातून जी प्रेरणा लाभली ती कायमची टिकणार आहे..

आपला,

हृदयेंद्र.

पत्रात पुढचा मजकूर कर्मेद्रनं लिहिला होता आणि त्या मजकुरानं तीन-चार पानं भरली होती! सर्वात मोठं पत्र त्याचंच तर होतं.. ते वाचताना डॉक्टरसाहेब अनेकदा दिलखुलासपणे हसले आणि अखेरीस हेलावलेही.. त्यानं लिहिलं होतं..

प्रिय डॉक्टरसाहेब,

सप्रेम नमस्कार.

हा नमस्कार करताना सिगरेट हातात नाही, हे लक्षात घ्या! ती मी सोडली आहे.. तिनं मला सोडलंय की नाही, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. तर आमच्या गप्पा अखेर संपल्या. वर्ष गेलं. कसं गेलं हे जाणवलंच नाही. खरं सांगायचं तर इतकं मोठं पत्र मी कधीच लिहिलेलं नाही. हृदू तर म्हणतो की शाळेत एवढी उत्तर पत्रिका लिहिली असती तरी जास्त गुण मिळाले असते. अरे हो! शाळेत निबंधाला विषय असायचेच. पार डोकं खायचे. ‘काश्मीरहून मित्राला लिहिलेले पत्र’ असा काहीतरी विषय असायचा. मी लिहिलं होतं, ‘‘मित्रा पत्र वाचून तू बोअर होशील, लिहिताना मीही बोअर होतोय. तर आल्यावर बोलूच.’’ त्याच पेपरात विषय होता, ‘थोर नेत्याच्या पुतळ्याचे मनोगत.’ आता दगडी पुतळ्याला मन असतं का? त्याला मन नसतं, पण उत्तराला वीस गुण होते! मी त्या गुणांची पर्वा न करता लिहिलं की, ‘‘कावळ्यांनी माझ्या डोक्यावर बसू नये, मुलांनी क्रिकेटचा स्टम्प म्हणून आणि अन्य कोणी आडोसा म्हणून माझ्या चौथऱ्याचा वापर करू नये.’’ माझ्या या प्रामाणिक पेपराबद्दल मुख्याध्यापकांनी मला खास बोलावून घेतलं आणि माझी विचारपूस केली होती, असं आता आठवतं. जाऊ दे! एकूण आपली सगळी यंत्रणा माणसाचं मन दगडी करायला मदत करत आहे आणि शाळेत मात्र आजही दगडी पुतळ्याच्या मनोगतावर लिहावं लागत आहे.. पण हो.. माझंही मन दगडीच झालंय की काय जाणिवेनं मी अस्वस्थ होऊ लागलो ते या गप्पा सुरू झाल्या तेव्हा. हृदूच्या डोळ्यातून जेव्हा सहज आसवं गळत तेव्हा अभंगातली तीच वाक्यं मी पुन्हा पुन्हा वाचून पाही आणि मला नवल वाटे की माझ्या मित्राच्या डोळ्यात पाणी यावं इतकं त्या शब्दांत जे आहे ते मला का जाणवत नाही?

चैतन्य प्रेम

  • Tags: god, spiritual-articles, spirituality,