X
X

२४९. सरले ते अवचित स्मरले..

अभंगाच्या चर्चेची अखेर जवळ आल्याच्या जाणिवेनं का कोण जाणे, हृदयेंद्र थोडा हळवा झाला..

निवृत्ति निघोट ज्ञानदेवा वाट। नित्यता वैकुंठ कृष्णसुखें।। हा चरण विठ्ठल बुवांनी थोडा मोठय़ानं उच्चारला तेव्हा अभंगाच्या चर्चेची अखेर जवळ आल्याच्या जाणिवेनं का कोण जाणे, हृदयेंद्र थोडा हळवा झाला.. तोच कर्मेद्र म्हणाला..

कर्मेद्र – चर्चेत खंड पडावा, असं मलाही वाटत नाही, पण उद्या रविवार आहेच.. आजचा अख्खा शनिवार ‘सगुणाची शेज’च्या तिन्ही चरणांत गेलाय.. रात्र होत आल्ये.. जेवण वाट पहाताय.. यजमान ज्ञानेंद्र आणि यजमानीणबाई प्रज्ञा कधीपासून सांगू पाहात आहेत की, ‘जेवायला चला’, तर आपलं तिकडे लक्षच नाही.. (सगळेच हसतात) तर आता बुवा आधी जेवून घेऊ आणि मग मध्यरात्रीपर्यंत किंवा उद्याच्या दिवसभर तुमच्या अखेरच्या चरणाची चर्चा करू..

हृदयेंद्र – (हसत) बुवांचा अखेरचा चरण नाहीये.. माउलींच्या अभंगाचा अखेरचा चरण आहे.. निवृत्ति निघोट ज्ञानदेवा वाट। नित्यता वैकुंठ कृष्णसुखें।।..

कर्मेद्र – तेच ते.. पण जेवणाच्या टेबलाकडे प्रथम चरण पडू द्यात ही विनवणी..

सगळ्यांना कर्मेद्रच्या बोलण्याचं हसू येतं. चर्चा थांबवावीशी वाटत नसते, पण कर्मेद्रची सूचनाही बरोबरच असते.. अख्खा दिवस कसा गेला, कळलंच नाही.. सिद्धी लगबगीनं प्रज्ञाबरोबर स्वयंपाकघरात गेली.. चाकरांच्या मदतीनं दोघींनी जेवण पुन्हा गरम केलं आणि मग गोलाकार प्रशस्त टेबलवर पानं सजली.. वाफाळत्या सुग्रास अन्नपदार्थानं भरली गेली आणि काहीच वेळात रिती होत तृप्त जठराग्निच्या स्वाधीनही झाली.. जेवणानंतर थोडय़ा अवांतर गप्पा झाल्या.. मग बंगल्याच्या सज्जात समोरच्या समुद्राची गाज आणि वाऱ्याची साथ घेत कॉफीपानही झाले.. बुवांनी थोडं गरम दूध मात्र घेतलं.. मग विश्रांतीसाठी पावलं वळली.. ज्ञानेंद्रची बंगली प्रशस्त होती आणि प्रत्येकाच्या निजण्याची व्यवस्थित सोय केली गेली होती. त्या घरातल्या देवघरातली पलंगडी ही हृदयेंद्रची जणू कायमची हक्काची जागा होती.. तिथं पडल्या पडल्या हृदयेंद्रच्या डोळ्यासमोर वर्षभरातले अनेक प्रसंग तरळून गेले.. तिघा मित्रांसोबतचा मथुरेचा तो पहिला प्रवास.. त्या प्रवासात अभंगांवर चर्चा करण्याची सुचलेली कल्पना, मग आलेला ‘पैल तो गे काऊ कोकताहे’ हा अवीट अर्थगोडीचा अभंग.. रात्री अर्धजागृत अवस्थेत कुणा भिकाऱ्याच्या तोंडून ऐकलेला ‘पैल तो गे काऊ कोऽहं कहता है’ हा चरण.. त्या मोडतोडीतून समोर आलेला विलक्षण गूढार्थ.. मग डॉक्टर नरेंद्रांची अवचित भेट.. त्यातून शरीरशास्त्राच्या अंगानं उलगडलेला अर्थ.. त्या पहिल्या अभंगापासून कितीतरी अभंगांचे कितीतरी गूढार्थ उमगले.. मग अचलानंद दादांच्या तोंडून ‘रूप पाहता लोचनी’चा गोंदवल्यात उकललेला अर्थ असो की दादासाहेबांकडून ‘देवा तुझा मी सोनार’ या अभंगातल्या देहाची बागेसरी, त्रिगुणाची मूस, जीवशिवाची फुंकी आणि अंतरात्मारूपी सोन्याचा दागिना या उपमांचा उकललेला विलक्षण अर्थ असो, ते सारं आठवून हृदयेंद्रचं मन रोमांचित झालं.. ‘रूप पाहता लोचनी’ या अभंगाच्या ओघानं पहाण्याची क्रियाही किती छटांची असते, हे दादांच्या तोंडून ऐकणं हा वेगळाच अनुभव होता.. ऐकावे विठ्ठल धुरे। विनंती माझी हो सत्वरें।। करी संसाराची बोहरी। इतकुें मागतों श्रीहरी।। असं विलक्षण मागणं मागणाऱ्या सावता माळी महाराजांनी नि:संतान होण्याचा मागितलेला वर आणि त्याचा समोर आलेला अर्थही असाच जाग आणणारा होता.. जाता पंढरीसी सुख वाटे जिवा, या अभंगाची मनावर कोरली गेलेली चर्चाही त्याला आठवली.. नामदेवांचे पुत्र विठामहाराज यांनी ‘‘संग तुझा पुरे’’ असा नारायणाला केलेला विलक्षण सांगावा असो की त्यांचे दुसरे पुत्र नारा महाराज यांनी पुंडलिका द्वारीं नामयाच्या पोरांचं वर्णिलेलं जगावेगळं भांडण असो.. त्यातला विठोबावरचा आळ असो.. हे सारं आठवून हृदयेंद्रचे डोळे पाण्यानं भरले.. बापाच्या नश्वर मालमत्तेचा नश्वर वारसा मिळावा म्हणून धडपडणाऱ्या या जगात आपल्या बापाचा भक्तीचा वारसा मिळावा म्हणून पुंडलिकाच्या द्वारी भांडणारी नामयाची पोरं हृदयेंद्रचं अंतर्मन हेलावत गेली.. संतांच्या शब्दाशब्दांत शाश्वत परमानंदाचा हा वारसा खुला आहे, त्याचं मोल का कुणाला

जाणवत नाही, या प्रश्नाच्या कुशीत त्याचे डोळे अलगद मिटले..

चैतन्य प्रेम

24
  • Tags: god, inspiration,
  • Just Now!
    X