जे दीठी ही न पविजे। तें दिठीविण देखिजे। जऱ्है अतींद्रिय लाहिजे। ज्ञानबळें।। अचलानंद दादांनी ही ओवी उच्चारताच हृदयेंद्रचा चेहरा काहीतरी गवसल्यागत उजळला..
बुवा – सांगा अचलानंदजी अर्थही सांगा..
अचलदादा – जे डोळ्यांना दिसूच शकत नाही ना, ते डोळ्यांशिवाय पाहताही येईल, फक्त अतींद्रिय ज्ञानबळ लाभलं तर!
ज्ञानेंद्र – म्हणजे गूढाच्या प्रांताकडे बोट दाखवून सगळेच मार्ग खुंटवणं आहे झालं!
बुवा – नाही ज्ञानोबा! अतींद्रिय म्हणजे गूढ शक्ती नव्हे! अतींद्रिय ज्ञानबळ म्हणजे इंद्रियातीत अशा ज्ञानाचं बळ.. आपण ज्ञान मिळवण्यासाठी इंद्रियांवर विसंबून आहोत ना? डोळ्यांना जे दिसतं ते खरं, कानांना ऐकू येतं ते खरं.. पण इथे तर माउली सांगतात इंद्रियांवरचं विसंबणं थांबलं की नंतर त्या अदृष्टाला पाहता येतं!
अचलदादा – कबीरांचं एक सुरेख भजन आहे बरं का.. ऐका.. ‘‘नाक दिया सुवास लेनेकू।’’.. बरं भजनातलं हिंदी थोडं वेगळंच वाटेल, मुम्बईय्या हिंदूीसारखं.. पण नीट ऐका.. काय म्हणतात कबीरजी? ‘‘नाक दिया तो सुवास लेनेकू। नैन दिया जग देखनेकु।’’ सोपं वाटतंय ना? नाक का दिलंय तर सुवास घेण्यासाठी, डोळे का दिल्येत, तर जग पाहण्यासाठी.. ‘‘कान दिया कुच वेदपुरान सुननेकु। मुख दिया भजन मोहन कूं।’’ कान दिल्येत ते वेदपुराण ऐकण्यासाठी, तोंड दिलंय ते मोहनाचं म्हणजे कृष्णाचं भजन गाण्यासाठी.. ‘‘हात दिया कुच दान करनेकू। पाव दिया तीर्थाटनकूं।’’ हात दिल्येत ते दान करण्यासाठी आणि पाय दिल्येत ते तीर्थाटनासाठी.. इथपर्यंत सर्व समजतं.. नव्हे बरेचदा ऐकलंय, असं वाटतं.. सर्वच संत समजावतातच ना? की हातांनी दान करा, पायांनी तीर्थाटन करा, डोळ्यांनी भगवंताचं दर्शन घ्या, मुखानं त्याचं भजन गा..
कर्मेद्र – या भजनात तरी नवं काय आहे?
अचलदादा – इथपर्यंत सर्व परिचयाचं वाटतं, शेवटी मोठी कलाटणी आहे! काय म्हणतात कबीरजी? ऐका.. ‘‘कहत कबीर सुन भाई साधु। येतो दियो नियत कियो।’’ कबीरजी म्हणतात ही सारी इंद्रियं देणाऱ्याची नियत चांगलीच आहे! म्हणजे देवाला म्हणताहेत बरं का, की हे सगळं दिलंस ना, तुझी नियत, तुझा हेतू चांगलाच आहे, मग बाबारे सगळा बट्टय़ाबोळ का केलास? म्हणतात- ‘‘कहत कबीर सुन भाई साधु। येतो दियो नियत कियो। पेट दियो पत खोवनकूं।।’’अरे इतकी सगळी चांगली इंद्रियं दिलीस, पण पोट का दिलंस रे माणसाला? त्याची पत गमावण्यासाठी? त्याला लाचार करण्यासाठी? ही कसली नियत तुझी? पोटासाठी लाचार होऊन जे पाहायला पाहिजे ते तो पाहत नाही, जे ऐकायला पाहिजे ते ऐकत नाही, जे बोलायला पाहिजे ते बोलत नाही.. त्याचं ऐकणं लाचारीचं, पाहणं लाचारीचं, बोलणं लाचारीचं.. आता हे देवाला फटकारणं आहेच, पण उलट तसा पवित्रा घेऊन आपल्यालाच फटकारणं आहे.. बाबांनो एवढी चांगली इंद्रियं दिली तरी तुमची नियत का साफ नाही? तुम्हाला पोट दिलंय त्याची अन्नाची गरज किती आणि तुमच्या याच इंद्रियांच्या द्वारे मनाच्या ओढीनं तुम्ही ओरबाडून चालवलेला आहार किती? हे पोट तुमची पत सांभाळेल किंवा गमावेल.. तुम्हीच निवड करा.. जे आहे त्यात अंत:करणाचं पोट भरलं ना तर पत गमावण्याची पाळी नाही.. आहे त्यात तृप्ती नसेल तर अतृप्ताचं पोट कधीच भरत नाही..
ज्ञानेंद्र – भजन फार सुरेख आहे.. पण त्याचा चोखामेळा महाराजांच्या अभंगाशी काय ताळमेळ?
बुवा – अगदी पक्का ताळमेळ आहे! जे दिठीही न पविजे। ते दिठीविण देखिजे। जऱ्है अतींद्रिय लाहिजे। ज्ञानबळें।।.. दृष्टीलाही जे दिसू शकत नाही, ते डोळ्यांशिवाय पाहता तेव्हाच येईल जेव्हा इंद्रियांच्या द्वारे आसक्तीच्या पूर्तीची अंत:करणाला जी सवय लागली आहे, ती मोडेल तेव्हाच! पोटानं पत सांभाळली तरच कानांनी वेदपुराण ऐकता येईल, पायांनी तीर्थाटन साधेल, हातांनी दान साधेल.. आणि नीट ऐका.. नैन दिया जग देखनेकु! डोळे का दिल्येत? जग नीट पाहायला! जगाचं भ्रामक स्वरूप ज्याला दिसतं त्यालाच जग खरं दिसलं!! डोळे असूनही आपण खरं पाहात नाही आणि भ्रमाचं खापर मात्र दृष्टीवर फोडून मोकळे होतो!
चैतन्य प्रेम